घरफिचर्ससोशल मीडियावरील कॉपी-पेस्ट, फॉरवर्ड व्हायरस!

सोशल मीडियावरील कॉपी-पेस्ट, फॉरवर्ड व्हायरस!

Subscribe

सध्या जगभरात करोना विषाणूमुळे आरोग्यविषयक आणीबाणी लागू झाल्याची स्थिती पाहायला मिळत आहे. अनेक नागरिकांना करोना विषाणूची लागण झाल्याच्या बातम्या यायला लागल्या. आणि सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चेला सुरुवात झाली. करोना विषाणूच्या आजाराबाबत सध्या अशा काही पोस्ट व्हायरल होत आहेत की, ज्यामुळे सामान्य नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. प्रत्येकजण वेगवेगळे सल्ले देत आहे. याबाबत सध्या हजारोंच्या संख्येने व्हिडिओ, पोस्ट, फोटो व्हायरल होत आहेत. खरेतर आज सोशल मीडिया वापरकर्त्यांना कॉपी-पेस्ट आणि फॉरवर्ड नावाच्या व्हायरसची लागण झाली की काय? हा प्रश्न पडतोय.

आपण आपल्या लहानपणापासूनच विक्रम आणि वेताळच्या गोष्टी ऐकत आलो आहोत. झाडावर बसलेला वेताळ आणि त्यानंतर राजा विक्रमच्या पाठीवर स्वार झालेला वेताळ.. विक्रमला एक-एक गोष्ट सांगतो, आणि त्यातील प्रश्नांची उकल करत असतो. उत्तर मिळाले नाही तर पुन्हा विक्रमाच्या पाठीवरच वेताळ बसून राहतो. दुसर्‍या गोष्टीला सुरुवात करतो. आजच्या स्थितीत असेच काहीसे सोशल मीडिया आणि युवक यांच्यात विक्रम-वेताळप्रमाणे साम्य पाहायला मिळत आहे. प्रश्न उपस्थित होतो त्यावेळी आजचा युवक सोशल मीडियावर त्या प्रश्नांची उत्तर शोधायला लागतो.(अर्थात काही प्रश्न सोशल मीडियाच निर्माण करत आहे.) आणि मग सोशल मीडिया नावाचा वेताळ कायम आमच्यावर स्वार होताना दिसतो.

या दशकात 70 टक्के युवक सोशल मीडियाचा वापर करत आहेत. प्रत्यक्ष कधी न भेटलेल्या लोकांसोबत या माध्यमातून संवाद साधला जात आहे. तरीसुद्धा आपण एकमेकांपासून दूर होत चाललो आहोत. याचा उल्लेख पाठी मागच्या लेखात आपण वाचला असेल. आज सांस्कृतिक आणि वैचारिक ध्रुवीकरणात आपण स्वतःला हरवून बसल्याची खंत अनेक तत्त्वज्ञ आणि विचारवंत व्यक्त करत आहेत. जगाच्या कोणत्याही ही गावात किंवा शहरात घडलेली एखादी घटना प्रकाशवर्षाच्या वेगानं इतरत्र पोहोचत आहे. त्यावर चर्चा होत आहे. पण उद्या पुन्हा नवीन विषय हातात आल्यावर कालची घटना जुनी होत आहे. सत्य-असत्य याचा विचार त्या तथ्यहीन चर्चेत मागे पडतो.

- Advertisement -

सध्या जगभरात करोना विषाणूमुळे आरोग्यविषयक आणीबाणी लागू झाल्याची स्थिती पाहायला मिळत आहे. अनेक नागरिकांना करोना विषाणूची लागण झाल्याच्या बातम्या यायला लागल्या. आणि सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चेला सुरुवात झाली. करोना विषाणूच्या आजाराबाबत सध्या अशा काही पोस्ट व्हायरल होत आहेत की, ज्यामुळे सामान्य नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. प्रत्येकजण वेगवेगळे सल्ले देत आहे. लिंबू, लसूण, मिरे लवंग खा आणि आजार पळवा… किंवा त्याचा काढा प्यायला तर करोनाची लागण होणार नाही. या आणि अशा विशेष बाबींसह करोना विषाणूंचा उगम कसा झाला.. याबाबत सध्या हजारोंच्या संख्येने व्हिडिओ, पोस्ट, फोटो व्हायरल होत आहेत. त्यामुळे ज्यांना साधी सर्दी झाली त्यांनासुद्धा या आजाराची भीती वाटत आहे. खरेतर आज सोशल मीडिया वापरकर्त्यांना कॉपी-पेस्ट आणि फॉरवर्ड नावाच्या व्हायरसची लागण झाली की काय…? हा प्रश्न पडतोय.

अनेक अफवा चवीने वाचणारे आहेत सोबतच फॉरवर्ड करणारे. पण याचा आजूबाजूच्या लोकांवर आणि एकूणच देशाच्या सामाजिक स्थितीवर मोठा परिणाम होत आहे. करोना विषाणूची लागण मांस (कोंबडीचे चिकन) खात असल्याने जास्तीत जास्त प्रमाणात होत आहे. असा एक व्हिडिओ स्वयंघोषित आरोग्य तज्ज्ञांनी पोस्ट केला. त्याचा परिणाम असा झाला की अनेक युवकांनी उभारलेले कुकुटपालन व्यवसाय बंद पडत आहेत. एकट्या महाराष्ट्रात आत्तापर्यंत साडेसहाशे कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. देशभरात चालणारा चिकन व्यवसाय डबघाईला आला. यामुळे दरडोई उत्पन्नाबरोबरच अर्थव्यवस्थेवर प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष परिणाम झालेला दिसतो. या व्यवसायाशी संबंधित युवकांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण होत आहे. सोशल मीडियावर याबाबत जनजागृती घडवण्याच्या पोस्टची नितांत आवश्यकता आहे. याचा परिणाम दृश्य नसला तरी अदृश्य स्वरूपात जास्त आहे.

- Advertisement -

आपण नेहमी म्हणत असतो की, व्हायरल जगात कोणतीच गोष्ट लपून राहात नाही. हे खरे असले तरी त्याची सत्यता तपासणारी यंत्रणा महत्त्वाची असते. कारण अशा अनेक घटना घडत असतात, ज्यांचा सामाजिक जनजीवनावर वाईट परिणाम होतो. मध्यंतरी एक पोस्ट व्हिडीओसह व्हायरल झाली होती.ती म्हणजे लहान मुलांना पकडून त्यांचे अवयव काढून विकणारी टोळी सक्रिय झाली आहे. त्यानंतर जे लोक आपला उदरनिर्वाह वेगवेगळ्या गावांमध्ये जाऊन, डोंबार्‍याचा खेळ वगैरे दाखवून करत असत त्यांच्यावर अनेकांनी हल्ले केले. मॉबलिंचींग सारखी अनेक प्रकरणे घडलेली आपण पाहिली, पण त्याची सत्यता सोशल मीडियावर तपासली गेली नाही. स्वतः वेगवेगळ्या अ‍ॅपला सरकारला सूचना कराव्या लागल्या…आणि संबंधित पोस्ट व्हिडिओ छायाचित्र काढून टाकण्याचे आदेश द्यावे लागले. अशा पोस्ट व्हायरल करणार्‍यांवर गुन्हे दाखल केले गेले. पण हे प्रमाण आजही कमी झालेले नाही.

भारतात सोशल मीडियाचा वापर चोवीस तासांपैकी सरासरी तीन तास आहे. असा एक नुकताच झालेला सर्वे सांगतो. आणि अशा लोकांच्या हातातले जग हे स्वतःभोवती असते. माझ्या जवळ असलेली माहिती इतरांपर्यंत लवकरात लवकर पोहोचली पाहिजे. याची घाई सगळ्यांनाच आहे. अशा अनेक पोस्ट आहेत ज्या विनाकारण फॉरवर्ड केल्या जातात. जसे की, एखाद्या क्रिकेटरचे दुसर्‍या क्रिकेटर सोबत वाद सुरू आहेत, सेलिब्रिटींना घेऊन त्यांचे फोटो एडिट करून पेहरावाबद्दलच्या पोस्ट, दोन राजकीय पक्षांमधील वाद, एखाद्या कवीची कविता त्याच्या नावाऐवजी दुसर्‍याच्या नावाने पसरविणे, एवढेच नाही तर एखाद्या ठिकाणी छोटेसे भांडण जरी झाले तर त्याला जातीय रंग देऊन तणाव वाढवणार्‍या पोस्ट व्हायरल होत आहेत. या आणि अशा अनेक पोस्ट आपण कळत नकळत व्हायरल करतोय. यातील काही पोस्ट मनोरंजनात्मक असतात, पण काही पोस्ट मात्र हिंसात्मक आणि गुन्हेगारी प्रवृत्तीच्या असतात.

मला असं वाटतं की सोशल मीडिया हाच आजच्या युवकांना वापरत आहे. कारण आमच्या दैनंदिन जीवनातला गुंता वाढत आहे. मनोरंजन म्हणून सोशल मीडियाचा वापर होण्याऐवजी आम्ही त्यात पूर्णपणे अडकत चाललो आहोत. सायबर क्राईमद्वारे नियंत्रण ठेवलं जात आहे. पण तोपर्यंत एखादा गुन्हा सहज घडून गेलेला असतो. तंत्रज्ञानानं समज मिळायला हवी पण गैरवर्तन नको. वापर व्हावा पण एका विशिष्ट चौकटीत… त्या चौकटीच्या बाहेर आपण जात असू तर सामाजिक आरोग्य धोक्यात येऊ शकते. हा धोका वेळीच ओळखूयात आणि व्हायरल होणार्‍या घटनांची सत्यता तपासूयात. जेणेकरून होणार्‍या परिणामांचा सामना करता येईल. अन्यथा आपली अवस्था पुन्हा राजा विक्रमासारखी होईल. जो कायम वेताळाला आपल्या पाठीवर घेऊन फिरतो. ज्याची गोष्ट संपत नाही आणि प्रश्न निर्माण करत राहतो.

-धम्मपाल जाधव

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -