घरमहाराष्ट्रनाशिकशासकीय इमारतींकडेच १५ कोटींची थकबाकी

शासकीय इमारतींकडेच १५ कोटींची थकबाकी

Subscribe

करवसुलीसाठी पालिकेने कसली कंबर, थकीत रकमेवर चक्रवाढ व्याज लावल्याने सरकारला भुर्दंड

श्रीधर गायधनी, नाशिकरोड

महापालिका आर्थिक अडचणींचा सामना करत असताना शासनाच्या विविध विभागांकडेच कोट्यवधींची घरपट्टी व सेवाकर थकल्याची बाब पुढे आली आहे. एकट्या नाशिकरोड भागातील शासकीय इमारतींकडे घरपट्टीपोटी १५ कोटी ३१ लाखांची थकबाकी असून, महापालिकेने वसुलीसाठी कंबर कसली आहे. मात्र, हा कर वेळेवर न भरल्याने महापालिकेने थकबाकीवर चक्रवाढ व्याज लावल्याने शासनाला मोठा आर्थिक भुर्दंड बसला आहे.

- Advertisement -

थकबाकीदार मालमत्तांमध्ये नाशिकरोडच्या एस.टी., रेल्वे स्थानक प्रशासकीय इमारत, करन्सी नोट प्रेस, करन्सी नोट प्रेस प्रशासकीय इमारत, भारतीय डाक कार्यालय, बी.एस.एन.एल., मध्य रेल्वे अशा विविध कार्यालयांच्या इमारतींचा समावेश आहे. गेल्या आर्थिक वर्षाची १४ कोटी २२ लाख ४३ हजार थकीत घरपट्टी होती. त्यात नव्याने २०१९-२० या आर्थिक वर्षाची २ कोटी ६ लाख २७ हजारांची घरपट्टी व सेवाकर थकलेला आहे. अशी एकूण १५ कोटी ३१ लाखांची थकबाकी आहे. गेल्या तीन ते चार वर्षांपासून शासकीय कार्यालयांकडून घरपट्टी व सेवाकर भरला गेला नसल्याचे पालिका सूत्रांनी सांगितले. कर वेळेवर देणे बंधनकारक असताना शासनाकडून वेळेवर निधी उपलब्ध होत नसल्याचे कारण काही शासकीय कार्यालयांतून दिले जात आहे.

शासनाने जो कर येणे बाकी आहे अशा थकीत रकमेवर प्रतिमाह २ टक्के व्याजाची रक्कम अतिरिक्त भरावी लागत आहे. परंतू, थकीत रकमेमुळे शासनालाही याचा भुर्दंड भरावा लागत आहे. मुद्दल न भरल्याने पुढील वर्षी व्याजाची रक्कम पुन्हा एकदा मुद्दलमध्ये समाविष्ठ झाल्याने शासनाला अतिरिक्त आर्थिक झळ पोहोचते आहे. महापालिकेच्या नाशिकरोड विभागीय अधिकारी डॉ. दिलीप मेनकर यांच्या पथकाने करवसुलीसाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू केले आहेत.

..अन्यथा चक्रवाढ व्याज

कराच्या थकीत रकमेत व्याज मोठ्या प्रमाणावर आहे. सध्या अभय योजनेंंतर्गत ठराविक मुदतीत थकबाकी भरल्यास त्यावरील व्याजाच्या रकमेत सुरवातीला ७५ टक्के व मुदतीनंतर ५० टक्के सवलत आणि उशीरा भरल्यास केवळ २५ टक्के सवलत देण्यात येणार आहे. थकबाकीदारांनी या योजनेचा लाभ घ्यावा. मार्चअखेर थकबाकी न भरल्यास या व्याजाच्या रकमेवर चक्रवाढ व्याज लागणार आहे. डॉ. दिलीप मेनकर, विभागीय अधिकारी, महापालिका, नाशिकरोड

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -