घरमहाराष्ट्रनाशिकहेमंत गोडसे, डॉ. भारती पवार यांचे शक्तीप्रदर्शन

हेमंत गोडसे, डॉ. भारती पवार यांचे शक्तीप्रदर्शन

Subscribe

भाजप-सेना युतीचे उमेदवार खासदार हेमंत गोडसे व दिंडोरीच्या डॉ. भारती पवार यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करत सोमवारी (दि.८) उमेदवारी अर्ज दाखल केले.

लोकसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला असून, आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत असताना भाजप सेना युतीचे उमेदवार खासदार हेमंत गोडसे व दिंडोरीच्या डॉ. भारती पवार यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करत सोमवारी (दि.८) उमेदवारी अर्ज दाखल केले. उमेदवारी अर्ज सादर करण्यापूर्वी निघालेल्या रॅलीत पालकमंत्री गिरीश महाजन, शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत, राज्यमंत्री दादा भुसे यांसह आमदारांनी सहभागी होऊन कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवला.

उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मंगळवारी (ता. ९) अंतिम दिवस असल्याने उमेदवारांमध्ये आता चुरस वाढली आहे. सोमवारी रणरणत्या उन्हात कार्यकर्त्यांच्या ओसंडून वाहणार्‍या उत्साहाला मुंबई येथील प्रति मोदी विकास महंते हे रॅलीत सहभागी झाल्याने कार्यकर्त्यांचा उत्साह द्विगुणीत झाला होता. कपाळी केसरी गंध, डोक्याला भगवी पट्टी अन हातातील भगवे झेंडे फडकावत युती सरकारचा विजय असो, बाळासाहेब ठाकरे की जय, नरेंद्र मोदी आगे बढो, हम तुम्हारे साथ है, सबसे न्यारा गोडसे हमारा, जय शिवाजी, जय भवानी या घोषणांनी परिसर दणाणून सोडला. रॅलीच्या गर्दीमुळे शहराच्या मध्यवर्ती बाजारपेठेतील वाहतूक कोलमडून पडली होती. दिसायला हुबेहूब मोदीच वाटणारे मुंबईस्थित विकास महंते अभिवादन करत असल्याने मोदींना आपण प्रत्यक्ष पाहात आहोत, असा आनंद प्रेक्षकांच्या चेहर्‍यावर झळकत होता.

- Advertisement -

सकाळी अकराच्या सुमारास खासदार गोडसे यांनी जवळील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत रॅलीला प्रारंभ झाला. यावेळी कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करत ढोल-ताशांचा गजर केला. बी. डी. भालेराव हायस्कूलपासून मार्गस्थ झालेली रॅली गंजमाळ सिग्नल, त्र्यंबक दरवाजा, भद्रकाली, संत गाडगे महाराज चौक, मेनरोड, धुमाळ पॉईंट, रविवार कारंजा, रेडक्रॅास, महात्मा गांधी रोड, मेहर सिग्नलमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर दाखल झाली. या रॅलीत शिवसेनेचे संपर्क प्रमुख भाऊसाहेब चौधरी, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, उपनेते बबनराव घोलप, आमदार राजाभाऊ वाजे, योगेश घोलप, देवयानी फरांदे, सीमा हिरे, बाळासाहेब सानप, जिल्हा बँकेचे अध्यक्ष केदा आहेर, डॉ.आत्माराम कुंभार्डे, भाजपचे जिल्हाध्यक्ष दादा जाधव, मनपातील विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, सुधाकर बडगुजर, विनायक पांडे, दत्ता गायकवाड, सचिन मराठे, महेश बिडवे, विलास शिंदे, महापौर रंजना भानसी, मनपाचे सभागृह नेते दिनकर पाटील, वसंत गिते, विजय साने, महेश हिरे, सुनील बागूल, सुनील आडके, सिन्नरचे नगराध्यक्ष किरण डगळे, गोविंद लोखंडे, रिपाईंचे सुनील रोकडे, काशिनाथ भालेराव यांसह कार्यकर्ते सहभागी झाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -