घरफिचर्सवैविध्यपूर्ण चित्रपटांचे वर्ष

वैविध्यपूर्ण चित्रपटांचे वर्ष

Subscribe

या वर्षी विशिष्टच विषयला वाहिलेले सिनेमे आले नाहीत. तर अनेकविध विषयांवरील उत्तमोत्तम चित्रपट 1982 मध्ये पडद्यावर आले. हिंदी पडद्यावरील यात सुभाष घईंचा विधाता, प्रकाश मेहरांचा नमक हलाल, गुलजार यांचा अंगूर, राज कपूरचा प्रेमरोग असे वेगवेगळे चित्रपट होते. त्यामुळे हे वर्ष वैशिष्ठ्यपूर्ण होतं. डिस्को डान्सरने मिथुनला याच वर्षी सुपरस्टार बनलं होतं. डिस्को डान्सरने तरुणाईला वेड लावलं होतं. बप्पी लाहिरीच्या नावाला त्यावेळी पर्याय नव्हता. मिथुनचा डिस्को डान्सर परदेशातही गाजला होता. या वर्षी बाजार, बेमिसाल, साथ साथ, अर्थ असे अनेक इतर महत्वाचे चित्रपटही पडद्यावर आले.

कवी, लेखक गुलजार यांनी या वर्षी बनवलेला अंगूर मजेशीर होता. अंगूरमध्ये देवेन वर्मा आणि संजीव कुमार या जोडीने दुहेरी भूमिकेत धमाल उडवून दिली होती. हा विनोदाचा डबल डोस होता. मात्र, यातील विनोद निखळ आणि शालीन असाच होता. विनोदाचा अत्यंत दर्जेदार प्रकार म्हणून आजही अंगूरचंच नाव घेतलं जातं.

या वर्षी गुलशान रायच्या त्रिमूर्ती फिल्मने विधाता बनवला होता. दिग्दर्शन सुभाष घईंकडे होतं. विधातामध्ये सुभाष घईंनी दिलीप कुमार आणि शम्मी कपूरच्या या दोघांच्या मैत्रीपटाला अ‍ॅक्शन, इमोशन्सचे कंगोरे दिले होते. विधाता बनवतानाच दिलीप कुमार यांना घेऊन भव्यदिव्य मैत्रीपट बनवण्याचं घईंनी ठरवलं होतं. पुढे त्यांनी सौदागर बनवून राज आणि दिलीप या कुमारांच्या संवादमैत्रीपटातून आपलं स्वप्न पूर्ण केलं. विधातामधलं हाथो की चंद लकिरो का… हे गाणं आजही म्युझिक शोमध्ये आवर्जून वाजवलं जातं. विधातानं तिकिटबारीवर मोठं यश मिळवलं. या सिनेमाने संजय दत्त आणि सुभाष घई यांनाही एकत्र आणलं. पुढे खलनायक बनवताना नाना पाटेकरसाठी लिहलेली व्यक्तीरेखा ऐन वेळी संजय दत्तला सुभाष घईंनी देऊ केली ती विधातामधील मैत्रीला जागूनच…ते असो, विधाताशिवाय या वर्षी राज कपूरने एक महत्त्वाचा प्रेमरोग नावाचा सामाजिक आशयपट बनवला होता. प्रेमरोगचा विषय विधवा विवाह, केशवपन आदी सामाजिक स्त्रीवादाचा विषय होता. या चित्रपटाला तिकीटबारीवर उत्तम यश मिळालं शिवाय त्या वर्षातल्या सर्वाधिक फिल्मफेअर पुरस्कारांवर प्रेमरोगनं नाव कोरलं. पद्मीनी कोल्हापुरे या मराठमोळ्या मुलीला हिंदी पडद्यावर नायिका म्हणून संधी प्रेमरोगमधून मिळाली. सत्यम शिवम सुंदरम बनवला जात असतानाच राज कपूरने यशोमती मैया से बोले नंदलाला…या गाण्यातल्या छोट्या पद्मिनीला घेऊन प्रेमरोगसारखा सामाजिक चित्रपट बनवण्याचं ठरवलं होतं.

- Advertisement -

या वर्षी प्रकाश मेहरांचा नमक हलालही पडद्यावर आला. अमिताभने याआधी नमक हराम नावाचा सिनेमा राजेश खन्नांसोबत केला होता, तर नमक हलालमध्ये शशी कपूर होता. या दोन्ही नावातील सार्धम्यामुळे अमिताभप्रेमींचाही गोंधळ उडत होता. स्मिता पाटीलसोबत नायक म्हणून अमिताभ असलेला पहिला चित्रपट होता. पुढे ही जोडी शक्तीमध्येही झळकली होती. नमक हलालचं संगीत बप्पी लाहिरींच होतं, तर संवादलेखनाचे बादशहा मानल्या जाणार्‍या कादरखाननेच या चित्रपटाचे संवाद लिहले होते. प्रकाश मेहरांच्या बहुतेक चित्रपटांचे संवाद कादरखानचे होते. 80 चं दशक मल्टीस्टारपटांचं होतं. त्यामुळे एखाद दुसर्‍या कलाकाराने काम भागत नव्हतं. अमिताभ, संजीव कुमार आणि विनोद मेहरांचा खुद्दारही याच वर्षी आला. संवाद लेखन पुन्हा त्याच कादरखानचं होतं. खुद्दारने बॉक्स ऑफीसवर मोठं यश मिळवलं. तर परवीन बाबी आणि अमिताभ ही जोडी खुद्दारमुळे पसंत केली गेली होती.

दक्षिणेकडच्या राघवेंद्र राव यांनी फर्ज और कानून बनवताना त्यात जितेंद्र, हेमामालिनी यांना घेतलं होतं. मात्र, संवाद लेखनात कादरखान यांना पर्याय नव्हता. या वर्षी प्रदर्शित झालेल्या बहुतेक सर्वच चित्रपटांचे संवाद कादरखान यांचेच होते. 80 च्या दशकातल्या बहुतेक चित्रपटांत कादरखान यांचेच संवाद होते. त्यामुळे या बहुतांशी चित्रपटांच्या संवादात सारखेपणा होता. तसेच अनेक ठिकाणी उथळ संवाद असल्याचं स्वतः कादरखान यांनी मान्य केले होते. या एकसुरीपणाला आणि काही अंशी चित्रपटातील उथळ संवादांना मी जबाबदार असल्याचं त्यांनी एकदा स्पष्टपणे सांगितलं होतं. मात्र, कादरखान यांच्यासारख्या संवाद लेखनाचं कामाची उंची आजही कुणी गाठू शकलेलं नाही, हे खरेच आहे.

- Advertisement -

बी. आर. चोप्रा यांनी तीन तलाक पद्धतीवर निकाह बनवला. त्यासाठी पाकिस्तानातील आघाडीच्या गायिका सलमा आगा यांना नायिका म्हणून करारबद्ध केलं. राज बब्बर आणि दीपक पराशर यांच्या प्रेमाचा त्रिकोण हे निकाहचं उपकथानक होतं. तर गुलाम अलींची चुपके चुपके गझल हे निकाहचं बलस्थान होतं. या चित्रपटातील कथानकामुळे त्या वेळी धार्मिक गहजब झाला नाही किंवा सिनेमागृहाच्या मोडतोडीच्या धमक्याही निर्मात्यांना आल्या नाहीत.

राज सीप्पींना अमिताभला घेऊन भावांची कथा असलेला सत्ते पे सत्ता बनवला. या चित्रपटाचा विषय वेगळा असताच चित्रपटात भरपूर उपकथानकं होती. आर. डी. बर्मनचं संगीत हे सत्ते पे सत्ताचं वैशिष्ठ्य होतं तर इथंही संवादासाठी कादरखान हे नाव पुन्हा जोडलं गेलं होतं. सत्ते पे सत्तानं मोठं यश मिळवलं. या चित्रपटातून एकाच वेळेस अनेक कलाकारांना पडद्यावर नाव मिळवून दिलं. ज्यात खलनायकी भूमिका साकारणारे सुधीर, शक्ती कपूर याशिवाय कंवलजीत, पेंटल, सचिन आदी नावे होती. हा चित्रपट महत्त्वाचा होता.

मिथुनला सुपरस्टारपदावर पोहचवणारं हे वर्ष होतं. डिस्को डान्सरने तरुणाईला वेड लावलं होतं. बप्पी लाहिरीच्या नावाला त्यावेळी पर्याय नव्हता. मिथुनचा डिस्को डान्सर परदेशातही गाजला होता. लेखक सलीम जावेद आणि रमेश सिप्पी शक्तीच्या निमित्ताने पुन्हा एकत्र आले. अमिताभ आणि दिलीप कुमार यांच्या तडाखेबंद संवादाचं उदाहरण म्हणून या सिनेमाची ओळख आहे. आर डी बर्मनचं संगीत ही शक्तीची जमेची बाजू होती. शक्तीचं कथानक अ‍ॅक्शन, इमोशन्सनी भरलेलं होतं. दिलेली व्यक्तीरेखा पडद्यावर साकारण्यापेक्षा ती जगण्याचा प्रयत्न दिलीपकुमारनी शक्तीमध्ये केला होता.

शक्तीला तिकिटबारीवर घवघवीत यश मिळालं. सोबतच भावनिक आणि सामाजिक मूल्ये जपणारे वास्तववादी पोलीस पटांनीही शक्तीमुळे दिशा मिळाली. आर डी बर्मच्या संगीताची जादू हे शक्तीचं बलस्थान होतं. मनमोहन देसाई, प्रकाश मेहरा, रमेश सीप्पी या तत्कालीन दिग्गज दिग्दर्शकांनी अमिताभसोबत प्रत्येकी एक एक यशस्वी चित्रपट या वर्षी पडद्यावर आणला. मनमोहन देसाई यांनी देशप्रेमी बनवताना त्यातही आपला जुना फार्म्युला वापरला होता. घडणार्‍या अर्तक्य घटनांची साखळी, भाऊ, कुटुंबियांची ताटातूट, नातेसंबंधांतील भावनिकता, धर्मभावनांचा चपखल वापर करत त्याला देशप्रेमाची जोड दिली होती. मनमोहन देसाईपटात विचित्र आणि अविश्वसनीय घटनांची साखळी इथेही कायम होती. मात्र, प्रेक्षकांना भावनांमध्ये गुंतवून त्यांचा विवेक कुंठीत करण्याची क्षमता देसाईंमध्ये होती. देशप्रेमी हा त्याचा कळस होता. अमिताभसोबत या चित्रपटालाही प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं. अमिताभ, हेमा मालिनी, नवीन निश्चल, प्रेमनाथ, शर्मिला टागोर, परवीन बाबी, शम्मी कपूर, परिक्षित साहनी, उत्तम कुमार, अमजद खान, कादर खान, जीवन अशी मात्तब्बर कलाकारांची फौज देशप्रेमी मध्ये होती. मल्टीस्टारपटाचा देशप्रेमी हा कळस होता. या वर्षी बाजार, बेमिसाल, साथ साथ, अर्थ असे अनेक इतर महत्वाचे चित्रपटही पडद्यावर आले. खर्‍या अर्थाने 1982 हे वर्ष वैविध्यपूर्ण चित्रपटांचं होतं.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -