घरमहाराष्ट्रसरकार ऊसतोड मजुरांच्या जिवावर उठले आहे का? - धनंजय मुंडे

सरकार ऊसतोड मजुरांच्या जिवावर उठले आहे का? – धनंजय मुंडे

Subscribe

माढा तालुक्यात ट्रॅक्टरच्या टेपचा आवाज वाढवला म्हणून एका ऊस तोडणी मजुराची पोलिसांनीच हत्या केली. आवाज वाढवला म्हणून नव्हे तर हप्ता वसुलीसाठी या मजुराच्या वाहनाला पोलिसांनी अडवले, असा आरोप विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला.

केवळ टॅ्रक्टरच्या टेपचा आवाज वाढवला म्हणून ऊस तोड वाहतूक करणार्‍या मजुराला पोलिसांनी बेदम मारहाण केली. या मारहाणीत त्या मजुराचा मृत्यु झाल्याची घटना काल माढा तालुक्यात घडली. या प्रकरणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आक्रमक भूमिका घेतल्यामुळे अखेर मारहाण करणार्‍या पोलिसाविरूध्द भादंवि कलम ३०२ अनुसार गुन्हा दाखल होऊन निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. सरकार ऊसतोड मजुरांच्या जिवावर उठले आहे काय असा संतप्त सवाल मुंडे यांनी उपस्थित केला आहे.

धीर सोडू नका; धनंजय मुंडेचा त्या कुटुंबियांला आधार

प्रदिप कल्याण कुटे (वय २४) हा गरीब तरूण सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील बबनरावजी शिंदे शुगर अ‍ॅण्ड अलाईड इंडस्ट्रीज या साखर कारखान्यासाठी ऊसतोड वाहतुकीचे काम करतो. मुळचा सोनगिरी गावातील (ता. भुम, जि. उस्मानाबाद) असलेला प्रदिप स्वतःच्या कुटुंबिया समवेत ऊसतोड करतो. काल स्वतःच्याच ट्रॅक्टरवर कारखान्याकडे जात असताना मानेवाडी पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी दशरथ कुंभार आणि दिपक क्षिरसागर या दोघांनी त्यास ट्रॅक्टरच्या टेपचा आवाज का वाढवला? असा प्रश्न विचारून हटकले. या क्षुल्लक कारणावरून त्याला बेदम मारहाण केली. त्यानंतर जखमी अवस्थेत त्याला माढा ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र त्याचा जागेवरच मृत्यु झाल्याचे डॉक्टरांनी जाहिर केले.

- Advertisement -
sugarcane chop worker death
पोलिसांच्या मारहाणीत मृत्यू झालेला कामगार
प्रदिप कल्याण कुटे

सदर घटने प्रकरणी मृत प्रदिपच्या नातेवाईक आणि सोनगिरी ग्रामस्थांनी त्या पोलिसांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी करूनही पोलीस चालढकल करत होते. या घटनेची विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांना माहिती समजताच त्यांनी तातडीने संबंधित पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक, डि.वाय.एस.पी यांच्याशी संपर्क केला. मात्र त्यांनी प्रतिसाद न दिल्याने सोलापूर ग्रामीणच्या जिल्हा पोलीस प्रमुखांकडे तक्रार करून त्या पोलिसांविरूध्द ३०२ चा गुन्हा दाखल करण्याची आणि त्यांना निलंबित करण्याची मागणी केली. त्यानंतर जिल्हा पोलिस प्रमुखांनी स्वतः यात लक्ष घालून या दोन्ही पोलिसाविरुद्धात खुनाचा गुन्हा दाखल करण्याच्या सूचना माढा पोलिसांना दिल्या. आता गुन्हा दाखल झाला असून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई सुद्धा करण्यात आली आहे. दरम्यान न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे मयत प्रदिपचे इन-कॅमेरा शवविच्छेदन करण्याची मागणी ही मुंडे यांनी लावून धरल्याने सोलापुरच्या रूग्णालयात पुन्हा इन-कॅमेरा शवविच्छेदन करण्याची प्रक्रिया आज सायंकाळ पर्यंत सुरु होती.

वाचा – ऊसतोंडणी कामगाराचा मुलगा ते ‘पुढारी’चा मालक!

दरम्यान सदर घटनेबाबत प्रसिध्दी माध्यमांशी बोलतांना धनंजय मुंडे यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली. रक्षणकर्ते पोलिसच ऊसतोड मजुरांच्या जिवावर का उठले आहेत? असा संतप्त सवाल त्यांनी केला. ऊसतोड मजुरांना सरकार कोणत्याही सोई-सवलती, सुविधा देत नाही. ऊस तोड कामगार महामंडळाचाही पत्ता नाही, या मजुरांना साधी सुरक्षाही मिळू नये आणि पोलिसांच्या मारहाणीतच त्यांचा मृत्यू व्हावा, ही अतिशय दुर्देवी घटना असून ऊस तोड मजुरांवर होणार्‍या या अन्यायाबद्दल आपण सरकारला जाब विचारणार असल्याचेही ते म्हणाले. या पोलिसांनी आवाज वाढवला म्हणून नव्हे तर हप्ता वसुलीसाठी या मजुराच्या वाहनाला अडवले, असा आरोपही मुंडे यांनी केला आहे. या प्रकरणी अधिक सखोल चौकशी करून वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांवरही कारवाई करण्याची मागणी मुंडे यांनी केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -