घरताज्या घडामोडीवन्यजीवांची अवैध तस्करी; १९ जणांवर गुन्हा दाखल

वन्यजीवांची अवैध तस्करी; १९ जणांवर गुन्हा दाखल

Subscribe

पोलीस अधिकारी व कर्मचा-यांच्या सहभागाने खळबळ

नाशिकरोड । श्रीधर गायधनी

नाशिक विभागातून वन्यजीवांची अवैध तस्करी करणा-या आंतरराज्य टोळीचा वनविभागाच्या पथकाने पर्दाफाश करत पोलीस अधिकारी व कर्मचा-यासह १९ जणांना ताब्यात घेतल्याची माहिती वनविभागाचे परिक्षेत्र अधिकारी यांनी दिली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी, १ जून रोजी येवल्यातील सत्यगावात वनविभागाच्या अधिका-यांनी छापा टाकून सोमनाथ पवार याच्या घरी मांडूळ जप्त केले होते. वन्यजीव तस्करी करणारी आंतरराष्ट्रीय टोळी असल्याचा संशय असल्याने, वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी संजय भंडारी व  पथकासह तपास सुरु करण्यात आला. यानंतर सोमनाथ हा त्याचे वडाळीभोई येथील नातेवाईक प्रकाश हरी बर्डे व संदीप प्रकाश बर्डे यांना विक्री करणार असल्याने त्यांना ३ जून रोजी ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर धर्मा देवराम जाधव (रा. थेरगाव) हा देवळाली कॅम्प येथील अंबादास बापूराव कुंवर यास विक्री करणार असल्याचे चौकशीतून समोर आल्यावर सिन्नर व नाशिक परिसरातील अवैध वन्यजीव तस्करीत गुंतलेले किरण पांडुरंग सोनवणे (रा. मनेगाव), किसन श्रीपत पवार (रा. सिन्नर), संतोष बाळकिसन कचोळे (रा. म-हळ) यांना ४ जून रोजी सहायक वनसंरक्षक मनमाड यांनी ताब्यात घेतले व फाॅरेस्ट कस्टडी दरम्यान संशयितांकडून मिळालेल्या माहितीच्या आधाऱे ७ जून रोजी अहमदनगर जिल्ह्यातील राहाता येथील ज्ञानेश्वर विठ्ठल वाबळे यास ताब्यात घेतले, यानंतर कोल्हार येथील निखिल निवृत्ती गायकवाड हा शेड्यूल एक मधील कासव विक्रीच्या तयारीत असतांना त्यास वनपरिक्षेत्र अधिकारी बी. आर. शेख व फिरते पथक यांनी ताब्यात घेत त्याच्या घरातील कासव जप्त केले.
या दरम्यान वन्यजीवांची अवैध विक्री करण्यासाठी ताब्यात घेतलेल्या संशयितांच्या मोबाईल मेसेजवर आलेल्या माहितीच्या आधारे सहा जणांना सिन्नर येथे सापळा रचून ताब्यात घेतले, ११ जून रोजी श्रीरामपूर जवळील बेलापूर येथे मच्छिंद्र दत्तात्रय काळे (रा. डेहरे) व ज्ञानेश्वर विठ्ठल गाडेकर (रा. घोडेगाव) यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून एक मांडूळ जप्त केले,या  गुन्ह्यात वापरलेल्या दोन दुचाकीही जप्त केल्याचे वनविभागाच्या अधिका-यांनी सांगितले.

पोलीस अधिकारी, कर्मचारी तस्करीत सहभागी

१ जूनला पकडलेल्या संशयितांच्या मोबाईलवरील मेसेजच्या आधारे अवैध वन्यजीव मांडूळ विक्रीच्या तयारीत असणा-या सहा जणांना ताब्यात घेतले. त्यात ठाणे जिल्ह्यातील रबाळे पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक विश्वास बाळासाहेब चव्हाणके, पुणे येथील चतुश्रृंगी पोलीस ठाण्याचे हवालदार (रायटर) दीपक गोवर्धने, नीलेश रामदास चौधरी (रा. चाकण), संदीप तान्हाजी साबळे (रा. नारायणगाव), महेश हरिश्चंद्र बने (रा. अंबरनाथ) व इतर एक यांना सिन्नर येथील हाॅटेल इच्छामणी येथे ताब्यात घेतले. त्यांच्या जवळील एक आॅडी, एक होन्डा अमेझ व एक दुचाकी ताब्यात घेतली आहे.

पथकात सहभागी अधिकारी-कर्मचारी

१ जूनपासून वनविभागाचे पथक तपास करत होते. मुख्य वनसंरक्षक ए.एम.अंजनकर (नाशिक), उपवनसंरक्षक नाशिक पूर्व यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक वनसंरक्षक मनमाड डाॅ. सुजित नेवसे, येवल्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी संजय भंडारी, सहायक वनसंरक्षक डाॅ. सुजीत नेवसे, बशीर शेख, एम.बी.पवार, प्रसाद पाटील, गोपाळ हरगावकर, पंकज नागपुरे, डी.ए.वाघ, पी.आर नागपुरे, व्ही.आर.टेनकर,  मुकुंद शिरसाठ, एन.एम. बिन्नर, इतर कर्मचारी सहभागी होते.

फासेपारधींनी कारवाईपासून रोखले

येवल्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी संजय भंडारी व पथकाने या तपासा दरम्यान धुळे येथील अजनाळे गावात ९ जूनला रात्री संशयितांना ताब्यात घेण्यासाठी गेले असता गावातील फासेपारधी लोकांनी घेराव घालून कारवाई करण्यापासून रोखत गावाबाहेर काढले, आम्ही संख्येने कमी असल्याने त्या गावातून काढता पाय घेतल्याचे एका अधिका-यांनी सांगितले.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -