घरCORONA UPDATEजागतिक कोरोना अपडेटCoronavirus Crisis: बेरोजगारी भत्ता मिळवण्यासाठी अमेरिकेत २.६ कोटी लोकांचे अर्ज

Coronavirus Crisis: बेरोजगारी भत्ता मिळवण्यासाठी अमेरिकेत २.६ कोटी लोकांचे अर्ज

Subscribe

कोरोना व्हायरसने अमेरिकन अर्थव्यवस्थेचे अक्षरशः कंबरडे मोडले आहे. एका बाजुला कोरोना रुग्ण आणि मृतांचा आकडा वाढत जात असताना दुसरीकडे बेरोजगारांचीही संख्या वाढत आहे. कोरोना व्हायरसचे संकट उभे राहिल्यापासून अमेरिकेत ४४ लाख लोकांनी आपली नोकरी गमावली आहे. या सर्व लोकांनी बेरोजगारी भत्ता मिळवण्यासाठी अर्ज सादर केले आहेत. आज अमेरिकेने याबाबतची आकडेवारी जाहीर केली. कोरोनाच्या संकटानंतर अशाप्रकारे रोजगाराची मदत मागणाऱ्यांची संख्या आता दोन कोटी ६० लाख झाली आहे. अमेरिकेत गेल्या काही दिवसांपासून कंपन्या बंद पडत आहेत. अर्थतज्ज्ञांच्या मतानुसार एप्रिल महिना संपता संपता बेरोजगारांच्या संख्येमध्ये २० टक्के वाढ होण्याची शक्यता आहे.

कंपन्या बंद पडत असल्यामुळे अमेरिकन अर्थव्यवस्था पुरती विस्कळीत झाली आहे. १९३० मध्ये अमेरिकेत ‘द ग्रेट डिप्रेशन’ परिस्थितीपेक्षाही गंभीर आणि भयावह परिस्थिती निर्माण होऊ शकते, असे सांगितले जात आहे. काही अर्थशास्त्रज्ञ सांगतात की, २००९ साली आलेल्या मंदीपेक्षाही ही यावेळची मंदी दुप्पट असण्याची शक्यता आहे. अमेरिकेत आतापर्यंत एक कोटी ६० लाख लोकांना बेरोजगारी भत्ता मिळत होता. २०१० साली एक कोटी २० लाख लोक बेरोजगारी भत्ता मिळवत होते. त्यानंतर आता हा आकडा वाढत चालला आहे.

- Advertisement -

कोरोनाचे संकट थोपविण्यासाठी अमेरिकेत शटडाऊन करण्यात आले. मात्र त्यानंतर अर्थव्यवस्था खिळखिळी होण्यास सुरुवात झाली. शटडाऊनच्या विरोधात राजधानीत निषेधाचा सुर उमटत आहे. काही ठिकाणी आंदोलनेही करण्यात आली. तर काही राज्यांच्या राज्यपालांनी आपापल्या विभागात शटडाऊन कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र आरोग्य विभागाने या निर्णयाचा विरोध दर्शविला आहे.

जरी काही भागातील शटडाऊन मागे घेऊन कंपन्यांचे शटर उघडले गेले तरी लोक कामाला येतीलच का? याची शाश्वती नाही. कारण अमेरिकेत कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या संख्येने झालेला आहे. त्यामुळे लोक घराबाहेर निघण्यास घाबरत आहेत. अमेरिकेच्या लोकसंख्येतील एक मोठा घटक अजूनही लॉकडाऊनच्या बाजुने असून घरातच थांबला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -