घरफिचर्सएक प्रश्न अधांतरी !

एक प्रश्न अधांतरी !

Subscribe

महाराष्ट्रातील मातब्बर नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष पवार यांची एकूणच राजकीय कारकीर्द पाहिली तर ती अनेक धक्कातंत्रांनी भरलेली दिसेल. त्यांनी अनेक वेळा अनपेक्षित धक्के देऊन अल्पकालीन फायदे मिळवले, अर्थात ते फार काळ टिकले नाहीत. दिल्लीत जमलेल्या तबलिगी समाजाने देशभर जो काही नुकताच हाहा:कार उडवला आहे, त्यावर त्यांच्याविषयी बातम्या देणार्‍या प्रसारमाध्यमांना पवारांनी दोष दिला. पवारांनी ही अशी वेळोवेळी मुस्लिमांची बाजू घेतली; पण त्यामुळे मुस्लीम समाजाचा विकास किती झाला, आणि अशा भूमिकेमुळे महाराष्ट्रातील एकूणच मराठी माणसांच्या मनामध्ये पवारांनी किती सन्मानाचे स्थान मिळवले, हा प्रश्न कायमच अंधातरी राहणार आहे. पवार असे का बोलतात, त्याला मराठी समाजातील ब्राह्मण आणि ब्राह्मणेतर असा काही रंग आहे का?

राजकीय जीवनात प्रवेश केल्यानंतर आजवर एकही निवडणूक न हरलेले अशी ख्याती असलेले आणि समाजाच्या सर्व क्षेत्रात पोहोच असलेले नेते म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार ओळखले जातात. पवारांना दिल्लीतील राष्ट्रीय पातळीवरील विविध राज्यांमधील नेते मंडळी मराठा स्ट्राँगमॅन म्हणून संबोधतात. त्याचे कारण ते मराठा समाजातील आहेत आणि ज्या मराठा समाजाचा महाराष्ट्राच्या राजकारणावर प्रभाव आहे, त्याचे ते प्रमुख नेते आहेत. शरद पवार यांची उपजत हुशारी ओळखून संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी त्यांना आपल्यासोबत राजकारणात आणले. शरद पवार हे मराठा म्हणून ओळखले जात असले तरी बरेच वेळा त्यांची भूमिका ही मुस्लीमधार्जिणी किंवा मुस्लिमांचे लांगुलचालन करणारी असलेली दिसून येते. ज्या हिरीरीने पवार मुस्लिमांसाठी पुढाकार घेताना दिसतात, त्याच धडाडीने ते इतर समाजासाठी पुढे येताना किंवा वक्तव्य करताना दिसत नाहीत. अर्थात, पवारांच्या पुढाकारातून मुस्लिमांचे किती हित साधले जाते हाही एक संशोधनाचा विषय आहे.

दिल्लीत नुकतेच तबलिगी समाजाच्या मरकजचे आयोजन करण्यात आले होते. करोना विषाणूच्या प्रसाराला आळा घालण्यासाठी शासकीय पातळीवरून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. यावेळी लोकांनी सरकारला सहकार्य करण्याची आवश्यकता आहे. अशा वेळी तबलिगच्या मरकजचे आयोजन करण्यात येते. त्यासाठी देशातून तसेच विदेशातून लोक येतात. तबलिगी जमातीच्या अट्टाहासाची कटू फळे सध्या दिसत आहेत. बाहेरील देशातून आलेल्या लोकांकडून तिथे जमलेल्या जमातच्या अनुयायांना करोना विषाणूचा संसर्ग झाला.

- Advertisement -

तिथून निघालेले लोक देशाच्या विविध भागांत गेले. त्यांना शोधणे आता त्या त्या राज्य सरकारांसमोर आव्हान होऊन बसले आहे. त्यांना आपणहून पुढे येण्याचे आवाहन करण्यात येत आहे, ज्यामुळे इतरांचे जीव धोक्यात येणार नाहीत; पण त्याची ते दखल घेताना दिसत नाहीत. त्यामुळे पोलिसांनी त्यांच्याविरोधात गुन्हे दाखल केले आहेत. त्यांच्या या वागण्यामुळे देशभरातील अनेकांचे जीव धोक्यात आले आहेत. त्यांचा शोध घेण्याचे मोठे आव्हान पोलीस आणि तपास यंत्रणांसमोर उभे राहिले आहे. सगळा देश या चिंतेत पडलेला असताना खरे तर पवारांसारख्या बुजूर्ग नेत्याने या तबलिगांना ताब्यात घेण्यासाठी काही तरी आवाहन करणे अपेक्षित होते; पण त्यांनी जे वक्तव्य केले त्यामुळे लोकांना धक्काच बसला. त्यांनी तबलिगींच्या बातम्या दिल्याबद्दल प्रसारमाध्यमानाच दोष दिला.

तबलिगींचा इथला सुजान मुस्लीम विरोध करतोय; पण त्यांना पोषक असे विधान पवारांकडून होताना दिसले. दुसर्‍या बाजूला पवारांपेक्षा वयाने आणि राजकारणात अनुभवाने लहान असलेले मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या तबलिगींनी डॉक्टर आणि नर्सेससमोर केलेला नंगा नाच आणि त्यांच्यावर थुंकण्याचे केलेले प्रकार याविषयी जी कठोर भूमिका घेतली, त्यावरून पवारांचे मन हळहळले. राज ठाकरे यांनी घेतलेली भूमिका ही कठोर असली तरी जे लोक आपल्या अट्टाहासापोटी आणि आत्मघाती वृत्तीमुळे स्वत:सोबत देशाचे नुकसान करायला निघाले आहेत, त्यांना आवरायला हवे. त्यांना मोकाट सोडून चालणार नाही, हे पवारांना कळत कसे नाही? त्यामुळे अशा वेळी देशाच्या हिताचे बोलणारा राज ठाकरे यांच्यासारखा नेता केव्हाही श्रेष्ठ ठरतो. निवडणुका येतात जातात, पवारांनी सगळ्या निवडणुका जिंकल्या; पण समाजाचे मन त्यांना जिंकता आले आहे का, याचे उत्तर काळच देऊ शकेल. पण राज ठाकरे यांना निवडणुका जिंकता येत नसल्या तरी त्यांनी लोकांची मने मात्र जिंकली आहेत, यात शंका नाही. कारण तबलिगींनी जो प्रकार केला त्याविषयी सगळ्यांच्याच मनात संताप आहे.

- Advertisement -

तबलिगींच्या मेळाव्याला महाराष्ट्रातील पोलिसांनी परवानगी दिली नाही. पहा किती द्रष्टेपणा आहे, असे सांगताना हेच पवार त्यांना दिल्लीत परवानगी कुणी दिली, असा प्रश्न करून दिल्लीत पोलीस दल केंद्र सरकारचे आहे, हे बोलून मोदींना पेचात पकडायला विसरत नाहीत. महाराष्ट्रात मालेगाव प्रकरण असो, नाही तर बाबरी मशीद पतन प्रकरण असो, पवारांची भूमिका ही नेहमीच मुस्लिमांची कड घेणारी दिसून आलेली आहे. पण पवार कधीही व्यापक हिंदूंच्या किंवा मराठ्यांच्या बाजूने उतरलेले दिसत नाहीत. मराठा आरक्षणाचा विषय किती तरी वर्षे भिजत पडलेला होता, अनेक वर्षे महाराष्ट्रातील सत्तेची सूत्रे पवारांकडेच होती; पण पवारांनी त्याविषयी काही निर्णय घेतला नाही. जेव्हा देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार महाराष्ट्रात सत्तेवर आले तेव्हा त्यांच्यावर छत्रपती आणि फडणवीस असली जातीयवादी टीका करून पवार मोकळे झाले; पण मराठा आरक्षणासंबंधी ज्या हालचाली झाल्या त्या फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात झाल्या हे विसरून चालता येणार नाही.

आता राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत आहे, पवारांचा प्रभाव सरकारवर आहे, पण अशावेळी मराठ्यांना आरक्षण मिळावे यासाठी आझाद मैदानात अनेक दिवस उपोषण करून जीव तोडणार्‍या मराठा तरुणांकडे पवार फिरकलेही नाहीत. ज्या समाजाचे म्हणून ते ओळखले जातात, त्याबद्दल त्यांना मुस्लीम समाजासारखा आपलेपणा का वाटत नाही, असे मनात आल्यावाचून राहत नाही. राम मंदिरासाठी ट्रस्टची स्थापना करण्यात आली तर मग आता केंद्र सरकारने बाबरी मशिदीसाठी ट्रस्ट स्थापन करावी, अशी सूचना करून पवार मोकळे झाले. खरं तो न्यायालयाचा निर्णय होता. पवारांना इतकी तळमळ असेल तर मग ते स्वत: तशी ट्रस्ट का स्थापन करत नाहीत?

पवारांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत राष्ट्रीय पातळीवर आपल्या नेतृत्वाचा आणि पक्षाचा विस्तार करण्याचा प्रयत्न केला; पण त्यांना ते जमले नाही. त्यांच्या एकूणच धक्कादायक राजकीय वाटचालींमुळे दिल्लीत गांधी कुटुंबीयांचा विश्वास ते कधी संपादन करू शकले नाहीत. त्यामुळेच त्यांना काँग्रेस पक्षातून बाहेर पडावे लागले. महाराष्ट्रात पवार बहुजन समाजाचे नेते म्हणून ओळखले जातात. पण हिंदुत्ववाद म्हणजेच ब्राह्मणवाद असे समजून ते त्याचा विरोध करत राहिले. त्यामुळे सर्वधर्मसमभाव जोपासताना आपण ज्या समाजातून पुढे आलो, त्या हिंदू समाजाबद्दल आस्था बाळगणे आवश्यक आहे, याचा त्यांना बरेचदा विसर पडलेला दिसतो.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीतून जन्माला आलेला भाजप हा राष्ट्रीय पक्ष आपला प्रतिस्पर्धी आहे, त्यामुळे त्यांना आपण विरोध केला पाहिजे ही पवारांची भूमिका राहिली. पण त्यांना विरोध करत असताना आपण एकूणच हिंदू समाजाच्या विरोधात जात आहोत हे त्यांच्या लक्षात आले नाही. हिंदुत्ववाद्यांचा विरोध करण्यासाठी त्यांनी मुस्लीम समाजाचा उपयोग करून घेतला; पण त्यातून काय साध्य झाले, त्यातून त्यांना मुस्लिमांचेही काही भले करता आले नाही, किंवा हिंदूंचीही मने जिंकता आली नाहीत. आयुष्यात शेवटी काय आहे, यशवंतराव चव्हाण यांचे नाव महाराष्ट्राचा एक द्रष्टा नेता म्हणून काढले जाते. शरद पवार हे यशवंतरावांचे मानसपुत्र आहेत. पण ते जी काही भूमिका घेतात आणि वक्तव्ये करतात, त्यातून कुणाचे किती भले झाले आहे हा एक संशोधनाचा विषय आहे. म्हणूनच की काय, भाजपच्या एका नेत्याने मला पवारांवर पीएचडी करायला आवडेल असे म्हटले.

Jaywant Rane
Jaywant Ranehttps://www.mymahanagar.com/author/rjaywant/
25 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत. राजकीय, सामाजिक, वैचारिक विषयांवर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -