धारवाला…

Subscribe

गेल्या वर्षीचा तो कडकडीत लॉकडाऊन…आणि त्या लॉकडाऊनमधली मे महिन्याच्या वणव्यातली ती एक टळटळीत दुपार.

त्या एका काळात दुपारतिपारी कुणी दिसला की त्याला पोलिसांच्या दंडुक्याचा प्रसाद मिळत होता. कोरोनाने नुकताच भारतात प्रवेश केला होता. आता कोरोनाबद्दल लोक थोडे धीट झालेले दिसताहेत, पण तेव्हा भयभीत झालेले, कावरेबावरे चेहरे आजुबाजूला दिसत होते. पुढे काय, ह्यापुढचं प्रश्नचिन्ह आता थोडं सैलावताना दिसतं आहे, पण तेव्हा ते फारच दाट, ठळक आणि घनदाट, घनगंभीर दिसायचं. त्याचं कारणही तसंच होतं. कोरोना तेव्हा तद्दन अनोळखी होता. आता त्याची अजून पूर्ण ओळख पटलेली नसली तरी तो कळायला लागला आहे.

- Advertisement -

असो, तर पहिल्या लॉकडाऊनमधले ते दिवस अतिशय गूढ होते. कडक कडकडीत लॉकडाऊनमध्ये रावापासून रंकापर्यंत सगळ्यांना अडकून पडल्यासारखं झालं होतं. मटणमच्छीच्या शौकिनांनाही दालरोटी खाओ, प्रभू के गुन गाओ अशी अळणी आळवणी करावी लागत होती. चाळझोपड्यात राहणार्‍यांवर, हातावर पोट असणार्‍यांवर अर्धपोटी राहण्याचे दिवस ओढवले होते. कित्येकांच्या नोकर्‍यांवर गदा आली होती. सकाळी अकरापर्यंतच्या सरकारनियुक्त वेळात चांगल्या चांगल्या घरातली मुलंमुली भाजी विकताना दिसू लागली होती. त्यांच्या चेहर्‍यावरचा उदासवाणा भाव पहाताक्षणी कळून येत होता. ही जगण्यातली कुतरओढ होती आणि ती रस्त्यावर थेट आणि सुस्पष्ट दिसू लागली होती. रद्दी, भंगार समान विकून पोट भरणारी माणसं ह्याक्षणी काय करत असतील, कसं जगत असतील, त्यांच्या चुलीवर काय शिजत असेल असा प्रश्न पडला की अंगावर काटा यायचा.

…आणि अशाच त्या टळटळीत दुपारी कळकट मळकट कपड्यांतला तो सायकलवरून गल्लीत शिरला. कोपर्‍यावरच्या पोलिसांचा डोळा चुकवून की दंडुक्याचा प्रसाद खाऊन आला होता हे कळायला मार्ग नव्हता, पण बेंबीच्या देठापासून ‘धारवाला, धारवाला’ असं ओरडत होता. त्याच्या त्या सुरात जिवाचा आकांत होता,. स्वत:च्या जीवासह घरातले जीव जगवण्यासाठी तो जोखीम घेऊन बाहेर पडला होता. ‘धारवाला, धारवाला’ अशी आरोळी ठोकताना तो आसपासच्या सोसायट्यांमधल्या खिडक्यांकडे आशाळभूतपणे पहात होता. सोसायट्यांमधले बहुतेक जण टीव्हीवरचा कॉमेडी शो बघण्यात गुंगून गेले होते. त्यांच्यापर्यंत कुणाच्या तरी जगण्याची धार पोहोचणं अशक्य होतं. तो आल्या पावली तसाच ‘धारवाला, धारवाला’ करत परत गेला. कुणाचेच चाकूसुरे गंजलेले नसावेत किंवा कुणाला त्या गांजलेल्या जीवासाठी आपला चाकूसुरा परजून घ्यावा असं वाटलं नसावं. तो गल्लीतून दिसेनासा झाला तरी त्याचा ‘धारवाला, धारवाला’ हा आकांत पुसट पुसट होत ऐकू येत होता. मग काही सेकंदांत मात्र त्याचा तो आकांत साफ पुसला गेला. साफ बेदखल झाला. कॉमेडी शोवाल्यांनी तो बेदखल केला.

- Advertisement -

गल्लीच्या कोपर्‍यावरच्या, रस्ते सुनसान ठेवायची जबाबदारी असणार्‍या पोलिसांनी जाता जाता त्याची पोलिसी दखल घेतली असेल का, अशी एक शंका मनात येऊन गेली. मनात आलं, बिचार्‍याने व्यवसाय कसला पत्करला तर धार काढण्याचा! कोरोना येण्यापूर्वी सगळं आलबेल असताना तरी त्याला ह्या व्यवसायातून काय कमाई होत असेल? त्यातही कधी त्याच्या आयुष्यात एखादा सुगीचा दिवस उगवण्याची शक्यता कमीच. लोकांना आपल्याकडल्या चाकूसुर्‍यांना धार काढायची गरज भासते ती तीनेक वर्षांनी. त्यात हे लॉकडाउन. म्हणजे आधीच उल्हास त्यात लॉकडाऊनचा फास. अशा अवस्थेत जगण्याची आबाळ अटळ. शरीरातलं त्राण, ताकद, ऊर्जा अर्धी होणंही अटळ. हे सगळं अर्धमुर्ध साथीला घेऊनही ‘धारवाला, धारवाला’ हा आकांत मात्र पूर्ण असणं आवश्यक. त्याशिवाय त्याचा तो धारवाला ब्रॅन्ड कसा इस्टॅब्लिश होणार! त्याच्याबद्दल आपल्या मनात असाच रिकामपणीचा विचार आपल्याला थोड्या वेळापुरता अस्वस्थ करणारा, थोड्या वेळापुरताच.

पुढे काही दिवसांनी कोरोना रूग्णसंख्या कमी कमी होत गेली. पहिली लाट ओसरली. लॉकडाऊनसुध्दा संपलं. आता सगळ्यांना मुक्तपणे हिंडण्याफिरण्याचं स्वांतंत्र्य लाभलं. भाजीवाले, मासळीवाले, भांडीवाले, सगळे वाले सुसाट सुटले. धारवाला मात्र आपल्या पूर्वीच्याच ठरल्या जागी बसला. त्याच्या म्हणण्याप्रमाणे त्याची ती जागा धारवाल्याची जागा म्हणून सगळ्यांच्या परिचयाची झाली होती. ती सोडून त्याला कसं चालणार होतं! पण ती जागा त्याला लॉकडाऊन उठूनही फळली नाही.

‘धंदा नही रहा अब पहले जैसा…’ त्याचा धंदा नगण्य, अगदीच उपेक्षित, अगदीच खिजगणतीत नसलेला, पण तोसुध्दा बड्या व्यापार्‍यासारखा बोलू लागला.

असं का विचारलं तर तो बड्या व्यापार्‍यासारखंच म्हणाला, ‘लोग अपने जेब से पैसे निकालने के लिए तैयार नही हैं!’
मनात आलं, हा म्हणतो ते खरं आहे का? ह्याचा पाच-दहा रुपये मेहनताना देतानाही लोक काचकुच करत असतील का?
पुढे धारवाल्याने एकूण परिस्थितीचा अंदाज घेतला…आणि एका पोळीभाजी केंद्राचा आसरा घेतला.
आता त्याला नेमून दिलेलं काम इतकंच होतं – क्वारंटाइन असलेल्या कोरोना रूग्णांना जेवण पोहोचवायचं. ताटवाट्या स्वच्छ करायच्या. काम जोखमीचं होतं. पण जिथे दर दिवशी आयुष्य जोखमीचं होतं तिथे ह्या जोखमीचा काय पाड!
धारवाल्याने जगण्याचा मार्ग बदलला होता म्हणण्यापेक्षा जीव जगवण्याचा नवा मार्ग त्याला सापडला होता. गांजलेला जीव गंजण्याच्या आधी त्याने आपल्या आयुष्याला धार काढून घेतली होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -