घरफिचर्ससारांशधमाका : फक्त नावालाच

धमाका : फक्त नावालाच

Subscribe

विदेशी सिनेमांचा रिमेक प्रत्येकवेळी चांगला बनेलच याची शाश्वती नसते, मुळात रिमेक गाजतो तेव्हाच जेव्हा त्यात पूर्वीच्या सिनेमापेक्षा काहीतरी वेगळं किंवा काही तरी चांगलं केलेलं असतं. लहानपणी परीक्षेत कॉपी करणार्‍या मुलांना पाहिलंय का? पहिल्या बाकावर बसणार्‍या हुशार पोराचा पेपर दुसर्‍या रांगेतील शेवटच्या बाकावर बसणार्‍या मुलासारखाच असतो, चूक ते सगळीकडे चूक आणि बरोबर ते सगळीकडे बरोबर, एव्हाना पहिल्या मुलाने खाडाखोड केलेली असेल तर ती सर्वांच्या पेपरवर तशीच दिसणार, यामुळे होतं काय? तर डोळे बंद करून पेपर तपासणार्‍या शिक्षकालासुद्धा ही कॉपी लगेच कळते आणि पोरांना रंगेहाथ पकडलं जातं. हल्ली आपल्याकडे विदेशी सिनेमांचे रिमेक बनवताना असंच काहीसं केलं जातंय, म्हणून प्रेक्षकांना अशी कॉपी आवडत नाही आणि हे सिनेमे फ्लॉप ठरतात. राम माधवानी आणि नेटफ्लिक्स ही दोन नावं चांगल्या कंटेन्टसाठी पुरेशी आहेत, नेटफ्लिक्सवर कंटेंट येतोय म्हणजे तो चांगला असणारच आणि राम माधवानी बनवतोय म्हटल्यावर तो पाहण्यालायक असणार असं मलाही वाटलं होतं. पण धमाका पाहिल्यानंतर हा भ्रम तुटला, कार्तिक आर्यन मुख्य भूमिकेत असलेल्या या सिनेमाकडून सर्वानाच खूप अपेक्षा होत्या.

मूळ कोरियन सिनेमाचा रिमेक असलेल्या या सिनेमात कार्तिक नव्या रूपात पाहायला मिळणार म्हटल्यावर त्याच्या रॉम-कॉमच्या चाहत्यांनासुद्धा या सिनेमाकडून अपेक्षा होत्या, पण या सर्व अपेक्षांची पूर्तता करण्यात हा सिनेमा अपयशी ठरला. दरवेळी ओरिजिनल सिनेमा पाहून मग रिमेक बघण्याची सवय होती, पण यावेळी मात्र आधी रिमेक बघितला आणि मग ओरिजिनल सिनेमा पाहिला. पूर्वग्रह न ठेवता सिनेमा पाहता यावा म्हणून हा प्रयत्न केला पण तोही फसलाच, आधी रिमेक पाहूनही त्याला ओरिजिनलची सर नाही हे टेरर लाईव्ह पाहिल्यानंतर लक्षात आले. उत्कृष्ट कथा आणि पटकथा असतानाही केवळ सादरीकरणात झालेल्या क्षुल्लक चुका सिनेमा आपटण्याचे कारण ठरला, मनू आनंद सारखा सिनेमॅटोग्राफर, पुनीत शर्मासारखा पटकथा लेखक आणि राम माधवानीसारखा दिग्दर्शक असतानाही असा चित्रपट बनलाच कसा, हा प्रश्न माझ्याप्रमाणेच अनेकांना पडल्याची शक्यता आहे.

सद्य:स्थितीत केवळ भारतातीलच नव्हे तर जगभरातील माध्यमांवर जितकं बोलावं तितकं कमी आहे, विशेषतः टेलिव्हिजन न्यूज चॅनल्स तर नेहमीच टीकेचे धनी ठरत असतात. बातम्या शोधण्याचं जग जाऊन जेव्हापासून बातम्या लिहिण्याचं जग सुरू झालं तेव्हापासून पत्रकारिता नोबेल प्रोफेशन नाही तर व्यवसाय बनला. पत्रकारितेची मूल्य बाजूला ठेऊन बातम्या विकण्याचं जग सुरू झालं आणि याच जगातील एका वृत्तनिवेदकाची कथा आहे धमाका, अर्जुन पाठक नावाचा एक प्राईम टाइम न्यूज अँकर सध्या डिमोट होऊन आरजे बनलाय. (आता त्याला आरजेचे प्रोफेशन डिमोशन का वाटते ? माहीत नाही), सकाळचा शो सुरू असतानाच एक फोन त्याला येतो आणि समोरचा व्यक्ती बॉम्बने वरळी बांद्रा सी लिंक उडवून देण्याची धमकी देतो, असे फेक कॉल्स आधीही ऐकलेला अर्जुन पाठक त्यावर चिडतो आणि त्याला शिवी देतो. पुढच्या काही क्षणात धमाका होतो आणि सी लिंकचा एक भाग कोसळतो.

- Advertisement -

सिनेमाच्या सुरुवातीच्या 10-15 मिनिटात हे सगळं काही घडतं, तेव्हा आता पुढे काहीतरी भन्नाट पाहायला मिळणार अशी शाश्वती सर्वांना वाटते, पण पुढे घडतं सर्व उलटंच… आरजे असलेला अर्जुन पाठक आपली जुनी पोझिशन मिळविण्यासाठी, त्याची बॉस अंकिता चॅनलचा टीआरपी वाढविण्यासाठी त्या धमकीची ब्रेकिंग न्यूज बनवितात आणि बॉम्बने सी लिंकचा एक भाग उडविणार्‍या व्यक्तीला ऑन एयर घेतात. पुढे जे काही घडतं, ते काल्पनिक वाटत असलं तरी भारतीय माध्यमांना आरसा दाखविणार आहे, हे नाकारता येणार नाही. सिनेमात प्रतिकात्मक अनेक गोष्टी दाखविण्याचा प्रयत्न केलाय चॅनलच नाव भरोसा असताना सगळं काही अविश्वासाच्या आणि खोटारडेपणाच्या पायावर उभं आहे. एक व्यक्ती आहे ज्याला केवळ मिनिस्टरकडून सॉरी ऐकायचं आहे ज्यासाठी त्याने हा सगळा प्रपंच रचलाय, एक अँकर आहे ज्याला आपली प्रतिष्ठा आणि प्रेम वापस मिळवायचं आहे आणि तिसरी एक रिपोर्टर आहे जीला केवळ आपलं काम प्रामाणिकपणे पूर्ण करायचं म्हणून ती जीव धोक्यात घालून त्या ब्रिजवरून लाईव्ह रिपोर्टींग करत आहे.

धमाकाची कथा एक उत्कृष्ट कथा आहे ज्यात प्रेक्षकांना पूर्णवेळ खुर्चीशी खिळवून ठेवण्याची ताकद होती, परंतु त्याच सादरीकरण अशा पद्धतीने झालंय की, हा सिनेमामध्येच कुठेतरी अडकल्यासारखा वाटतो. अभिनयाच्या बाबतीत बोलायचं झाल्यास, पहिल्यांदाच कार्तिक आर्यनने आपला सेफ झोन सोडून काम केलंय, एक तास 40 मिनिटांच्या सिनेमात बहुतांश वेळ कार्तिकलाच स्क्रीनवर दिसायचं होतं आणि त्याच्या पात्रालासुद्धा विविध छटा होत्या, त्याचे भूतकाळातील सगळे रोल्स पाहता, त्याला हे जमेल का, हाच मोठा प्रश्न होता, पण त्याने मेहनत घेतली आहे हे मान्य करावे लागेल. आता या मेहनतीमध्ये त्याला किती यश आलं हे जर मला विचारलं तर पात्राच्या गरजेप्रमणे कार्तिकचा अभिनय केवळ 50 टक्के होता. त्याचं ओरडणं, घाबरणं आणि इमोशनल होणं तितकं प्रभावी वाटत नव्हतं, विशेषतः त्याचा राग हा फारच नाटकी वाटत होता. राहिला प्रश्न मृणाल ठाकूरचा तर, तिला करण्यासारखं काही नव्हतं आणि तिने काही केलंदेखील नाही. 5 मिनिटांच्या भूमिकेत थोडा अभिनय केला असता तर तो रोल लक्षात राहील असता.

- Advertisement -

सिनेमात ज्या पात्राने आपली छाप सोडली ते पात्र म्हणजे अमृता सुभाष यांनी साकारलेली बॉस अंकिता नकारात्मक भूमिका असलेल्या अमृताचे डायलॉग्स उत्तम आणि सटीक आहेत. आम्ही बातम्या रिपोर्ट करत नाही तर विकतो यापासून ते बातमीचा प्लॉट सांगत असताना यात मसाला नाही, हे त्यांचं वाक्य त्या पात्राची पूर्ण मानसिकता स्पष्ट करते. सिनेमॅटोग्राफी काही ठिकाणी उत्तम आहे आणि काही ठिकाणी फारच जेमतेम, 10 दिवसात सिनेमा केलाय 2 लोकेशनवर शूट केलंय, सगळं ठीक असलं तरी शेवटी तुमचं प्रोडक्ट कसं डिलिव्हर करता? हे प्रेक्षकांसाठी महत्वाचे आहे. जितकी घाई सिनेमा शूट करताना केली तितकीच पोस्ट प्रोडक्शनला केलीये असं वाटतं, छोट्या छोट्या गोष्टी उलगडून सांगता आल्या असत्या तर कदाचित हा सिनेमा एक वेगळे स्टँडर्ड सेट करणारा सिनेमा बनला असता, इतकी ताकद सिनेमाच्या कथेत होती.

पण इथे तर पुलावर बॉम्ब फुटल्यानंतरही लोकं खूप धावपळ का करत नव्हते? मंत्र्याच्या डेप्युटीला गोळी लागताच स्ट्रेचर स्टुडिओमध्ये कुठून आणि कसे आले? यांसारख्या क्षुल्लक प्रश्नांची उत्तर द्यायलाही दिग्दर्शकाला वेळ मिळाला नाही. म्हणूनच कोरियन सिनेमाची कॉपी करताना धमाकाची अवस्था वर्गातील शेवटच्या बाकावर बसणार्‍या त्या मुलासारखी झाली, ज्याने 2 मार्कांचे सगळे प्रश्न तर सोडवले पण जेव्हा 5 मार्कांचे प्रश्न सोडविण्याची वेळ आली तेव्हाच पहिल्या बाकावरील मुलाला शिक्षकाने उठवून दुसरीकडे बसवलं. चांगल्या कोरियन सिनेमाची कॉपी करण्याच्या प्रयत्नात हा सिनेमा ना कोरियन बनला ना इंडियन आणि म्हणूनच नावात धमाका असलेला हा फुसका बॉम्ब नाही पाहिला तरी हरकत नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -