घरफिचर्समायमहानगर ब्लॉगमानवी हव्यास हीच मूळ समस्या!

मानवी हव्यास हीच मूळ समस्या!

Subscribe

कोरोना ही समस्या अद्याप कमी होण्याचे नाव घेत नाहीय. कोरोनावर लस शोधण्यात आली तरीही कोरोना मानवजातीची पाठ सोडायला काही तयार नाही. पहिली लाट, दुसरी लाट अशा लाटांवर स्वार होऊन कोरोना मानवजातीला छळायला आलाय. मुळात ही समस्या मानवाचे ओढावून घेतली आहे. मानवाचा हव्यास या समस्येला अक्राळविक्राळ रूप देऊन बसलाय आणि आता त्यापासून स्वत:ची सुटका करण्यास धडपडतोय. पृथ्वीतलावर शेकडो देश आणि हजारो लहानमोठे मानवी समुदाय आहेत. त्यांच्या नित्य जगण्यातल्या बहुविध समस्या आहेत. त्यावर हजारो वर्षापासून उपाय शोधले जात आहेत आणि त्या उपाययोजनेतून आणखी नवनव्या समस्याच जन्माला आलेल्या आहेत. कोरोनाही त्यापैकीच एक समस्या आहे. अजूनतरी कुठल्याही प्रगत वा मागास देश समाजांनी आपले जीवन परिपूर्ण व समाधानी झाल्याचा दावा केलेला नाही. पण असे मत फक्त माणसांचे आहे. माणूस वगळता धरतीवर लाखो लहानमोठे सजीव वास्तव्य करतात आणि त्यांचेही जीवनचक्र अखंड चाललेले आहे. पण त्यांना कुठल्या अडचणी वा समस्या भेडसावतात, त्याची आपल्याला जाणिवच नसते. माहिती असणे दूरची गोष्ट झाली. सहाजिकच त्यांना काही समस्या नाहीत असेही एक गृहीत आहे.

पण त्यांना समस्या कशाला भेडसावत नाहीत, त्याचीही विचारपूस आपण कधी करत नसतो. कारण आपण माणसे कमालीची आत्मकेंद्री असतात. आपल्या घरात असताना आपण कुटुंबाच्या समस्यांचा विचार करण्यापेक्षाही त्यात आपल्या व्यक्तीगत समस्यांना प्राधान्य देऊन आकलन करीत असतो आणि कुटुंबाच्या बाहेरचा विषय आला, मग गोतावळा, परिसर, जातपात, भाषा वंश अशा कलाने विचाराला चालना मिळते. जसजसे आपण व्यक्तीपासून कळपाच्या दिशेने सरकत जातो, तसे व्यक्तीगत समस्यांची सांगड जमावाशी घातली जाते आणि त्यालाच मग सामाजिक, सांस्कृतिक वा राष्ट्रीय वगैरे नावे दिली जातात. पण त्यातही कुठे माणसाच्या पलिकडल्या सजीव विश्वाचा विचार येत नाही. याचे कारण तेच गृहीत आहे. समस्या फक्त माणूस नावाच्या प्राण्याला असतात आणि बाकीचे सजीव दुय्यम वा नगण्य असतात. मानवी जीवनापलिकडे अन्य कुणा सजीवाच्या जगण्याला काहीही अर्थ व आशय नसतो; हेच ते गृहीत आहे. कारण अगदी स्पष्ट आहे. फक्त मानवी समाजच समस्याप्रधान सजीव समूह आहे. पण असे का असावे?

- Advertisement -

माणूस अनेक गोष्टींचा विचार करतो, पण आपल्याकडे थोडाही बारकाईने बघत नाही. मग त्याने इतर सजीवांकडे तितक्या बारकाईने बघावे, अशी अपेक्षा तरी कशाला करता येईल? एकमेकांच्या वेदना यातनांनी व्याकुळ होणार्‍या माणसाला आपण सहृदय मानतो. पण तितका तो अन्य सजीवांविषयी कधीच सहृदय नसतो. मानवाने आपली मालकी सिद्ध केलेली आहे आणि त्यानुसार माणसे व्यक्तीगत, सामाजिक, राष्ट्रीय अशा हक्कासाठी संघर्ष करीत असतात. नियम कायदे बनवित असतात आणि त्यातून एकमेकांचे हक्क मिळवणे किंवा नाकारणे; असा संघर्ष सुरू होत असतो. समस्या प्रश्न निर्माण होत असतात. उत्तरे शोधली जातात आणि त्या उत्तरातून आणखी नव्या प्रश्न समस्यांना जन्म दिला जात असतो.

काही वर्षापूर्वी एक इंग्रजी सिनेमा बघायला मिळाला होता. तसा तो चित्रपट नव्हता तर पूर्ण लांबीचा माहितीपट होता. ‘द ब्युटिफुल पिपल’ असे त्याचे नाव होते. गंमत अशी होती, की त्यात फारशी कोणी माणसे नव्हती वा त्यात कोणी अभिनय वगैरे केलेला नव्हता. डझनभर छायाचित्रकारांनी आफ्रिकेच्या घनदाट जंगलात अनेक वर्षे खपून जे जंगली पशूंचे चित्रण व अभ्यास केला, त्याची काटछाट करून हा माहितीपट बनवण्यात आलेला होता. त्याच पशूंच्या सहवासात वावरणार्‍या काही आदिवासी कृष्णवर्णियांची गावे आणि माणसे त्यात दिसली. बाकी नुसती श्वापदे, पशू वा शिकारी प्राणी होते. एका प्रसंगी पाणवठा धरून बसलेला सिंहांचा कळप होता. आसपास झेब्रे हरणे मुक्तपणे चरत बागडत होती. पण त्यांना कुठेही सिंहाच्या कळपाची भीती दिसली किंवा जाणवली नाही. त्यापैकी कोणी चरणारा प्राणी पाणवठ्याच्या वा सिंहांच्या जवळ आला; तर एखादी सिंहीण वा छावा उठून त्यांचा पाठलाग करून पळवून लावत होता.

- Advertisement -

मग पुन्हा सिंहांचा आराम व हरणांचे चरणे चालू व्हायचे. हा धागा धरून चित्रपटाचा निवेदक म्हणाला, किती सुंदर संस्कृती आहे बघा. पोट भरलेला सिंह वा श्वापद आपली उगाच शिकार करणार नाही, याची किती खात्री त्या हरणांना आहे ना? भुकेलेले उपाशी श्वापदच शिकार करते. रिकामे पोट त्याला शिकार करायला प्रवृत्त करते. पोट भरलेले असेल तर तो कुणाला उगाच जीवानिशी मारत नाही. शिकार करत नाही. पण माणसाचे काय? माणसाची भूक कधी संपणार आहे? माणसाची न संपणारी भूक ही आपली खरी समस्या आहे. भूक म्हणजे पोटाचीच नाही. ज्याला हव्यास म्हणता येईल अशी ती भूक आहे. ज्याला मानवी भूक म्हणतात. कधीच समाधानी होऊ शकत नाही, त्याला मानवी भूक म्हटले जाते आणि तीच खरीखुरी मानवी समस्या आहे.

हव्यास ही एक बाब अशी आहे, की त्यातून सगळ्या मानवी समस्यांचा जन्म झाला आहे. त्याच मानवी हव्यासाचे उदात्तीकरण करण्याला ‘अर्थशास्त्र’ असे गोंडस नाव देण्यात आलेले आहे. त्याचा उद्भव कसा व कधी झाला, तेही शोधून काढावे लागेल. पृथ्वीचा आरंभ झाला किंवा इथे सजीव सृष्टी निर्माण झाली, तेव्हा सगळे व्यवहार निसर्गाने लावून दिलेल्या नियमानुसार चालले होते. त्या सजीवातला सर्वात दुबळा प्राणी माणूस होता. बाकीच्या प्राण्यांना निसर्गाने वा असल्यास देवाने सुरक्षेसाठी काहीतरी अवयव किंवा कवच दिलेले होते. कोणाला नख्यांचा पंजा दिला तर कोणाला धारदार दात-सुळे शिकारीसाठी दिले. हत्तीला अगडबंब देह दिला तर सापासारख्या प्राण्याला हातपायांच्या ऐवजी विषारी दंश करण्याची कुवत बहाल केली. तुलनेने माणसापाशी असे कुठलेही भेदक हत्यार वा अवयव नाही. मग ती त्रुटी भरून काढण्यासाठी असेल निसर्गाने माणसाला विचार करण्याची, तारतम्याने कृती करण्याची बुद्धी दिली. अधिक त्या बुद्धीतून गगनाला गवसणी घालण्यासाठी मनाचे पंखही दिले. त्याचा उपयोग अन्य सजीवांप्रमाणे आपला बचाव आणि जगण्याच्या सुविधा साध्य करण्यासाठी व्हावा, हीच अपेक्षा असू शकेल.

आपल्या आवश्यकता व गरजेपलिकडे माणूस या क्षमतेचा गैरवापर करणार नाही, अशीच निसर्गाची अपेक्षा असणार. निदान निसर्गाच्या कृपेने उद्भवलेल्या अन्य सजीवांनी तरी मिळालेल्या सुविधेचा कधी गैरवापर केला नव्हता. मग त्यापैकीच एक असलेल्या मानवाकडून बुद्धी व मनाचा गैरवापर होण्याची चिंता निसर्गाला तरी कशाला असेल ना? पण माणूस मल्ल्या किंवा तत्सम बुद्धीचा असतो. याचा शोध बहुधा तेव्हा लागलेला नसावा. त्याने कशी कर्जाची सुविधा वापरून घेतली आणि मग परतफेडीची वेळ आल्यावर हात झटकून पळ काढला. त्यापेक्षा एकूण मानव जातीचे पृथ्वीतलावरचे वर्तन वेगळे झालेले नाही. मानवाचे हेच वर्तन कोरोनाची निर्मिती आणि त्याच्या संसर्गाला कारणीभूत ठरले आहे. जोपर्यंत मानव हव्यास आणि इतर स्वार्थापासून स्वत:ला लांब ठेवत नाही तोपर्यंत हे जग मानवाला जगण्यासाठी सुसह्य होणार नाही. कोरोनासारखी संकटे अविरत मानवाला छळायला सिद्ध होणार आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -