घरफिचर्ससमृद्ध अडगळीतलं दुःख

समृद्ध अडगळीतलं दुःख

Subscribe

आपला कार्यकाळ पूर्ण करत असताना फडणवीसांनी खडसे आणि इतरांचा विरोध सिस्टमॅटिकरित्या पचवला. आपल्या खुर्चीच्या आड जो जो आला त्याला एकतर त्यांनी बाजूला केले किंवा शांत तरी केले. मग तो स्वपक्षातील असो किंवा विरोधातील. २०१४ साली सत्ता आल्यापासून राज्यात मराठा आरक्षणाचा विषय तापला होता. या तापलेल्या वातावरणात बहुजन विरुद्ध ब्राह्मण असा वाद निर्माण करण्याचा प्रयत्न राज्यात होऊ लागला. खडसेंनी कळत नकळत त्यावर प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली आणि तिथेच त्यांनी आपल्या एक्झिटची तयारी केली.

‘हिंदू वर्णव्यवस्थेत एखादी व्यक्ती घर बनवण्यासाठी आयुष्य खर्ची घालते, त्याच व्यक्तीला आयुष्याच्या शेवटी त्या घरातून बाहेर व्हावं लागतं. घराच्या दारात बसून तो उरलेल्या आयुष्यभर वाट पाहतो की आतून कधीतरी कुणी आवाज देईल. मुलगा नाही तर नातू तरी आवाज देईल. जेव्हा कुणीच आवाज देत नाही, तेव्हा तो स्वतः ओरडू लागतो. ओरडून ओरडून घसा बसतो. तो घरातही जाऊन येतो, पण तिथे त्याला कुणीही भेटत नाही. तो पुन्हा घराच्या दारात येऊन बसतो. मधे मधे तो सन्यास घेऊन तीर्थयात्रेला जाण्याची धमकी देतो आणि मग पुन्हा त्याच दारात पुढचं आयुष्य काढतो.‘एनडीटीव्ही या वृत्तवाहिनीचे पत्रकार रवीश कुमार यांच्या लेखातील हा एक उतारा आहे. ‘अकेलेपन का अंडान भोगते अडवाणी’ या लेखात रवीश कुमार यांनी लालकृष्ण अडवाणी यांच्या वर्तमान परिस्थितीबद्दल वरील उदाहरण दिले होते. राज्यातील राजकारणावर नजर टाकली तर हे उदाहरण भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना तंतोतंत लागू पडतंय, असं चित्र सध्या तरी दिसतंय.

खडसे आणि अडवाणी यांची तुलना करण्याची संधी खुद्द खडसे यांनीच दिली आहे. २०१४ साली देशात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र यांच्या नावाने कमळ फुलले. सत्ता येताच यामध्ये आपण अग्रभागी असू, अशी आशा केंद्रात अडवाणी आणि राज्यात खडसे यांना होती. मात्र, यथावकाश नव्या नेतृत्वाने दोघांनाही आपली जागा दाखवली. लालकृष्ण अडवाणी यांनी सत्य केव्हाच स्वीकारले. खडसे मात्र ते स्वीकारायला तयार नव्हते. महाराष्ट्रात तेराव्या विधानसभेचे शेवटचे अधिवेशन नुकतेच संपन्न झाले. या अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी एकनाथ खडसे यांनी केलेलं भाषण राज्याच्या राजकारणात बराच काळ चर्चेत राहील. विरोधकांनी केलेल्या आरोपांना फडणवीस सरकारमधील मंत्री उत्तर देत होते. त्यांना देवेंद्र फडणवीस क्लीन चिटही देत होते. यावर उद्विग्न होत खडसे यांनी आपल्या भावना मांडल्या. ‘प्रत्येकाला क्लीन चिट मिळतेय. मग मी असा कोणता मोठा अपराध केलाय की ज्याची शिक्षा मला मिळत आहे. कदाचित मी २८८ आमदारांमध्ये सर्वात भ्रष्ट मंत्री असेन म्हणून मला वेगळं टाकलं गेलंय. मागच्या चार वर्षात भ्रष्ट असल्याचा डाग उरावर घेऊन मी जगतोय. आता जाता जाता तरी मुख्यमंत्री साहेब हा डाग धुवून टाका’, असा आर्जव खडसे यांनी केला.

- Advertisement -

खडसे यांचं नेमकं काय चुकलं? ज्याची त्यांना एवढी मोठी शिक्षा मिळाली. मोठी यासाठी की चाळीस वर्ष ज्या पक्षासाठी रात्रंदिवस झटून काम केलं, त्याच पक्षाने सत्तेत आल्यानंतर त्यांना वाळीत टाकलं. नुसतं वाळीत टाकलं नाही तर त्यांच्यामागून इतर पक्षांतून आलेल्या नेत्यांना मंत्रिपद देऊन खडसेंना खिजवलंदेखील. खडसेंनी मुख्यमंत्र्यांना चँलेज केलं, ही एकच चूक त्यांची झाली का? तर असं अजिबात नाही. खडसेंनी मुख्यमंत्र्यांना चँलेज करताना जातीचा आधार घेतला, ही त्यांची चूक झाली. तसं म्हणायला गेलं तर पंकजा मुंडेदेखील स्वतःला जनतेच्या मनातील मुख्यमंत्री म्हणवून घेतात, पण त्यांच्याकडून एक खाते काढून घेण्यापलीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फार मोठी करावाई केली नाही. पकंजा मुंडे यांनादेखील तो सिग्नल लगेच कळला आणि त्यांनी पुढे कधीच फडणवीसांना आव्हान दिले नाही, पण खडसेंना हे करता आलं नाही.

वसंतराव नाईक यांच्यानंतर पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणारे देवेंद्र फडणवीस हे पहिले मुख्यमंत्री ठरलेत. हा कार्यकाळ पूर्ण करत असताना फडणवीसांनी खडसे आणि इतरांचा विरोध सिस्टमॅटिकरित्या पचवला. आपल्या खुर्चीच्या आड जो जो आला त्याला एकतर त्यांनी बाजूला केले किंवा शांत तरी केले. मग तो स्वपक्षातील असो किंवा विरोधातील. २०१४ साली सत्ता आल्यापासून राज्यात मराठा आरक्षणाचा विषय तापला होता. या तापलेल्या वातावरणात बहुजन विरुद्ध ब्राह्मण असा वाद निर्माण करण्याचा प्रयत्न राज्यात होऊ लागला. खडसेंनी कळत नकळत त्यावर प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली आणि तिथेच त्यांनी आपल्या एक्झिटची तयारी केली. पुढे दाऊदच्या पत्नीशी फोनवरून बोलणं, पीएचं खंडणी प्रकरण आणि भोसरीच्या जमीन खरेदी प्रकरणाने त्यांची विकेट घेतली. या तीनही प्रकरणाची सखोल चौकशी झाली असून, त्यातून काहीच निष्पन्न झाले नसल्याचे खडसे यांनी शेवटच्या दिवशी सांगितले. तरिही मुख्यमंत्र्यांनी सर्वांना दिली ती क्लीन चिट खडसेंना दिली नाही. खडसेंनी ही रुख रुख अधिवेशनाच्या शेवटी बोलून दाखवली.

- Advertisement -

आपल्या वीस मिनिटांच्या भाषणात खडसेंनी आपल्यावरील सर्व आरोप कसे खोटे होते, हे बेंबीच्या देठापासून ओरडून सांगितले. विरोधकांसहीत सत्ताधारीदेखील त्यांच्या भाषणाने स्तब्ध झाले होते. काहींच्या तर डोळ्यात अश्रूदेखील तरळले. खडसेंच्या त्यागाचा विचार करत आजतरी मुख्यमंत्र्यांनी खडसेंना क्लीन चिट देऊन टाकावी, अशी भावना कदाचित अनेकांच्या मनात उत्पन्न झाली असावी, पण चाणाक्ष मुख्यमंत्र्यांनी मात्र ‘मी परत येणार…’ अशी कविता सादर करत खडसेंच्या मागणीला क्लीन स्विप दिला. जणू काही त्यांना पुढच्या टर्मसाठी सर्वांना संदेशच द्यायचा होता. खडसे हे एक उदाहरण म्हणून महाराष्ट्राच्या राजकारणात आता सेट झालं आहे. विरोधात गेलात तर कितीही मोठे असा, तुमचे कर्तृत्व, त्याग कितीही वरच्या पातळीचा असो, पण तुमचा खडसे होऊ शकतो. हा संदेश आता बंडाचे निशाण हाती घेणार्‍याच्या प्रत्येकाच्या मनात खोलवर रुजला असेल, हे नक्की.

रवीश कुमार यांच्या लेखाचा संदर्भ पुन्हा तपासला तर एकनाथ खडसे आणि लालकृष्ण अडवाणी यांच्या राजकीय प्रवासात बरंच साम्य दिसतं. दोघांनीही भाजपला मुख्य प्रवाहात आणून सत्तेच्या खुर्चीपर्यंत नेण्यात मोलाचा वाटा उचलला. भाजपची मातृसंस्था असलेल्या संघाचे दोघेही कार्यकर्ते. दोघेही ब्राह्मणेतर समाजातून आलेले. मात्र, तरीही स्वकर्तृत्वावर भाजपचा आधारस्तंभ बनले. मात्र, त्यांना कळस होता आले नाही. भाजपमध्ये एकेकाळी केंद्रात आणि राज्यात दोघांनीही निर्विवाद वर्चस्व गाचवणारे दोघेही आज नव्या-जुन्या नेत्यांच्या गर्दीत कुठे उभे असतात, ते कळतही नाही. त्यांच्याकडे बघूनही त्यांना न पाहिल्यासारखे केले जाते. या दोन्ही नेत्यांमध्ये आणखी एक साम्य आहे. स्वपक्षीयांनी जरी त्यांना घराबाहेर काढलं असलं तरी विरोधकांनी मात्र त्यांचा आदर राखलेला आहे. केंद्रामध्ये काँग्रेस आणि इतर पक्षांचे नेते लालकृष्ण अडवाणी यांना आजही वंदन करतात, तर राज्यातील विविध पक्ष खडसेंना आदर देतात. मागच्या एका अधिवेशनात राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी ‘कटप्पाने बाहुबली को क्यु मारा’ असा प्रश्न सभागृहात मुख्यमंत्र्यांना विचारला होता. विरोधक खडसेंना बाहुबली समजतात, यातच सर्व आलं.

ज्ञानपीठ पुरस्कार विजेते साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांनी ‘हिंदू – जगण्याची समृद्ध अडगळ’ अशी कादंबरी लिहिली आहे. हिंदू जातीव्यवस्थेत विभागला गेला असला तरी त्या अडगळीतही तो जगतोय. एकनाथ खडसे यांचा पक्ष आज सत्तेवर आहे. दिल्लीपासून गल्लीपर्यंत सर्वच ठिकाणी त्यांची सत्ता आहे. पक्ष समृद्ध झालाय. तरीही खडसेंसारख्या नेत्यांकडे त्या समृद्धीतही एक अडगळीत जगण्याचं दुःख वाट्याला आलंय. शेवटी खडसे आपल्या भाषणात म्हणाले की, ‘मागच्या चार वर्षात मीदेखील अनेकांच्या फाईल जमा केल्यात. कुणी कुठे काय केलं? त्याचा सर्व रेकॉर्ड माझ्याकडे आहे, पण मी तो बाहेर काढणार नाही. माझ्या वाट्याला राजकारणातून संपण्याचं जे दुःख आलं, ते इतरांच्या वाट्याला येऊ नये, असं मला वाटतं.’ खडसेंसारखा लढाऊ नेता जेव्हा सभागृहात हे बोलून दाखवतो तेव्हा त्या अडगळीत काय दुःख आहे? याचा अंदाज येतो.

Kishor Gaikwadhttps://www.mymahanagar.com/author/kishor/
एकेकाळी कार्यकर्ता होतो (कोणता ते विचारू नका) आता पत्रकार झालोय. तटस्थ वैगरे आहेच. पण स्वतःला पुरोगामी वैगरे म्हणवून घेतो. तसा राहण्याचा प्रयत्नही करतो. लिहायला, वाचायला, फिरायला आवडतं. सध्या सर्व वेळ टोरंटवर जातोय. बाकी इथे लिहितच राहिल. नक्की वाचा... आपला मित्र किशोर गायकवाड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -