तुमच्या फोनमध्ये एजंट स्मिथ घुसलाय का पहा!

Mumbai

आपल्या सगळ्यांच्याच फोनमध्ये आपापल्या बँकांचं अ‍ॅप असतं. मोबाइलवरून एका मिनिटात बँकेचे व्यवहार होत असतात. पण तुमचा अँड्रॉइड फोन सारखा हँग होतोय का? तुम्हाला सारख्या आर्थिक गुंतवणुकीच्या जाहिराती येतात का? असं होत असेल तर तुम्हाला मोठा धोका आहे. मग समजा की तुमच्या फोनमध्ये एजंट स्मिथ शिरलाय. त्यानं तुमच्या फोनवर हल्ला केलाय. हा एक व्हायरस आहे. तो फोनमध्ये शिरून सगळे नकली वर्जन इन्स्टॉल करतो आणि तुमचे बँकेचे सगळे डिटेल्स मिळवतो. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियानं सर्व बँकांना एक ग्राहकांना सावध करायलाही सांगितलंय.

कोण आहे एजंट स्मिथ?
1999मध्ये हॉलिवूडचा अ‍ॅक्शनपट आला होता, मेट्रिक्स. त्यात एजंट स्मिथ ही व्यक्तिरेखा होती. तो व्हायरस होता. मेट्रिक्सची पूर्ण सिस्टिम बिघडवून टाकायचा. तेच नाव या व्हायरसला दिलंय. सायबर सिक्युरिटी फर्म चेक पॉइंटच्या संशोधनाप्रमाणे एजंट स्मिथनं जगभरातल्या एंड्रॉइड फोन्सवर हल्ला केलाय. भारतातल्या 1.5 कोटी फोन्समध्ये हा एजंट स्मिथ घुसलाय.

कसा करायचा सामना?
*उपयोगी नसलेले अ‍ॅप्स फोनमध्ये इन्स्टॉल करू नका
*असे अ‍ॅप्स असतील तर ते डिलिट करा
*फोनवर उगाचंच जाहिराती येत असतील तर व्हायरस स्कॅन करा
*फोनमध्ये व्हायरस असल्याचा मेसेज येत असेल तर फोन फॉरमॅट करा
*तुमचं सोशल अकाउंट, बँक अकाउंट यांचे पासवर्ड बदलत रहा
*कुठलंही अ‍ॅप गुगल प्ले स्टोअरशिवाय डाउनलोड करू नका