घरलोकसभा २०१९डोक्याला शॉटडोक्याला शॉट...टॉक टॉक शो!

डोक्याला शॉट…टॉक टॉक शो!

Subscribe

किचनपासून बेडरूमपर्यंत शालीन शालू नेसून वावरणार्‍या गृहलक्ष्म्यांच्या मालिका सुरू होतात. त्याच्याच आसपास न्यूज चॅनेल्सवर हमरीतुमरी सुरू झालेली असते. ह्या हमरीतुमरीला हल्ली सभ्य भाषेत चर्चा, परिसंवाद आणि डिजिटल भाषेत टॉक शो म्हणतात.

…दिवसभरात राजकारणात काहीतरी घडलेलं किंवा घडवलेलं असतं, त्याच्यावर तीन मिनिटांच्या तीन ब्रेक्समध्ये बोलाचाली करण्यासाठी ह्या टॉक शोमध्ये काही अर्धवेळ तर काही पूर्णवेळ विचारवंतांना बोलवलं जातं…

- Advertisement -

…आपल्या चेहर्‍यावर प्रचंड विद्वत्ता पांघरून ही मंडळी बसलेली असतात…त्यातल्या काहींंच्या जन्मजात उध्दट चेहर्‍यावर बेगडी नम्रतेचे, काहींच्या चेहर्‍यावर पराभव झालेला असला तरी विजयी मुद्रेचे, काहींच्या चेहर्‍यावर आपल्यालाच ह्या विश्वातलं अंतिम ज्ञान प्राप्त झाल्याचे, काहींच्या चेहर्‍यावर काठोकाठ फाजीलपणाचे तर काहींच्या चेहर्‍यावर कोण आपलं काय वाकडं करतो ते बघू असे भाव असतात…

…ह्या सगळ्या चेहर्‍यांंना पुरून उरण्याची ड्युटी चॅनेलने ज्या माणसावर सोपवलेली असते त्याला अँकर असं म्हणतात…त्याच्या पुरून उरण्याच्या ह्या ड्युटीत तो अपुरा पडायला लागला किंवा जरा जास्तच पुरून उरायला लागला की चॅनेल त्याला बदलून दुसर्‍या परिपूर्ण व्यक्तिमत्वाला बोलवतं…

- Advertisement -

…ह्यातल्या कुठल्याही टॉक शोमध्ये डावीकडून उजवीकडे किंवा उजवीकडून डावीकडे तसं सेम टू सेम घडत असतं…

…म्हणजे टॉक शोमध्ये सहभागी झालेल्या आपल्या विरूध्द विचाराच्या ज्या कुणाची चामडी लोळवायची असेल त्याला ते आमचे मित्र आहेत आणि त्यांच्या मताचा मी आदर करतो असं आधी म्हणतात…आणि मग त्याची विधीपुर्वक चामडी लोळवण्याचा लाइव्ह कार्यक्रम हाती घेतात…

…मग इकडच्या लोकांनी गुजरातची दंगल काढली की तिकडचे लोक शिखांचं हत्याकांड काढतात…म्हणजे आमचा उजवा हात माखला आहे तर तुमचा डावा हात माखला आहे असं त्यांचं म्हणणं असतं…

…अलिकडच्या लोकांनी पलिकडच्यांच्या अभिव्यक्तिस्वांतंत्र्याचा विषय काढला की पलिकडचे अलिकडच्यांची जनीपुराणी आणीबाणी उकरून काढतात…हे म्हणाले की तुमची अघोषित आणिबाणी आहे की ते म्हणतात तुमची घोषित आणिबाणी होती…

…अलिकडच्यांनी पलिकडच्यांची फॅसिस्ट अशी संभावना केली की पलिकडचे अलिकडच्यांची पुरोगामी अशी चेष्टा करतात…

…ह्यांनी त्यांची घराणेशाही काढली की ते त्यांची राजघराणेशाही काढतात…

…ह्यांनी त्यांची देशभक्ती काढली की ते त्यांचा स्वातंत्र्यलढ्यातला सहभाग काढतात…

…अरूंद गल्लीत दोन वाहनं समोरासमोर आल्यावर दोन ड्रायव्हर एकमेकांशी अरे चल रे, पहले तू जा रे अशी हुज्जत घालतात तसाच हा मामला असतो…

…ही हुज्जत घालता घालता कुणीतरी कुणाला चांगलाच खिंडीत गाठतो…आणि चांगलाच अडचणीचा प्रश्न विचारतो…असा प्रश्न विचारला आणि समोरच्याची धांदल उडाली की समोरचा ऐकू येत नाही असं म्हणत कानातली बारीक वायर नीट करण्याचा प्रयत्न करतो… एक शाश्वत सत्य तेव्हा सर्वांना कळून चुकतं की हा त्या पक्षाचा जातिवंत प्रवक्ता आहे…

…अशाच एका विचारसरणीच्या जातिवंत प्रवक्त्याचं टॉक शोमधलं आणखी एक लक्षण असतं…त्याच्याविरूध्द जेव्हा जहाल बोललं जातं तेव्हा तो टॉक शोच्या अँकरकडे न बघता आपल्या मोबाइलमध्ये बघतो…आणि वर बघितलंच तर कुत्सितपणे बघत हसतो…

…असं कुत्सित हसत हसत तो द्यायचं म्हणून उत्तर देतो…आणि तेवढ्यातच अँकर वेळ संपला म्हणून सांगत मान्यवरांचे आभार मानतो…आणि कुठेही जाऊ नका, आमचाच चॅनेल बघत राहा म्हणत टॉक शो संपवतो…

…दुसर्‍या दिवशी त्याच तिकिटावर मान्यवरांचा तोच खेळ पुन्हा सुरू होतो…
– अँकर

 

Dokyala Shot
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -