घरमुंबईकंत्राटदाराकडून पालिकेला चुना ! अडगळीच्या ठिकाणी रात्र निवारा केंद्र

कंत्राटदाराकडून पालिकेला चुना ! अडगळीच्या ठिकाणी रात्र निवारा केंद्र

Subscribe

रात्र निवारा केंद्र निर्माण करणे ही काळाची गरज आहे. परंतु ती बस स्थानक, रेल्वे स्थानक तसेच जिथे गरज आहे त्या ठिकाणी बांधणे अपेक्षित आहे. असे असतानाही घणसोलीत अत्यंत अडगळीच्या ठिकाणी रात्र निवारा केंद्राचे निकृष्ट दर्जाचे काम चालू आहे. याचा फायदा प्रवासी किंवा नागरिकांना होणार नसला तरी केंद्राचे बांधकाम करणाऱ्या कंत्राटदाराला होणार आहे.

केंद्राच्या बांधकामासाठी मनपाने निर्गमित केलेल्या साहित्याऐवजी कमी दर्जाचे साहित्य ठेकेदार व अभियंता यांच्या संगनमताने वापरले जात आहे. त्यामुळे पालिकेचा यासाठी होणारा खर्च पाण्यात जाणार असल्याचे व्यवसायाने अभियंता असणाऱ्या प्रवीण चारी यांनी सांगितले.

- Advertisement -

घणसोली येथे मनपाच्या वतीने सव्वा दोन कोटी रुपये खर्च करून रात्र निवारा केंद्र उभारणीचे काम सुरू आहे. तळमजला अधिक दोन मजला असे इमारतीचे काम सुरू असून त्याचे काम न्यू इंडिया कन्स्ट्रक्शन कंपनीला देण्यात आले आहे.
सध्या या केंद्राचे काम प्राथमिक स्वरूपात असून, पायाभरणीचे काम सुरू आहे. परंतु अपेक्षित असे साहित्य त्यात वापरले जात नसल्याचे अभियंता प्रवीण चारी यांचे म्हणणे आहे. पायाभरणी करताना पीसीसी केली जाते. यामध्ये सिमेंट बरोबर वाळू आणि इतर साहित्य वापरले गेले पाहिजे. परंतु संबंधित ठेकेदार बिनधास्तपणे ग्रीट पावडरचा वापर करत आहे. ग्रीट पावडरमुळे अपेक्षित असे पक्के बांधकाम होत नसल्यामुळे मनपाचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होणार आहे.

वाळूऐवजी या ठिकाणी ग्रीटचा वापर होत असेल तर वाळूचा वापर करण्यास सांगतो, तसेच योग्य प्रकारची खडी वापरण्यासही सांगतो
– समीर ठाकरे, अभियंता, घणसोली विभाग कार्यालय

या ग्रीट पावडरचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये सिमेंटचा वापर कमी केला तरी समजून येत नसल्याने जास्त फायदा व्हावा म्हणून ठेकेदार मनपाच्या अभियंत्यांना हाताशी धरून अशा प्रकारचे काम करत असल्याचे चारी यांचे म्हणणे आहे. याच बांधकामात वापरण्यात येणारी खडी ही काळी व टोकदार असावी लागते. परंतु येथे वापरली जाणारी खडी गोलाकार आणि छोट्या दगडांसारखी आहे. तर या खडीत लहान लहान छिद्रे असल्याने बांधकामाला धोका आहे.

- Advertisement -

याबाबत आता आयुक्तांनी पाहणी करून संबंधितांवर कारवाई करणे गरजेचे असल्याचे चारी यांनी सांगितले. सरकारी बांधकाम करताना कामाची माहिती देणारा फलक लावणे नियमांनुसार असताना संबंधित ठेकेदारांनी अशा प्रकारचा फलक दर्शनी भागात लावलेला नसल्याचेही स्पष्ट झाले आहे.

Rashmi Manehttps://www.mymahanagar.com/author/rashmi/
गेल्या ११ वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय. प्रिंट, डिजीटल मीडियामध्ये काम करण्याचा अनुभव. मनोरंजन, सामाजिक, सांस्कृतिक विषयांवर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -