CoronaCrisis: मुंबईत एकूण ५२ पॉझिटिव्ह तर राज्यात १२५ करोनाबाधित रुग्ण

Mumbai
corona virus
प्रातिनिधिक छायाचित्र

राज्यात करोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १२५ झाली असून एका दिवसांत पुन्हा एकदा ३ नवीन रुग्णांची भर झाली आहे. तर, मृतांचा आकडा ४ वर पोहोचला आहे. यात सकारात्मक बाब म्हणजे आतापर्यंत एकूण १८ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. दरम्यान, करोनामुळे आणखी एका महिलेच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. शिवाय, एकूण जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून पुण्यातील ५ , मुंबईतील १२ आणि संभाजीनगरमधील येथील एकाला डिस्चार्ज देण्यात आला आहे.

या तीन नवीन रुग्णांमध्ये मुंबई, सिंधुदुर्ग आणि नागपूर येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. गोवंडी येथील मधुमेह आणि उच्च रक्तदाबाचा त्रास असणाऱ्या एका ६५ वर्षीय महिलेने टंडन हॉस्पिटल, डी.वाय.पाटील हॉस्पिटल अशा दोन हॉस्पिटलमधून उपचार घेतले. त्यानंतर, वाशी येथील जनरल हॉस्पिटलमध्ये २४ मार्चला अत्यंत गंभीर अवस्थेत दाखल झाली. त्याच दिवशी रात्री या महिलेचा मृत्यू झाला. ती करोना बाधित असल्याचे प्रयोगशाळा अहवालावरुन बुधवारी स्पष्ट झाले. तिच्या परदेश प्रवासाबाबत अथवा इतर संपर्काबाबत माहिती घेण्यात येत आहे. आजच्या नवीन बाधित रुग्णांपैकी सिंधुदुर्गचा रुग्ण हा एका करोना बाधित रुग्णाचा सहवासित असून त्याने या रुग्णासोबत एकाच डब्यातून रेल्वे प्रवास केल्याचे समजते. नागपूरच्या बाधित रुग्णाने दिल्ली येथे प्रवास केला होता पण, त्याने परदेश प्रवास केल्याचे स्पष्ट झालेले नाही.

कस्तुरबात करोनाचा आणखी एक मृत्यू

मुंबईतील कस्तुरबा हॉस्पिटलमध्ये ६३ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. महिलेला करोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं होतं. पण, तिच्या मृत्यूचं नेमके कारण आम्ही तपासत आहोत अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. दरम्यान, मुंबईसह उपनगरातील १५ करोनाग्रस्तांची नोंद करण्यात आली आहे. राज्यात आज एकूण २६९ जण विविध हॉस्पिटलमध्ये दाखल झाले आहेत. १८ जानेवारी पासून ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे आढळल्याने राज्यातील वेगवेगळ्या विलगीकरण कक्षात आज पर्यंत ३हजार २४३ जणांना भरती करण्यात आले आहे. आजपर्यंत भरती करण्यात आलेल्यापैकी २हजार ७५० जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर १२५ जण पॉझिटिव्ह आले आहेत. नवीन करोना विषाणू आजार प्रतिबंध आणि नियंत्रण पूर्वतयारी म्हणून राज्यात सर्व जिल्हा रुग्णालये तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये विलगीकरण स्थापन करण्यात आले आहेत.

जिल्हा / मनपा बाधित रुग्ण  आणि मृत्यू

पिंपरी चिंचवड मनपा – १२ | ०
पुणे मनपा – १८ | ०
मुंबई – ४९ | ४
सांगली – ९ | ०
नवी मुंबई , कल्याण डोंबिवली – ६ | ०
नागपूर – ५ | ०
यवतमाळ – ४ | ०
अहमदनगर, ठाणे प्रत्येकी – ३ | ०
सातारा, पनवेल प्रत्येकी – २ | ०
उल्हासनगर, औरंगाबाद, रत्नागिरी, वसई विरार,पुणे ग्रामीण, सिंधुदुर्ग प्रत्येकी – १ | ०

एकूण – १२५ | 4

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here