घरफिचर्सधर्मनिरपेक्षतेच्या फेर्‍यात ममता

धर्मनिरपेक्षतेच्या फेर्‍यात ममता

Subscribe

आपला हक्काचा मतदारच ममतांनी भाजपकडे पळवून लावण्याचा चंग बांधला असेल, तर अमित शहांनी त्याला दरवाजे बंद करावेत, अशी कोणाची अपेक्षा आहे काय? असे घुसखोर आपल्याला पुन्हा सत्ता व बहूमत मिळवून देतील, ही ममतांची अपेक्षा फोल ठरणार आहे. कारण त्यातच आसाम काँग्रेसने गमावला आहे आणि त्याच कारणाने डाव्यांना त्रिपुरातून पराभूत व्हावे लागलेले आहे. मग ममता असा आपल्याच पायावर धोंडा कशाला पाडून घेत आहेत?

धर्मनिरपेक्षता किंवा सेक्युलर विचारांची झिंग चढली मग माणूस केव्हा फिदायीन जिहादी होतो, त्याचे त्यालाच कळत नाही. म्हणून तर ममता २००६ साली डाव्यांचा पराभव करून बंगालची सत्ता काबीज करू शकल्या होत्या. पण त्यांना ती सत्ता व बंगालचा मतदार कशामुळे मिळू शकला, त्याचेच आज त्यांना विस्मरण झाले आहे. बांगलादेशी घुसखोरच नव्हेत, तर रोहिंग्या मुस्लिमांनाही आश्रय देण्यापर्यंत त्यांची घसरगुंडी झालेली आहे. आज रोहिंग्या व बांगलादेशी मुस्लिमांसाठी देशव्यापी वकीलपत्र घेऊन झुंजणार्‍या ममता बॅनर्जी, २००५ सालात कुठल्या भूमिकेत होत्या? त्यावेळी त्यांच्या पक्षाचा लोकसभा निवडणुकीत दारूण पराभव झाला होता आणि त्या एकट्याच तिथे पोहोचू शकलेल्या होत्या. तेव्हा डाव्या आघाडीला बांगलादेशी घुसखोरांचे आश्रयदाते ठरवण्यासाठी ममताचा आटापीटा चालू होता. हे घुसखोर बंगाल गिळंकृत करीत चालल्याचा आरोप ममतांनीच लोकसभेत केला होता आणि त्यासाठी स्थगन प्रस्तावही दिलेला होता. पण मार्क्सवादी सभापती सोमनाथ चॅटर्जी यांनी तो फेटाळून लावला होता. त्यामुळे संतापाने लालबुंद झालेल्या ममता सभापतींच्या दिशेने धावल्या आणि त्यांनी हातातील कागदपत्रे आसनाकडे भिरकावली. मग हे युपीए सरकार व बंगालचे डावे सरकार, बांगला घुसखोरांचे पाठीराखे असल्याचा आरोप करीत, आपल्या सदस्यत्वाचा त्यांनी तडकाफडकी राजीनामा फेकला होता. अर्थात तो योग्य स्वरूपाचा नसल्याने स्वीकारला गेला नाही. पण संपूर्ण सभागृहात ममता एकाकी पडल्या होत्या आणि रडवेल्या होऊन आपल्या आसनावर बसल्या होत्या. सहाच वर्षांनी त्यांच्या त्या संतापाला बंगाली मतदाराने जोरदार साथ दिली आणि बांगलादेशी घुसखोरांच्या विरोधातील लोकमत उफाळून येत ममता थेट बंगालच्या मुख्यमंत्री पदावर आरुढ झाल्या होत्या. आज त्यांना सेक्युलर झिंग चढल्याने आपलीच जुनी भूमिका आठवेनाशी झाली आहे.

खरे तर २०१४ सालात देशात सत्तांतर होऊन मोदी पंतप्रधान झाल्यापासून ममतांना देशाचे नेतृत्व करण्याचे डोहाळे लागलेले आहेत आणि त्यासाठी त्या मोदीविरोधात काहीही करण्यासाठी वाटेल त्या थराला जात आहेत. कुठलीही टोकाची भूमिका घेऊ लागल्या आहेत आणि त्यात मग रोहिंग्या मुस्लिमांना आश्रय देण्यापासून बांगला घुसखोरांना पाठीशी घालण्यापर्यंत वाटेल त्या कसरती चालू आहेत. पण त्याच त्यांना क्रमाक्रमाने राजकारणातून उठवणार्‍या ठरू लागल्या आहेत. त्याची पहिली सुरूवात त्रिपुरात झाली. भाजपने मागल्या काही वर्षात त्रिपुरातील बांगलादेशी नागरिकांच्या घुसखोरीला विरोध असल्याच्या धारणेला हातभार लावून, आपले हातपाय तिथे पसरले होते. तर मुळात त्याच धारणेने तृणमूलकडे आलेले त्रिपुरावासी भाजपाकडे आकर्षित होऊ लागले होते. कारण बंगालची सत्ता हाती आल्यापासून ममतांनी बांगलादेशी घुसखोरांचे लांगुलचालन सुरू केले होते. सहाजिकच अशा त्रिपुरावासी नागरिकांची तृणमूलमध्ये घुसमट चालू होती. कारण तिथले डावेही स्थानिकांच्या भावना पायदळी तुडवून घुसखोरांच्या व्होटबॅन्का बनवण्यात गर्क होते. तेच ममतांचे होऊ लागल्यामुळे तृणमूलचे कार्यकर्ते नेते भाजपाकडे वळत गेले आणि एकेदिवशी त्यांनी तृणमूल पक्ष सगळाच्या सगळा भाजपात विलिन करून टाकला. लवकरच तिथल्या काँग्रेसचे सगळे आमदार व पक्षही भाजपात सामील होऊन गेला. अशा रितीने त्रिपुरा राज्यात नामोनिशाण नसलेला भाजप थेट सत्तेवर येऊन बसला. डाव्यांपासून काँग्रेस आणि तृणमूल घुसखोरांचे समर्थन करणार असतील, तर त्यांच्या नादाला लागून आपली ओळख व अस्मिता पुसून टाकण्यापेक्षा त्या लोकांनी भाजपाची कास धरलेली होती. आता त्याचीच बंगाल व आसाममध्ये पुनरावृत्ती होते आहे. आज बंगालमध्ये भाजप आपले बळ वाढवताना दिसतो आहे, त्याचे श्रेय म्हणूनच अमित शहांपेक्षाही ममतांनाच द्यावे लागेल.

- Advertisement -

मध्यंतरी ममतांनी भाजप व संघाच्या विरोधात टोकाची भूमिका घेताना बंगालमध्ये हिंदूंना जगणेही अशक्य करून टाकलेले होते. त्यातूनच मागल्या दोन वर्षांत तिथे हिंदू लोकसंख्येत भाजपचे प्रस्थ वाढत गेलेले आहे. त्यातच आता आसामच्या प्रश्नांवर बाकीचे आसामी एकत्र येत असताना, ममतांनी पुन्हा बांगलादेशी घुसखोरांच्या संरक्षणासाठी घेतलेला पवित्रा त्यांना फक्त आसाम नव्हे,तर बंगालमध्येही महागात पडणार आहे. कारण आज बंगालमध्ये भाजपने जी भूमिका घेतलेली आहे, ती मुळात तृणमूल व ममतांची २००५ सालातील भूमिका आहे. त्याच भूमिकेने (मा माटी मानुष) ममतांना सत्तेपर्यंत आणून ठेवले होते. पण आपला हक्काचा मतदारच ममतांनी भाजपकडे पळवून लावण्याचा चंग बांधला असेल, तर अमित शहांनी त्याला दरवाजे बंद करावेत, अशी कोणाची अपेक्षा आहे काय? असे घुसखोर आपल्याला पुन्हा सत्ता व बहूमत मिळवून देतील, ही ममतांची अपेक्षा फोल ठरणार आहे. कारण त्यातच आसाम काँग्रेसने गमावला आहे आणि त्याच कारणाने डाव्यांना त्रिपुरातून पराभूत व्हावे लागलेले आहे. मग ममता असा आपल्याच पायावर धोंडा कशाला पाडून घेत आहेत?

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -