घरमहाराष्ट्रनाशिकवाहन उद्योगाला मंदीचा ब्रेक

वाहन उद्योगाला मंदीचा ब्रेक

Subscribe

घटत्या विक्रीमुळे शेकडो कंपन्यांसह ६० हजारांवर कामगारांपुढे संकट

जगभरातील मंदीच्या सावटाने भारतातील वाहन उद्योगालाही घेरले असून, नाशिकमधील वाहन उत्पादक कंपनी महिंद्रा अँड महिंद्रा, टायर उत्पादनात अग्रेसर सीएटी आणि स्पार्क प्लग निर्माती मायको यांसारख्या बड्या कंपन्यांनाही हजारो कोटींचा फटका बसला आहे. या कंपन्यांमधील उत्पादन कमी झाल्याने त्यावर अवलंबून असलेल्या शेकडो लघुउद्योगांसह त्यातील सुमारे ६० हजार कर्मचार्‍यांपुढे मोठे संकट पुढे राहिले आहे.

सातपूर, अंबड या नाशिकमधील औद्योगिक वसाहतींसह जिल्ह्यातील सिन्नर, गोंदे, इगतपुरी आणि दिंडोरी येथेही वाहन उद्योगासाठी आवश्यक सुटे भाग बनवणार्‍या शेकडो कंपन्या आणि त्यात तब्बल ६० हजारांवर कामगार कार्यरत आहेत. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून मंदीचा प्रभाव वाढत असल्याने, वाहन उत्पादक कंपन्यांसह त्यांच्यावर अवलंबून असलेल्या लघुउद्योगांनाही मोठा आर्थिक फटका बसतो आहे. नाशिकमध्ये महिंद्रा अँड महिंद्रा या कंपनीमधून दररोज सुमारे पाचशे वाहनांचे उत्पादन होते. मात्र, गेले काही दिवस ही संख्या शंभरावर येऊन ठेपली होती. याशिवाय याच क्षेत्रावर अवलंबून असलेल्या मायको, बॉश, सीईएट अशा बड्या कंपन्यांनाही मंदीची झळ सहन करावी लागते आहे.

- Advertisement -

वाहन उद्योगाचे आर्थिक गणित हे जागतिक अर्थव्यवस्थेशी निगडीत असल्याने त्याचा थेट परिणाम भारतातही झाला आहे. अशा परिस्थितीत वाहनांच्या किंमती कमी होतील, आगामी सणासुदीच्या दिवसांत आकर्षक ऑफर्सद्वारे भरघोस सवलती मिळतील अशा विविध कारणांमुळे ग्राहक वाहनखरेदीचा मुहूर्त लांबणीवर टाकताना दिसतो आहे. शिवाय, काही ग्राहकांची इच्छा असूनही आर्थिक पूर्ततेअभावी वाहनखरेदी शक्य होत नाही. यामुळे शोरुम्समध्ये उपलब्ध वाहनांची अपेक्षित विक्रीही थांबली आहे. परिणामी वाहन उत्पादक कंपन्यांनी त्यांचे उत्पादन कमी केले आहे. तर, काही कंपन्यांनी ले-ऑफ घेत उत्पादन थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. भारतात वर्षाकाठी सरासरी ३० लाख वाहनांची निर्मिती होते. मात्र, मंदीमुळे हे उत्पादन ६० टक्क्यांवर आले आहे. त्यावर आधारित साडेतीन लाख रोजगारदेखील कमी झाले आहेत.

बदलत्या धोरणांसह इलेक्ट्रीक वाहनांचा धसका

मर्यादित इंधनसाठे आणि प्रदूषणाच्या समस्येवर मात करण्यासाठी भारतातही इलेक्ट्रिक वाहनांची (ईव्ही) नांदी झाली आहे. पारंपरिक इंधनावरील वाहनांच्या तुलनेत ईव्हीच्या किंमती जवळपास दुप्पट असल्या तरीही, लगेचच सर्व वाहने इव्हीमध्ये बदलणे शक्य नसल्याने या वाहनांचा धसका वाहन उत्पादक कंपन्यांनी घेतला आहे. याशिवाय प्रदूषणाशी निगडीत निकष पुढील वर्षी बीएस-४ वरून बीएस-६ केले जाणार असल्याने, त्याचा मोठा फटका कंपन्यांना बसेल. जी वाहने हा निकष लागू होण्यापर्यंत विकली जाणार नाहीत, त्यांच्या रुपाने कंपन्यांना नुकसान सोसावे लागणार आहे. या सर्वांचा परिणाम वाहननिर्मितीवर दिसतो आहे.

- Advertisement -

कंपन्यांमधील ले-ऑफ सुरूच

सातपूर औद्योगिक वसाहतीमधील सीएट, महिंद्रा अँड महिंद्रा आणि मायको या वाहन उद्योगातील कंपन्यांमध्ये कमी अधिक फरकाने ले-ऑफ सुरूच आहे. त्याचा थेट परिणाम लघुउद्योगांवर होतो आहे. या कंपन्यांवर आधारित लघुउद्योगदेखील ले-ऑफच्या तयारीत आहेत.

मंदीची संभाव्य कारणे अशी

  1. उत्पादनाच्या तुलनेत घटलेली विक्री
  2. प्रदूषणाशी निगडीत येऊ घातलेले कठोर नियम (बीएस-६)
  3. इलेक्ट्रिक वाहनांची नांदी
  4. सणासुदीच्या दिवसांतील ऑफर्सची प्रतीक्षा
  5. वाहनांच्या वाढलेल्या किंमती

उत्पादनात ३० ते ४० टक्के घट

वाहननिर्मितीवर परिणाम झाल्याने गेल्या सहा महिन्यांचा विचार करता आमच्या कंपनीतील सुट्या भागांच्या उत्पादनातही सुमारे ३० ते ४० टक्के घट झाली आहे. वाहन उद्योगाला दिलासा देण्यासाठी सरकारनेही आता सवलती, कर या माध्यमातून सकारात्मक भूमिका घेणे आवश्यक आहे.– देवेंद्र बापट, उद्योजक, रिलायबल ऑटो टेक

वाहनविक्री निम्म्याने घटली

नोव्हेंबर २०१८ पासून वाहनांच्या विक्रीत ५ ते १० टक्क्याने घट होत गेली. जून-जुलै महिन्यात तर वाहनविक्री जवळपास निम्म्याने घटली. आम्ही ६५० वाहने विकत होतो, ही संख्या आता ३५० वर येऊन ठेपली आहे. वाढलेला वाहनविमा, जीएसटी, रोड टॅक्समुळे वाढलेल्या किंमती, नोटबंदी, बीएस-६ चा निकष अशा कारणांचा थेट परिणाम वाहन उद्योगावर झाला आहे. – दिनेश वराडे, संचालक, साची होंडा.

उद्योगांसाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार

वाहनउद्योगावरील मंदीचा लघुउद्योगांवर परिणाम झाला आहे. प्रत्येक १०-१२ वर्षांनी अशी परिस्थिती ही येत असते, त्यामुळे उद्योग आणि कामगारांनी घाबरून जाऊ नये. दिवाळीनंतर परिस्थिती बदलेल. कंपन्यांचे अधिकारी आणि निमाचे पदाधिकार्‍यांचे शिष्टमंडळ लवकरच कर कमी करण्याच्या मागणीसाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे. जेणेकरुन वाहनविक्रीत वाढ होऊन उद्योगांना बळ लाभेल. – शशिकांत जाधव, अध्यक्ष, निमा

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -