घरमहाराष्ट्रनाशिकत्र्यंबकनजीक पाझर तलाव खचला; धोका टाळण्यासाठी पाण्याचा विसर्ग

त्र्यंबकनजीक पाझर तलाव खचला; धोका टाळण्यासाठी पाण्याचा विसर्ग

Subscribe

जलसंपदाच्या अधिकाऱ्यांकडून उपाययोजना, तीन गावांमधील दीड हजारांवर नागरिकांचा जीव लागला होता टांगणीला

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील बेरवळ गावातील पाझर तलाव खचून तडे गेल्याची धक्कादायक बाब सोमवारी (दि. ८ जुलै) उघडकीस आली. ही माहिती समजताच जलसंपदा विभागाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत धोका टाळण्यासाठी तातडीने पाण्याचा विसर्ग सुरू केला. या घटनेमुळे तीन गावांमधील दीड हजारांवर नागरिकांचा जीव टांगणीला लागला होता.

सोमवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास स्थानिक नागरिकांना तलावातून मोठी गळती होत असल्याचे लक्षात येताच त्यांनी जलसंपदा विभागाला यासंदर्भात माहिती दिली. रत्नागिरीतील धरण फुटल्याच्या घटनेमुळे संबंधित अधिकारी आधीच सतर्कता बाळगत असल्याने, तलावाच्या गळती होत असल्याचे समजताच पथक घटनास्थळी रवाना झाले. गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे मातीचा स्तर खचून तलावाला तडे गेल्याचे आढळून आले. या तलावाच्या प्रभाव क्षेत्राखाली धायती पाडा, काथवड पाडा आणि खडक ओहोळ असे तीन पाडे येतात. त्यांची लोकसंख्या सुमारे १ हजार ७०० असल्याने अधिकाऱ्यांनी तातडीने सांडव्यातून साडेतीन दशलक्ष घनफूट पाण्याचा विसर्ग केला. सायंकाळी उशिरापर्यंत हा विसर्ग सुरू ठेवल्याने धोका टळला. तलावाची क्षमता साडेतीन दशलक्ष घनफूट असून, पावसामुळे त्यात क्षमतेपेक्षा अधिक पाणी येऊन तो कोणत्याही क्षणी फुटण्याची शक्यता होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -