घरमुंबईशरद पवारांची चौकशी दिवाळीनंतरच; आज होणार फक्त शिष्टाचार?

शरद पवारांची चौकशी दिवाळीनंतरच; आज होणार फक्त शिष्टाचार?

Subscribe

शरद पवार आज ईडी कार्यालयात जाणार असल्यामुळे एकीकडे पोलीस यंत्रणा सज्ज झाली असतानाच पवारांची ईडी स्टाईल चौकशी होणार नसून फक्च शिष्टाचार होणार असल्याचं ईडीतल्या सूत्रांकडून समजतंय.

‘दिल्लीच्या तख्तासमोर आम्ही कदापी झुकणार नाही’, असं सरकारला ठणकावून सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्वत: ईडी कार्यालयात जाणार असल्याचं जाहीर पत्रकार परिषदेत सांगितलं. त्यासोबतच आपण जाणार तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ईडी कार्यालयाबाहेर गर्दी करून शांतता व सुरक्षाव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करू नये, असं आवाहन देखील पवारांनी केलं आहे. पोलीस यंत्रणा देखील संभाव्य परिस्थिती हाताळण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. ईडी परिसरात संचारबंदी देखील लागू करण्यात आली आहे. पण, ज्यासाठी एवढं सगळं घडतंय, तेच दिवाळीनंतर घडणार असल्याचं ईडीमधल्या सूत्रांनी सांगितलं आहे. त्यामुळे हा सगळा खटाटोप नक्की कशासाठी? असा प्रश्न उपस्थित केला जाऊ लागला आहे.


हेही वाचा – दिल्लीच्या तख्तापुढे कदापि झुकणार नाही-शरद पवार

‘पाहुणचार’ होणार, पण शिष्टाईनेच!

राज्य शिखर बँकेत झालेल्या घोटाळ्याप्रकरणी उच्च न्यायालयाने आदेश दिल्यानंतर ईडीने बँकेच्या इतर पदाधिकाऱ्यांसोबतच शरद पवार यांच्यावरही गुन्हा दाखल केला. त्यामुळे पवारांची देखील ईडी चौकशी होणार हे निश्चिच झालं. मात्र, ‘पुढचा महिनाभर मी राज्यात प्रचार करणार असल्यामुळे २७ सप्टेंबरलाच ईडीच्या कार्यालयात स्वत: हजर राहून त्यांचा ‘पाहुणचार’ मी घेणार आहे’, असं शरद पवारांनी जाहीर केलं. पण आता हा ‘पाहुणचार’ ईडीच्या कठोर चौकशीचा नसून फक्त शिष्टाचाराचा भाग म्हणून केला जाणारा पाहुणचार ठरणार आहे. शरद पवारांची चौकशी दिवाळीनंतरच केली जाणार असून आत्ता फक्त शिष्टाई म्हणून त्यांचा ईडीमध्ये सामान्य पाहुणचार केला जाईल, असं ईडीनं ठरवल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे.

- Advertisement -

राष्ट्रवादीच अडचणीत येणार होती, पण…

वास्तविक, गेल्या दोन महिन्यांत पहिल्यांदाच शिवसेना-भाजप युतीच्या चर्चेऐवजी विरोधी पक्षाच्या कुठल्या नेत्यांचं नाव इतक्या चर्चेत आल्याचं पाहायला मिळत आहे. वयाच्या ८०व्या वर्षी देखील एकहाती राष्ट्रवादीचा वारू फिरवण्यासाठी राज्यभर दौरे, भेटीगाठी करताना शरद पवार दिसत आहेत. पक्षातले अनेक दिग्गज नेते आणि मोठे चेहरे भाजप किंवा शिवसेनेत दाखल होत असताना उरलेल्या नेतेमंडळींमागे तपाससंस्थांच्या चौकशीचा ससेमिरा लागला आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाला नवी उभारी देण्यासाठी पवारांनी शिवसेना-भाजपला शिंगावर घेण्याची तयारी चालवली होती. त्यातच त्यांचंही नाव ईडीच्या यादीत आल्यामुळे सत्ताधारी गोटात आनंदाचं वातावरण दिसत असतानाच भाकरी फिरली आणि सेना-भाजप युतीच्या जागी सगळीकडे चर्चा सुरू झाली ती शरद पवारांची!


वाचा सविस्तर – शरद पवारांची प्रतिष्ठा ठरतेय उजवी!

सेना-भाजपच्या गोटात चिंता?

ईडीच्या चार्जशीटमध्ये खुद्द पवारांचंच नाव आल्यामुळे प्रकरण राष्ट्रवादीला भोवण्याची चिन्ह दिसत असतानाच पवारांनी पत्रकार परिषद घेऊन स्वत:च ईडीकडे चौकशीसाठी जाणार असल्याचं जाहीर केलं. त्यांच्याभोवती राजकीय विश्लेषक आणि सामान्य मतदारांची सहानुभूती गोळा होऊ लागली आणि सेना-भाजपच्या गोटात चिंतेचं वातावरण निर्माण झालं. यामुळेच दिल्लीत अमित शहांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या राज्यातल्या वरीष्ठ नेतेमंडळींना ‘शिवसेनेचा मान राखून युती करा’, असं सांगितल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -