घरताज्या घडामोडीगर्दी कमी करणे हाच जुने नाशिकसाठी जालीम उपाय

गर्दी कमी करणे हाच जुने नाशिकसाठी जालीम उपाय

Subscribe

महापालिका आयुक्तासह पोलीस आयुक्तांचे आवाहन

दाटलोकवस्ती असलेल्या जुन्या नाशकात करोनाने धुमाकूळ घातला असून, करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी बुधवारी (दि.१०) महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे व पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी जुने नाशिक परिसरात पाहणी दौरा करत नागरिकांशी संवाद साधला. नागरिकांनी स्वयंशिस्तीचे पालन करत प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन अधिकार्‍यांनी केले. दरम्यान, वैद्यकीय पथकाकडून सुरू असलेल्या तपासणीची माहिती घेत नियमित औषध फवारणी करावी, रहिवाशांना जीवनावश्यक वस्तूचा पुरवठा करण्याच्या दृष्टीने नियोजन करावे, अशा सूचना महापालिका आयुक्तांनी अधिकार्‍यांना दिल्या.

करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जुने नाशकातील नाईकवाडीपुरा, अजमेरी मशीद परिसरात महापालिका आयुक्त गमे व पोलीस आयुक्त नांगरे-पाटील यांनी बुधवारी पाहणी दौरा केला. नागरिकांना ध्वनीक्षेपकाद्वारे करोनापासून बचाव करण्यासह विविध उपाययोजनांची माहिती त्यांनी दिली. नागरिकांशी संवाद साधल्यानंतर मौलाना फय्याज यांच्याशी चर्चा केली. यावेळी डॉ.लियाकत नामौले यांनी नागरिकांना स्वच्छता व आरोग्याची दक्षता घेण्याबाबत आवाहन केले. त्यानंतर मेनरोड परिसरातून मायको रूग्णालय परिसरास भेट दिली. आयुक्तांनी येथील परिसराची माहिती घेवून औषधपुरवठा, वैद्यकीय सेवेबाबत आवश्यक असणार्‍या बाबींची माहिती घेऊन पूर्तता करण्याच्या सूचना अधिकार्‍यांना दिल्या.

- Advertisement -

आयुक्त गमे म्हणाले, पोलीस व महापालिका प्रशासन संयुक्तपणे कामकाज करत आहे. त्यास महापालिका पदाधिकारी व नगरसेवकांचे मोठे सहकार्य लाभत आहे. नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावे. कुटुंबातील एखाद्या सदस्यास करोनासदृश्य लक्षणे दिसून आल्यास वैद्यकीय पथकास माहिती द्यावी. त्यामुळे वेळेत औषधोपचार करण्यासह उपाययोजना करणे शक्य होईल. नागरिकांनी पोलीस व मनपा प्रशासनाला सहकार्य करावे.

आयुक्त विश्वास नांगरे-पाटील म्हणाले, शहरात लॉकडाऊन यशस्वी झालेले आहेत. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वांनी दक्षता घेणे गरजेचे आहे. पोलीस व महापालिका प्रशासनास सहकार्य करावे. वैद्यकीय पथकाला आजाराबाबत माहिती द्यावी, जेणेकरून उपचार करण्यास मदत होईल. नागरिकांनी सोशल डिस्टन्स ठेवणे गरजेचे असून गर्दी करू नये.
राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते तथा नगरसेवक गजानन शेलार म्हणाले, करोनाला हरवण्यासाठी नागरिकांनी सोशल डिस्टन्सचे पाळण करावे, गर्दी करु नये, महापालिका व पोलीस प्रशासनला सहकार्य करावे.

- Advertisement -

यावेळी नगरसेविका वत्सला खैरे, वैशाली भोसले, वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र त्र्यंबके, पोलीस उपायुक्त अमोल तांबे, आरोग्य अधिकारी कल्पना कुटे, सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ.अजिता साळुंखे, महापालिका करोना कक्षप्रमुख डॉ.आवेश पलोड आदी उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -