घरमहाराष्ट्रअधिवेशन थांबवून मुख्यमंत्र्यांनी मुंबईत यावं

अधिवेशन थांबवून मुख्यमंत्र्यांनी मुंबईत यावं

Subscribe

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पावसाळी अधिवेशन थांबवून मुंबईला पूर्वपदावर आणण्यासाठी, मुंबईकरांच्या संरक्षणासाठी व मुंबईच्या मदतीला सर्व नेत्यांसह मुंबईत परत यावे – संजय निरुपम

गेल्या तीन दिवसापासून मुंबई आणि ठाणे जिल्ह्याला पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे. सर्वत्र पाणी साचून “पूर” सदृश्य परिस्थिती निर्माण झालेली आहे. मुंबईत पश्चिम उपनगरात मालाड ते विरार ठिकठिकाणी पाणी साचलेले आहे तसेच सायन, वडाळा, माटुंगा, हिंदमाता, ताडदेव, सातरस्ता अशा बहुतेक ठिकाणी पाणी साचलेले आहे. रेल्वे स्टेशन्स पाण्याखाली गेलेले आहेत. सगळीकडे “पूर” परिस्थिती निर्माण झालेली आहे. काही ठिकाणी संरक्षक भिंत कोसळत आहे तर कुठे बिल्डींगचा काही भाग पडून नागरिक रस्त्यावर आलेले आहेत. बेस्ट सेवा, रेल्वे सेवा संपूर्ण कोलमडलेली आहे. संपूर्ण मुंबईभर वाहतूक कोंडी निर्माण झालेली आहे, असे असताना मात्र शिवसेना व भाजप सरकार व त्यांचे सर्व मंत्री पावसाळी अधिवेशनासाठी नागपुरात जाऊन बसलेले आहेत. मुंबईला कोणीच वाली उरलेला नाही.

मुंबईत “पूर” आणि मुख्यमंत्री नागपूर मध्ये… म्हणून मी अशी मागणी करत आहे कि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पावसाळी अधिवेशन थांबवून मुंबईला पूर्वपदावर आणण्यासाठी व मुंबईकरांच्या संरक्षणासाठी, मुंबईच्या मदतीला सर्व नेत्यांसह मुंबईत परत यावे, असे उद्गार मुंबई कॉंग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी काढले. आज बोरीवली पश्चिमेतील शिंपोली येथे पॉप्युलर बिल्डींगचा काही भाग कोसळला आहे, त्याची पाहणी करण्यासाठी आले होते. त्यावेळी ते बोलत होते.

- Advertisement -

संजय निरुपम पुढे म्हणाले की, “शिवसेना व भाजपा निवडणुका आल्या की मुंबईकरांना मोठी आश्वासने देतात. जाती धर्माच्या नावाने मत मागतात. मुंबईला पायाभूत सर्व सुविधा पुरविण्याचे आश्वासन देतात तसेच मुंबईकरांच्या सुरक्षेची हमी देतात. मुंबई महानगरपालिकेत शिवसेना भाजपची सत्ता आहे आणि ते दरवर्षी मुंबईकरांना आश्वासन देतात की पावसाळ्यात मुंबईत पाणी साचणार नाही परंतु दरवर्षी मुंबईत पाणी साचून मुंबईकरांचे हाल होतात, त्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो, याला सगळ्याला शिवसेना भाजप सरकार आणि त्यांचा मनपातील भ्रष्टाचार जबाबदार आहे.”

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -