राज्यातही PUBG गेमचा विळखा, पालक त्रस्त

या खेळांचा प्रभाव असाच वाढता राहिला तर पुढची पिढी भावनाहीन होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही असे तज्ञांचे म्हणणे आहे.

Mumbai

देशासह राज्यातही ‘पबजी’ या गेमच्या विळख्यात  खूप मोठा तरुणवर्ग अडकला आहे. या गेममुळे मुलांच्या वेळेचा होणारा अपव्यय पालकांची डोकेदुखी बनला आहे. सातारा शहर तसेच जिल्ह्यामध्ये पबजी या व्हिडीओ गेमने तरूणाईला भुरळ पाडली आहे. कोणत्याही चौकात, महाविद्यालयात, अथवा आपल्या वैयक्तिक खोलीत आज पबजी गेम युवक, लहान मुल, तासंनतास ही गेम खेळतानाचे चित्र आहे. विविध टास्कच्या माध्यमातून मारधाड करणा-या या गेमने सध्या सर्वत्रच धुमाकूळ घातला आहे. मुलांच्या मनावर विपरित परिणाम करणारा गेम का बनविल्या जातात असा प्रश्न उपस्थित होत आहे.
यापूर्वी देखील पोकेमॉन गो, ब्लू व्हेल यासारख्या गेम्सनी मुलांना वेड लावले होते. त्यात आता पबजीची भर पडली आहे. आकर्षक व्हिज्युअल्स आणि ऍक्‍शनमुळे हा गेम सध्या तरुणाईच्या गळ्यातला ताईत बनला आहे. हा खेळ ग्रुप करुन खेळला जातो. गेम खेळण्याबरोबरच त्यात चॅटिंगही करता येते. मुळात हा खेळ अठरा वर्षांवरील मुलांसाठीच आहे. पण, त्यापेक्षा कमी वयाची मुलंही हा गेम जास्त खेळत असल्याचं दिसते. या गेममधील विविध खेळामुळे मुलांमध्ये आक्रमक स्वभाव वाढत असल्याचं निदर्शनास आलं आहे.

मुलांच्या मनावर गंभीर परिणाम

मुळात या अक्‍शनपॅक्‍ड खेळांचे मुलांच्या मनावर गंभीर परिणाम होत असतात. या खेळांचा प्रभाव असाच वाढता राहिला तर पुढची पिढी भावनाहीन होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही असे तज्ञांचे म्हणणे आहे. सोशल मिडीयाचा वापर आज तरूणाई मोठया प्रमाणावरती करत आहे. यामुळे त्यांना आकर्षित करून त्यांच्या मनावर राज्य करण्याचे काम काही मंडळी बिनधोक करत आहेत. याची आवश्‍यकता व उपयोगिता नक्की भविष्यकालीन वाटचालीसाठी उपयोगी आहे का असा साधा सरळ विचार तरूणाईने करणे काळाची गरज बनली आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here