घरफिचर्सवैश्विक स्वीकार्यतेचा हुंकार

वैश्विक स्वीकार्यतेचा हुंकार

Subscribe

युरोप हे शिक्षण पद्धतीबाबतीत अग्रेसर आहे... त्यांच्या मते ते विद्यार्थांना प्रत्येक सुविधा पुरवतात... विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी प्रोत्साहित नाही करू शकत... जर्मन पॅडागॉगी ही जगात शिक्षणासाठी श्रेष्ठ मानली जाते ...चौकटीबाहेर शिक्षणपद्धतीची म्हणजे थिएटर ऑफ रेलेवन्सची प्रक्रिया त्यांच्यासाठी नवीन होती. कारण जो वर्ग त्यांच्यासाठी सर्वात मस्तीखोर आणि बंडखोर होता तोच वर्ग शिस्तबद्ध पद्धतीने, सृजनशील आणि भन्नाट रीतीने आमच्याशी कनेक्ट झाला.

प्रवास हा केवळ एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणापर्यंत नसतो … प्रवास बाह्यवातावरण ते अंतर्मन असा असतो … त्या ठिकाणाच्या अणुरेणूपर्यंत असतो …प्रवासाचा थेट परिणाम आपल्या व्यक्तित्वावर होत असतो … म्हणून प्रवासात शोध महत्वाचा असतो …परदेशात आपण निसर्गसौंदर्य पाहतो … पण परदेशीय लोक कशाप्रकारे आयुष्य जगतात?… त्यांचा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टीकोन कसा आहे? ते काय खातात? काय परिधान करतात? त्यांच्यात आणि आपल्यात काय साम्य आहे आणि काय वेगळेपण आहे? हे सगळे त्यांच्यात राहिल्याशिवाय आपण नाही अनुभवू शकत.

ही संधी आम्हाला मिळाली …जर्मनीमध्ये गेल्यावर आम्ही प्रत्यक्ष जर्मन परिवारांमध्ये राहिलो …त्यांच्या खाण्यापिण्याची सवय, जगण्याची पद्धत जवळून अनुभवली … ही खर्‍या अर्थाने सांस्कृतिक देवाणघेवाण होती… तेथील घरे म्हणजे स्वप्नवत आहेत.. सगळ्या सुखसोयींनी सज्ज… घरांच्या भोवताली असलेली बाग, फुलांनी डवरलेल्या बाल्कनीज, स्वयंपाक घरातील साधने आणि महत्वाचे म्हणजे चोवीस तास पाणी आणी वीज… आपल्याकडे या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी जीवनाचा अर्धा वेळ जातो… आज पाणी येईल का? लाईट जाईल का? पण युरोपमध्ये तसे नव्हते … प्रत्येकाला special खोली, special गाडी, special वागणूक…. पहिल्यांदाच आम्ही चारी बाजूंनी झाडांनी वेढलेल्या एका युथ हॉस्टेलमध्ये राहिलो…जेवणाची वेळ आली त्यावेळी खूप उत्सुकता होती.. पण भात, सलाड, राजमा, चविष्ट वेगवेगळ्या प्रकारचे पौष्टिक ब्रेड, जॅम, ताजी फळं, भाज्या बघून मन तर तृप्त झालेच आणि पोटही तृप्त केले…

- Advertisement -

तिथे जर्मन विद्यार्थी आणि शिक्षकांचे आम्ही workshop घेतले .. प्रत्येक प्रयोग आणि workshop मधून मिळालेल्या अनुभवातून आम्ही अधिक समृद्ध होत गेलो…सतत भारताचे सांस्कृतिक दूत आहोत हे भान होते..आमचे पहिले workshop हँबर्गच्या शुले अँमसी या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी होते … जर्मन लोकांसोबत पहिला सुसंवाद… त्याची सुरुवात केली हस्तांदोलनाने…आणि हाच triggerpoint होता आमच्या आणि त्यांच्या मधल्या connection चा …सहभागींना मंजुल सर जाणीव करून घ्यायचे की ही घटना प्रत्येकासाठी ऐतिहासिक आहे, कारण शिकण्यासाठी आणि सहभागी होण्यासाठी ही सर्वात मोठी सुसंधी आहे… भारतीय विद्यार्थ्यांचे बाहेरच्या जगातील मुलांना भेटणे, शिकवणे अशा घटना सारख्या नाही घडत…या शाळेने मंजुल सरांना request केली की आमच्या शाळेत एका क्लासचे शिबीर घेणार का, जो आमच्या शाळेतील सर्वात खोडकर क्लास आहे …ही मुले अजिबात ऐकत नाहीत…हे आव्हान आम्ही स्वीकारले.

मुळात ही मुले शिक्षणाच्या चौकटीबाहेर असलेली आव्हाने या शिक्षणपद्धतीला देत होती… त्यांच्या भावनिक गरजा, भाषेचा परिवेश, त्यांचे प्रश्न शालेय शिक्षणपद्धती बाहेरील होते … साचेबद्ध चौकटीत बसणारे नव्हते.. आणि जे साचेबद्ध पद्धतीत बसत नाहीत “थिएटर ऑफ रेलेवन्स” त्यांना माणूस म्हणून बघतो …आम्ही या वर्गाला खोडकर क्लास म्हणून न भेटता एक माणूस म्हणून भेटलो. कुठलाही पूर्वग्रह न ठेवता त्यांना हे जाणवू दिले की आम्ही त्यांच्यासोबत आहोत. त्यांना भारतीय नृत्य, संगीताच्या दुनियेत नेलं. त्यात ती रमली, त्यांना प्रोत्साहित केले, वेगवेगळ्या पातळ्या दिल्या. नृत्य, संगीत, नाटक आणि हाच खोडकर-बंडखोर वर्ग परफॉर्म करणार्‍या वर्गामध्ये परावर्तित झाला. हेच “थिएटर ऑफ रेलेवन्सचे” यश होते की नाटक लोकांची मानसिकता बदलवते आणि त्यांचे व्यक्तिमत्व घडवते…या शिक्षणपद्धतीने त्यांना खोडकर अशी छबी दिली होती, आम्ही त्यांच्या उर्जेला सृजनात्मक पद्धतीने मोकळे केले.. त्यांचे वेगळेपण अधोरेखित केले आणि ते आमचे मित्र बनले ..
त्यानंतर शिक्षकांची खूप बोलकी प्रतिक्रिया आली की युरोप हे शिक्षण पद्धतीबाबतीत अग्रेसर आहे… त्यांच्या मते ते विद्यार्थांना प्रत्येक सुविधा पुरवतात… विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी प्रोत्साहित नाही करू शकत… जर्मन पॅडागॉगी ही जगात शिक्षणासाठी श्रेष्ठ मानली जाते …चौकटीबाहेर शिक्षणपद्धतीची म्हणजे थिएटर ऑफ रेलेवन्सची प्रक्रिया त्यांच्यासाठी नवीन होती कारण जो वर्ग त्यांच्यासाठी सर्वात मस्तीखोर आणि बंडखोर होता तोच वर्ग शिस्तबद्ध पद्धतीने, सृजनशील आणि भन्नाट रीतीने आमच्याशी कनेक्ट झाला … त्यांना खुला मंच दिला आणि त्यांचे जीवन, त्यांची शाळा, संस्कृती, समाज, देश आणि मग विश्वासाठी जागृत केले…

- Advertisement -

युरोपमध्ये आमच्या ‘ड्रॉप बाय ड्रॉप वॉटर’चा पहिला प्रयोग अविस्मरणीय होता … या नाटकाचा प्रीमियर होता तोही युरोपमध्ये …पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय रंगमंचावर युरोपियन प्रेक्षकांसमोर नाटक सादर करताना आम्ही खूप उत्सुक होतो …प्रत्येक कलाकाराचे एक स्वप्न असते की आंतरराष्ट्रीय रंगमंचावर परफॉर्म करावे … एक कलाकार म्हणून माझे स्वप्नापलिकडील जग साकार होत होते … आमचा प्रयोग बघून जर्मन प्रेक्षक marvelous , bravo असा प्रतिसाद देत होते … शून्यापासून सुरुवात केलेल्या कामाचे ते एक फलित होते… आज आपल्याकडे भारतीय रंगभूमीवर किंवा कलाजगतात पाश्चिमात्य शैलीचे अनुकरण केले जाते … तिथे युरोपियन प्रेक्षकांनी आपल्या भारतीय सांस्कृतिक ठेव्याला आमच्या नाटकाला उभं राहून दाद दिली … त्यावेळी मनामध्ये असंख्य विचार येत होते.

ही दाद मिळवण्यासाठी त्याचा मागे किती मेहनत होती हे नजरेसमोर येत होते.. मी थेट इथे येण्यापूर्वीचे दिवस आठवत येत होते. आमची तालीम शांतीवन येथे निसर्गाच्या सान्निध्यात करायचो …धो धो पाऊस असूनही, वीज नसताना, साप विंचू किटक इकडे तिकडे फिरत असतानाही आमची तालीम कधी थांबली नाही. कारण या तालमीत संचित ज्ञानाचा अखंड झरा व्हायचा… प्रत्येक वेळी नवीन अनुभव, नवीन रस्ता, नवीन विचार, नवे आयुष्य…नाटकाचे इतर पैलू जसे रंगमंच, रंगशिल्प, रंगशैली या शब्दांची नव्याने ओळख होत होती…आम्ही नाटकात नृत्य, वादन, गायन एकसाथ live करत होतो ते रेकॉर्रेड नव्हते… म्हणजेच multitasking करत होतो …भारताच्या विविध प्रांतात, वेगवेगळ्या धर्मात असलेले पाण्याचे महत्व आम्ही माहीत करून घेतले … नाटकाची कन्सेप्ट व्यवस्थित समजण्यासाठी विषयाची सखोल माहिती घेऊन अभ्यास केला. आतापर्यंत माझी मूलभूत गरज असलेल्या पाण्याविषयी मला नव्याने कळत होते.. पाणी हा नैसर्गिक हक्क आहे. त्याचे बाजारीकरण होतंय. हे जाणले नाही तर पाण्यावरून युद्ध अटळ आहे. नाटक तर आम्ही करतोय, पण नाटकाविषयी आम्हाला कितपत जाणीव आहे याची दखल घेतली…

एकाच वेळी सगळ्या आयामांवर काम करत होतो, तेही कुठलीही गोष्ट अनुकूल नसताना वातावरण विरोधात होते, परिवाराला काळजी होती. कारण घरची सून, मुलगी, बायको, आई, बहीण ही 66 दिवस परदेशात राहणार होती, इंग्लिश भाषेत नाटक असल्याने स्पष्ट इंग्लिश बोलण्याचे आव्हान होते … आरोग्य सांभाळण्याचे आव्हान आणि सर्वात महत्वाचे की वेळेच्या आधी तयार होणे …

मला एक प्रसंग आठवतो की मी या नाटकात तब्बल सोळा वेशभूषा बदलायचे …आणि सुरुवातीला मी हो नाही करत होते की एवढ्या कमी वेळात मी वेशभूषा कशी बदलू या गोष्टीवर मी अडून बसले … पण हे अडणे मानसिक होते याची जाणीव सरांनी करून दिली.

शिबिरात प्रत्येकजण समान कार्य करायचा … जसे की अनुभव लिहिणे, चैतन्य अभ्यास, नाटक करणे तरीही प्रत्येकासोबत वैयक्तिक प्रक्रिया सुरू होती… प्रत्येकाचे अनुभव वेगवेगळे होते …पण प्रत्येकाचा जगण्याचा अनुभव वेगळा होता. कारण प्रत्येकाचे जगण्याचे विचार वेगळे असतात…

नाटक म्हणजे एक आयती स्क्रिप्ट हातात मिळणार, आपण ती वाचून आपली भूमिका असलेलं पाठांतर करणार आणि दिग्दर्शक सांगेल तसे अभिनय करणार …. पण इथे अशी प्रक्रिया नाही घडली … इथे सुरुवातीला आम्ही कलाकारांनी शोध सुरू केला .. पाणी आणि आपण याचा संबंध शोधला तोही वैश्विक स्तरावर… आणि त्यानंतर नवनवीन शोधानुसार नाटक तयार करू लागलो … प्रत्येक वेळी नाटकाची, त्यातील तत्वाची आणि स्वतःच्या वैचारिकतेची पातळी वाढवत गेलो.
वैचारिक पातळी वाढणे म्हणजे वैश्विक स्वीकार्यतेची सुरुवात हा दृढ विश्वास निर्माण झाला.

हीच वैचारिक क्षमता पाणी व त्याचे खाजगीकरण या मौलिक मुद्याला सातासमुद्रापार, म्हणजे जिथून खाजगीकरण आपल्याकडे आले तिथपर्यंत थेट पोहचवण्याचे माध्यम बनली. पाणी म्हणजे नैसर्गिक संपदा, पाणी म्हणजे जीवन, पाणी म्हणजे सत्व, सत्व म्हणजे कला आणि ‘ड्रॉप बाय ड्रॉप वॉटर’ हे नाटक म्हणजे विश्वाला जगवण्याचा कलात्मक हुंकार…

– अश्विनी नांदेडकर (रंगकर्मी)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -