घरमहाराष्ट्रनाशिकअगंबाई सासूबाई.. ८० वर्षाच्या अजोबांचे ६८ वर्षीय आजींशी लग्न

अगंबाई सासूबाई.. ८० वर्षाच्या अजोबांचे ६८ वर्षीय आजींशी लग्न

Subscribe

अनोख्या विवाह सोहळ्याची संपूर्ण सिन्नर तालुक्यात चर्चा; प्रगल्भ विचारसरणीचे सर्वदूर कौतूक

आयुष्याची सायंकाळ जोडीदाराच्या साथीनं घालवण्याचा अनेकांचा मनोदय असतो. दुर्देवाने जोडीदारापैकी एक साथ सोडून निघून गेल्यास उर्वरित आयुष्य एकट्याला कुंठत काढावे लागते. सिन्नर तालुक्यातील हिवरे येथील ८० वर्षाच्या अजोबांनी मात्र एकटे राहणे नाकारले आणि अकोलेमधील ६८ वर्षीय आजींबरोबर त्यांनी विवाहगाठ बांधून नव्या आयुष्याला प्रारंभ केला. या विवाहाची चर्चा पंचक्रोशीत सुरु आहे. या विवाहानिमित्त अनेकांना दूरचित्रवाणीवरील ‘अगं बाई सासूबाई’ मालिकेची आठवण झाली.

हिवरे येथील ८० वर्षीय निवृत्ती रुपवते हे सेवानिवृत्त पोस्टमास्तर आहेत. अकोले तालुक्यातील ढोकरी येथील सुमनबाई पवार या ६८ वर्षाच्या आजीबाई. या दोघांनी आयुष्याच्या उतारवयात एकत्र येण्याचा निर्णय घेत तो वास्तवातसुद्धा उतरवला. निवृत्ती रुपवते यांच्या पत्नीचे १५ वर्षांपूर्वी आजाराने निधन झाले आहे. एक मुलगा असून तो गेल्या दहा वर्षांपासून बेपत्ता आहे. दोन विवाहित मुली आहेत. अकोले तालुक्यातील ढोकरी येथील सुमनबाई पवार (६८) यांनाही दोन मुली आहेत. आयुष्याच्या उतारवयात दोघे एकटे असल्याने ओळखीच्या लोकांनी चर्चा घडवून आणली. ज्येष्ठ नागरिकांच्या या अनोख्या विवाह सोहळ्याच्या निमंत्रण पत्रिकाही छापण्यात आल्या होत्या. या चिरतरुण जोडप्याच्या विवाहसोहळा वाजतगाजत शेकडो गावकर्‍यांचा साक्षीने पार पडला. सध्या एका खासगी वृत्तवाहिनीवर गाजत असलेल्या ‘अगंबाई, सासूबाई’ या मालिकेचा वास्तवातील अनुभव यानिमित्ताने हिवरेकरांना अनुभवयास मिळाला. सुमनबाई यांचे पुतणे चंद्रकांत पवार यांनी हा विवाहसोहळा जुळवून आणण्यात महत्त्वाची जबाबदारी उचलली. प्रगल्भ विचारसरणीतून दोन्ही कुटुंबियांना विश्वासात घेऊन हा निर्णय घेतल्याचे पवार यांनी सांगितले. या विवाहसोहळ्याला सुमनबाई यांच्या दोन्ही मुली आणि नातेवाइक मोठ्या संख्येने उपस्थित होते. विवाहाची रजिस्टर नोंदणी व्हावी यासाठी पत्रिकासुद्धा छापण्यात आल्या. वयोवृद्ध नागरिकांना अनेकदा कुटुंबियांकडून अडगळ म्हणून बघितले जाते. त्यातूनच शेवटी त्यांना वृद्धाश्रमाची वाट धरावी लागते. त्यामुळेच उतारवयातील हा विवाहसोहळा चर्चेचा विषय ठरला.

- Advertisement -

भगवान गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आशीर्वाद

समाजमान्यता मिळविण्यासाठी विवाहबद्ध आम्ही ज्येष्ठ नागरिक आमच्या जीवनाच्या सायंकाळी परस्परांना आधार देण्यासाठी आणि भविष्यकालीन जीवन समृद्ध करण्यासाठी… परस्परांचे स्वप्न, प्रेरणा आणि इच्छापूर्ततेसाठी उभयतांच्या संमतीने विवाहबद्ध होत आहोत. तथागत भगवान गौतम बुद्ध आणि बोधिसत्त्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आशीर्वाद सोबत घेऊनच या अनोख्या नावीन्यपूर्ण जीवनात आम्ही समस्त समाजबांधवांच्या शुभेच्छा आणि समाजमान्यता मिळविण्यासाठी विवाहबद्ध होत असल्याचे या जोडप्याने यावेळी सांगितले.

पंधरा वर्षापूर्वी माझ्या पत्नीचे निधन झाले. त्यानंतर मुलगाही घर सोडून निघून गेला. मला एकट्याला जगताना प्रचंड वेदना होत होत्या. एकट्याला घर खायला निघायचे. शिवाय स्वयंपाकापासून धुणे-भांड्यापर्यंतची कामे करण्यास हातभार लावणारेही कुणी नव्हते. त्यामुळे ही कामे करताना दमायला होत होते. त्यामुळे या वयातही लग्न करण्याचा विचार केला. योगायोगाने साजेशी अशी जोडीदार मला मिळाली.

–    निवृत्ती रुपवते

मी निराधारासारखं आयुष्य जगत होते. मिळेल ते काम करायचे आणि पैसे मिळाले तर पोट भर जेवायचे अशी माझी दैनंदिनी होती. यातून सुटका मिळवण्यासाठी मला सिन्नरचे स्थळ सुचवण्यात आले. मुलगा बघण्याच्या कार्यक्रमातच मी होकार दिला. त्यांचा होकार मिळताच बुद्धविहारमध्ये लग्नाचा कार्यक्रम केला.

–    सुमनबाई पवार

 

अगंबाई सासूबाई.. ८० वर्षाच्या अजोबांचे ६८ वर्षीय आजींशी लग्न
Hemant Bhosalehttps://www.mymahanagar.com/author/bhemant/
गेली २० वर्षांपासून पत्रकारितेत. अंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय राजकीय घडामोडींवर सातत्याने लेखन. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -