घरमहाराष्ट्रनाशिकगावठाणांचे भूमापन ड्रोनच्या सहाय्याने

गावठाणांचे भूमापन ड्रोनच्या सहाय्याने

Subscribe

जमाबंदी आयुक्तांनी घेतला आढावा

राज्यातील तब्बल चाळीस हजार गावठाणांच्या भूमापनाचे काम पुढील तीन वर्षांत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट भूमिअभिलेख विभागाने ठेवले असून प्रत्येक जिल्ह्यासाठी एक ड्रोन पथक या पद्धतीने भूमापनाचे काम विधानसभा निवडणुकीनंतर सुरू करण्यात येणार आहे. यामुळे गावाचे नमुने अचूक होतील, तसेच ग्रामपंचायतीकडे कुठल्या व किती जमिनी आहे, याची माहिती मिळू शकणार आहे.

यासंदर्भात राज्याचे जमाबंदी आयुक्त, संचालक भूमिअभिलेख एस.चोक्कलिंगम यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे जिल्हाधिकार्‍यांशी संवाद साधला. अनेक वर्षांपासून सुमारे ४० हजार गावांच्या गावठाणांचे भूमापन रखडले होते. कमी कालावधीत व जलद गतीने गावठाणाच्या भूमापनाचे काम ड्रोनच्या सहाय्याने होणार असल्याने त्यास राज्यमंत्री मंडळाने मंजुरी दिली. राज्यातील ४३ हजार ६६४ गावांमध्ये ग्रामीण भागातील शेतजमिनीच्या मालकी हक्काचा पुरावा म्हणून अधिकार अभिलेख सातबारा उतारा उपलब्ध आहे. गावठाणातील घरांचा मालकी हक्काचा पुरावा म्हणून गावठाणातील भूमापन करून नकाशा व मिळकत पत्रिका दिली जाते. मात्र, महसूल विभागाकडील अपुर्‍या मनुष्यबळामुळे आतापर्यंत राज्यातील केवळ ३ हजार ९३१ गावांच्या गावठाण भूमापनाचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित ३९ हजार ७३३ गावांचे गावठाणाचे भूमापन करून प्रत्येक जागा धारकास नकाशे व मिळकत पत्रिका तयार करणे सध्याच्या मनुष्यबळाच्या व जुन्या पद्धतीनुसार केवळ अशक्य होते. त्यामुळे त्यानंतर त्वरितच भूमिअभिलेख विभागाने पुढील तयारी सुरू केली आहे. पाच वर्षांपूर्वी या योजनेला प्रारंभ झाला.

- Advertisement -

राज्यात पुरंदर तालुक्यातील सोनारी गावात सुरुवातीला पायलट प्रोजेक्ट म्हणून गावठाण जमिनींची मोजणी करण्यात आली. आता राज्यात हा प्रयोग राबवण्यात येणार आहे. यामुळे ग्रामपंचायतींमधील हद्दी निश्चित होतील. त्यांची अद्ययावत माहिती मिळेल. पडीक बिनवापराच्या आणि रेकॉर्ड नसलेल्या जमिनींचीही माहिती मिळेल. जमिनींचे वाद मार्गी लागतील. पडीक जमिनी नेमक्या कोणाच्या आहेत, याची माहिती संकलित होईल. मोकळ्या भूखंडावर विकास प्रकल्पांचे आरक्षण टाकणेही सोपे होणार आहे. महत्वाचे म्हणजे शासनाला जमिनीचा शेतसारा व इतर उत्पन्न वाढण्यास मदत होणार आहे. ग्रामपंचायत, गटकिवास अधिकारीे, तहसीलदार व भूमिअभिलेख कार्यालयाच्या कर्मचार्‍यांची याकरता मदत घेतली जाणार आहे.

सनद मिळणार

ड्रोनच्या माध्यमातून केल्या जाणार्‍या मोजणीनंतर नागरिकांना सनद मिळणार आहे. यामुळे ग्रामीण भागातील जमिनींना चांगले भाव येणार आहेत. त्याचप्रमाणे गावठाणाच्या जागेत होणारे अतिक्रमण काढणे शक्य होणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -