घरफिचर्सआपण आणि ते....

आपण आणि ते….

Subscribe

मागील आठवड्यात एका मराठी सिने अभिनेत्रीच्या समाज माध्यमावर आलेल्या ‘वादग्रस्त’ पोस्टनंतर मराठी चित्रपट दिग्दर्शक सुजय डहाके यांच्या ‘मराठी मलिकांमध्ये विशिष्ट समूहातील मुलीच का दिसतात?’ या प्रश्नाने नवे वावदान उठलेले आहे. या मराठी अभिनेत्रीच्या समाज माध्यमावरील मजकुरात इतर धर्मीय यांनी त्यांच्या धर्माचे पालन केल्यास ते कसे योग्य आणि केवळ हिंदूंनी त्यांच्या धर्माचे पालन केल्यास ते कसे अयोग्य? याचे विश्लेषण होते. यातही ‘आपण’ आणि ‘ते’ हा फरक गडद होताच. दिग्दर्शक सुजय डहाके यांनीही एका वर्तमानपत्राच्या संवाद कार्यक्रमात नुकत्याच केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामध्येही हा फरक अधोरेखित होतो. जिथं फरक असतो तिथं भेद असतो. जिथं भेद असतो तिथं ऐक्य नसते. एकत्र असणं आणि एक असणं यात फरक कायम असतोच.

ठाणे, मुंबईतील विलेपार्ले, दादर अशा सुसंस्कृत मानल्या जाणार्‍या भागात ब्राह्मण सोसायट्या असतात. हिंदू कॉलन्या असतात. मुस्लीम मोहल्ले असतात, तर कुर्ला, मानखुर्द, गोवंडी अशा भागात मदन किंवा बेगमपुरे असतात. भीमनगर, अहिंसा नगर, छत्रपती शिवाजी महाराज कॉलनी अशा नावांच्या आजही गावपाड्यात विशिष्ट समूहांच्या वस्त्या असतात. मात्र, पुस्तकातल्या प्रतिज्ञेत हे सर्व एकाच देशाचे नागरिक असतात. आपल्या देशात विविधतेत कशी एकता आहे. याचे रसाळ वर्णन शाळेत शिकवले गेलेले असते, पण मुळात ही विविधता का असावी? केवळ एकतेने काम चालणार नाही का? या प्रश्नाचे उत्तर शाळेत शिकलेल्या अभ्यासक्रमात दिलेले नसते.

मित्रांना शत्रू बनवायचे असल्यास त्यांच्याशी राजकारणावर बोलावे, त्यानेही शत्रुत्व निर्माण झाले नाही तर धर्माचा विषय काढावा, त्यानेही वाद न पेटल्यास सामाजिक व्यवस्थेतील जात हे हुकमी हत्यार काम करेलच. नव्वदच्या दशकात आलेल्या क्रांतीवीर चित्रपटात नाना पाटेकर वस्तीतल्या एका मजुराचे बोट दगडाने ठेचून ‘हिंदू का खून और मुसलमानका खून’ तळहातावर एकत्र करतो आणि त्यातल्या रंगांचा फरक ‘त्याला’ विचारतो. त्यावेळी या संवादावर जोरदार टाळ्या पडतात. या टाळ्या पडतात ‘तेव्हा सारे भारतीय माझे बांधव’ असतात. सिनेमा संपल्यावर थिएटरच्या बाहेर येताना माझ्यातले बंधुत्व मी माझ्या सीटवर बेवारसपणे सोडून आलेलो असतो.

- Advertisement -

‘त्यांच्या’ तुलनेत ‘मी’ श्रेष्ठ आहे आणि असतोच. कारण माझी संस्कृती, माझा इतिहास याची जाणीव मला असते, मी त्याला अस्मिता म्हणत असतो. ही जाणीव मला शांत राहू देत नाही. मी मला स्वतःला इथल्या माणसांमध्ये संपूर्ण श्रेष्ठत्वाचं प्रमाणपत्र मनोमन बहाल केलेलं असतं, पण मी श्रेष्ठ असल्याचं मीच कसं सांगाव? मीच हे बोलल्यावर त्यावर शंका उपस्थित केल्या जातील, हे मला माहीत असतं. मग माझं श्रेष्ठत्व दुसर्‍या कुणीतरी ओरडून जगाला सांगावं असंच मला वाटत असतं. त्यासाठी दुसर्‍यांचा दुजोरा माझ्या मनाला आवश्यक असतो. त्यामुळे माझं श्रेष्ठत्व ठरवणारा मी नाही, तर माझा इतिहास आहे.

हे मला ओरडून सांगायचं असतं, पण मी वर्तमानात असतो. इतिहास नाही. इतिहासात माझे पूर्वज श्रेष्ठ असू शकतात. त्यांच्या इतिहासातील कर्तृत्वावर मला माझ्या वर्तमानातलं श्रेष्ठत्व उधारीनं हवं असतं. त्यासाठी माझी धडपड सुरू असते. माझ्या इतिहासकालीन कर्तृत्वाला मी माझ्या धर्म आणि जातीशी जोडलेलं असतं. इतिहासातला माझा धर्म किंवा जात वर्तमानातही कायम असते. त्यामुळे भूतकाळातलं माझं कर्तृत्व वर्तमानातही असल्याचा भ्रम मला घेरलेला असतो. कार्ल मार्क्स याच भ्रमाला अफूच्या गोळीची धुंदी म्हणतो. त्यावेळी मार्क्स मला माझा सर्वात मोठा शत्रू वाटतो.

- Advertisement -

अथेन्समधला सॉक्रेटीसही असंच काहीसं सांगून गेलेला असतो. त्याला विष पाजणार्‍यांचा मी पोटतिडकीने निषेध नोंदवलेला असतो. मात्र, हे करताना माझ्या मातीतही असे कित्येक सॉक्रेटीस गाडले गेलेले आहेत, गोळीने मारले गेलेले आहेत, हा विषय मी माझ्या अहंकारी वर्चस्ववादातून सोयीनुसार टाळलेला असतो. बुद्ध किंवा डॉ. बाबासाहेब आंबेडकर ही दोन्ही नावे माझ्यासाठी केवळ पुस्तकातल्या महापुरुषांची असतात. सहा डिसेंबरला दादरला होणारी गर्दी म्हणूनच मला त्रासदायक वाटते. इथं येणारे ‘ते’ चैत्यभूमीच्या दर्शनानिमित्त मुंबई पहायला ट्रेनने फुकटंच येतात. ही जाणीव माझ्या मनात घट्ट असते. हे असं वाटण्याचं कारण मुळातच ‘ते’ माझ्यापेक्षा काहीतरी वेगळे आहेत, असं वाटण्यात असतात, हे वेगळं वाटणं माझ्या हाडामांसी इतकं भिनलेलं असतं की त्याची आता मला जाणीवही होत नसते.

मग हे दिग्दर्शक सुजय डहाके कोण ‘ते’ कोण ‘आम्हाला’ असं बोलणारे? या ‘त्यांना’ त्यांची कर्तबगारी सिद्ध करता येतच नाही. म्हणूनच ‘आम्हाला’ बोल लावतात, असा अर्थ ‘आम्ही’ काढण्यात पटाईत असतो. आमच्या अंतर्मनात आम्ही आणि ‘ते’ हा ‘फरक’ कायम असतो. धर्म, जात आणि जमातवादाच्या समाजरचनेने जगणार्‍या बहुसंख्य माणसांच्या मनात हा फरक सुप्तावस्थेत काम करत असतो. नुकत्याच झालेल्या दिल्लीतल्या दंगलीनंतर हा फरक गडदपणे समोर आणला जातो. या वेळेस हा फरक धर्माच्या पातळीवर ‘आपण’ आणि ‘ते ’असा असतो. जातीचा विषय असल्यावर त्यात आणखी छाननीची गरज पडते. ज्यावेळी जातनिहाय फरक गरजेचा असतो तिथं एक धर्म काहीच कामाचा नसतो. आपले आणि इतर यातील सोयीनुसारचा ‘आपलेपणा’ व्यावसायिक जगात वावरताना सोयीनुसार दाखवावाच लागतो. धार्मिक दंगलकाळात धर्माच्या आधारे आपले ठरवले गेलेले जातीय दंगलीत आपसुकच वेगळे ठरवले जातात.

आपण शिवजयंतीच्या शुभेच्छा मराठा मित्रांना आवर्जून देतो. १४ एप्रिल किंवा ६ डिसेंबरला आपल्यालाला आपल्या कांबळे नावाच्या सहकार्‍याला जयभीम घालावासा वाटतो. नाताळला कार्यालयातल्या फ्रान्सिस ब्रिगेन्झाला आपण हक्काने केक आणायला सांगतो, तर रमजान ईदला आपल्याला आपल्या फोन लिस्टमध्ये असलेल्या इरफानची अचानक आठवण येते.

दिवाळी, गुढीपाडवा, नवीन वर्षातही आपण आपल्या जातीय धार्मिक अस्मिता जोपासत असतो. नव्या वर्षाला हॅप्पी न्यू इअर बोलूनही आपलं काम भागत नाही. इंग्रजी आणि मराठी नवे वर्ष अशी फोड गुढीपाडव्याच्या निमित्ताने आपल्याला करणं आवश्यक वाटतं. आपण एकत्र असतो, पण एक कधीच नसतो. आपल्यातलं वेगळेपण आपल्याला हवंहवंसं वाटतं. त्यासाठी भूतकाळात संपलेल्या इतिहासाचे आपण जागोजागी दाखले देत असतो. आपल्याला आपल्यातल्या माणसांपेक्षा आपल्यातल्या जमातवादाचा अहंकार जोपासण्याची नशा असते, या अफूच्या धुंदीतून बाहेर पडण्याची इच्छा आपल्याला नसते, कारण शुद्धीत आल्यावर आपल्याला केवळ माणूस नसल्याची आपली खरी ओळख नाकारता येणारी नसते, ही भीती त्यामागे असते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -