घरCORONA UPDATEरेल्वेनंतर आता एसटी आखतेय नॉन फेअर योजना

रेल्वेनंतर आता एसटी आखतेय नॉन फेअर योजना

Subscribe

प्रवासी भाडे व्यतिरिक्त एसटीचा महसूल कसा वाढेल, यावर विचार सुरु आहे.

कोरोनामुळे एसटी महामंडळाच्या आर्थिक डोलारा पूर्णता कोसळला असून कोट्यावधी रुपयाचा तोटा झाल्याने लालपरीचे भविष्य धोक्यात आले आहे. त्यामुळे आर्थिक अडचणीवर मात करण्यासाठी आणि एसटीचे महसूल वाढविण्याकरिता एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक व  इतर अधिकारी वर्गामध्ये सध्या बैठकीचे जोरदार सत्र सुरु आहे. ज्यात प्रवासी भाडे व्यतिरिक्त एसटीचा महसूल कसा वाढेल, यावर विचार सुरु आहे. भारतीय रेल्वेने महसूल वाढविण्यासाठी न्यू इनोव्हेटिव्ह नॉन फेअर रेव्हेन्यू आयडीयाज स्कीम राबविली होती. त्याच प्रमाणे एसटी महामंडळ सुद्धा अशाच प्रकारची योजना आखत असल्याची माहिती मिळत आहे.

लॉकडाऊनमुळे एसटी महामंडळाला गेल्या दोन महिन्यापासून तब्बल १५०० कोटी पेक्षा जास्त रुपयाचे नुकसान झाले आहे. लॉकडाऊनमुळे फक्त अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी मुंबई, ठाणे आणि पालघर या विभागातील एसटी बसेसच्या विशेष फेऱ्या धावत आहे. आता राज्याच्या रेड आणि कंटेनमेट झोन वगळता एसटीची जिल्हातंर्गत वाहतुक हळूहळू पूर्व गतीवर येत आहे. ही वाहतुक करताना सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यासाठी फक्त २२ प्रवासी बसमध्ये घेतले जाते. त्यामुळे महामंडळाचा तोटात आणखी भर पडणार आहे. या कोरोनामुळे एसटी महामंडळा संचित तोटा सुद्धा आता ६ हजार कोटीच्या घरात गेला आहे. त्यामुळे एसटी महामंडळ महसूल वाढविण्यासाठी युद्धपातळीवर निर्णय घेत आहे. नुकतेच एसटी महामंडळाने तातडीने निर्णय घेऊन एसटीतून मालवाहतूक क्षेत्रात उतरली आहे. त्याला प्रतिसाद सुद्धा मिळत आहे. आता इतर पर्यायांवर एसटी महामंडळाकडून विचार विनमय सुरु आहे. एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यस्थापकीय संचालक शेखर चन्ने आणि इतर विभागाचे महाव्यस्थापक सध्या राज्यातील एसटी महामंडळाचा आढावा घेत आहे. तसेच प्रवाशांना व्यतिरिक्त महसूल वाढण्याकरिता एसटी महामंडळ भर देत आहे. भारतीय रेल्वेने ज्यापद्धतीने नॉन फेअर योजना आखून महसूल वाढविण्यास सुरुवात केली होती. त्याच धर्तीवर एसटी महामंडळ सुद्धा आपल्या एसटी आगारात, बस स्टॉप आणि महामंडळाच्या मोकळ्या जागेचा पुरेपूर वापर करून महसूल वाढविणार आहे.

- Advertisement -

एसटीचे आर्थिक गणित

एसटी महामंडळाचे वार्षिक अर्थसंकल्प २०२०-२१ साधारण १० हजार कोटींचा आहे. प्रवासी उत्पन्न (सवलतीची रक्कम सह) व इतर उत्पन्नाचे स्त्रोत धरुन फक्त ७ हजार ८०० कोटी इतका महसूल जमा होईल अशी आशा आहे. या महसूलातून  वेतनावर सुमारे ३ हजार ५०० कोटी वार्षिक खर्च होणे अपेक्षित आहे. इंधनावर (डिझेल व ऑईल) साधारण ३ हजार कोटी वार्षिक खर्च होईल. स्पेअर पार्टला व टायरला साधारण  ६०० कोटी इतका खर्च येतो. हा खर्च अनिवार्य आहे. तसेच शासन एसटीच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेला २७ प्रकारच्या सवलती देत आहे .या सवलती पोटी मिळणारी प्रतिपूर्ती रक्कम ही वर्षाला सुमारे १८०० कोटी रुपयांच्या घरात आहे. एसटीच्या हमखास उत्पन्नाचा तो एक मुख्य स्त्रोत आहे. परंतु नुकत्याच सुरू झालेल्या लाॅकडाऊनमुळे सवलतीची प्रतिपूर्ती रक्कम मिळणेही बंद होणार आहे.

बसेसची संख्या = १८ हजार ६००
कर्मचारी संख्या =  १ लाख ३ हजार
एसटीचे विभाग = ३१
आगार = २५०
मार्गस्त बस स्टॉप = ३ हजार

महसूल वाढविण्यासाठी एसटी महामंडळाकडून अनेक पर्यायांवर विचार सुरु आहे. त्यातील योग्य पर्याय निवडून त्याचे नियोजन करावे लागणार आहे. आम्ही नुकतेच एसटी मार्फत मालवाहतूक सुरु केली आहे. त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. कोरोनामुळे सर्वच पर्याय महसूल वाढविण्यासाठी योग्य नाही. मात्र, जे योग्य आहेत त्याचे नियोजन एसटी महामंडळाकडून करण्यात येत आहे. 
– शेखर चन्ने, व्यवस्थापकीय संचालक, एसटी महामंडळ 

कोरोनाच्या या आर्थिक संकटामुळे एसटीचे आर्थिक गणित नक्की बिघडले आहे. यातून मार्ग काढण्यासाठी उत्पन्नाचे नवीन स्त्रोत शोधणे काळाची गरज आहे. त्यापद्धतीने एसटी महामंडळातील अधिकारी प्रयत्न करत आहे. 
– श्रीरंग बरगे , सरचिटणीस महाराष्ट्र एसटी  कर्मचारी काँग्रेस

Nitin Binekar
Nitin Binekarhttps://www.mymahanagar.com/author/bnitin/
गेल्या ५ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सार्वजनिक वाहतूक, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -