घरताज्या घडामोडीभांडुप पालिकेच्या सावित्रीबाई फुले प्रसूतिगृहात ४ बालकांचा 'सेफ्टिक शॉक'मुळे मृत्यू; भाजपचा गंभीर...

भांडुप पालिकेच्या सावित्रीबाई फुले प्रसूतिगृहात ४ बालकांचा ‘सेफ्टिक शॉक’मुळे मृत्यू; भाजपचा गंभीर आरोप

Subscribe

भांडुप येथील मुंबई महापालिकेच्या सावित्रीबाई फुले प्रसूतिगृहातील नवजात शिशूसाठी कार्यरत अतिदक्षता विभागात शॉर्ट सर्किटमुळे जीवघेणे इन्फेक्शन होऊन ‘सेफ्टिक शॉक’मुळे ४ लहान बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर २ बालके व्हेंटिलेटरवर आहेत, असा गंभीर आणि खळबळजनक आरोप भाजपतर्फे पालिका गटनेते प्रभाकर शिंदे यांनी केला आहे. मात्र या गंभीर घटनेप्रकरणी भाजपच्या नगरसेविकांनी आवाज उठवूनही पालिका प्रशासन आणि आरोग्य खात्याने कोणतीही कारवाई केली नाही. महापौर आणि आरोग्य मंत्री यांनीही घटनास्थळी भेट दिली नाही, असा आरोप करीत भाजपच्या नगरसेवकांनी महापौर किशोरी पेडणेकर यांच्या दालनासमोर संताप व्यक्त करत आणि हातात फलक घेऊन घोषणाबाजी करत तीव्र आंदोलन केले.

सदर प्रसूतिगृहातील अतिदक्षता विभाग हा एका खासगी वैद्यकीय संस्थमार्फत चालविण्यात येत असून या संस्थेच्या आणि त्यांच्या डॉक्टरांच्या अक्षम्य हलगर्जीपणामुळे १८ डिसेंबर रोजी शॉर्टसर्किट झाले. त्यामुळे जीवघेणे इन्फेक्शन होऊन ‘सेफ्टिक शॉक’मुळे अनुक्रमे २०, २१ आणि २२ डिसेंबर रोजी ४ लहान बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे, असा आरोपही भाजपतर्फे करण्यात आला आहे.

- Advertisement -

अतिदक्षता विभाग चालविणाऱ्या वैद्यकीय संस्थेकडून पालिकेने प्रसूतिगृहाची जबाबदारी काढून घ्यावी. तसेच, सदर संस्थेच्या विरोधात आणि संबंधित डॉक्टर, कर्मचारी यांच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा. या गंभीर घटनेला जबाबदार खासगी वैद्यकीय संस्थेचा परवाना रद्द करावा, अशी जोरदार मागणी भाजपच्या संतप्त नगरसेवकांनी केली आहे. यावेळी, भाजपच्या नगरसेवकांनी हातात फलक घेऊन आणि उत्स्फूर्त घोषणा देत पालिका मुख्यालयातील महापौर दालनासमोर पालिका आरोग्य विभाग, सत्ताधारी शिवसेना आणि घटनेला जबाबदार खासगी वैद्यकीय संस्थेचा जाहीर निषेध व्यक्त केला. भाजपने महापौर दालनासमोर घोषणाबाजी, निदर्शने केल्याने पालिकेतील वातावरण तापले होते.

भांडुप येथील प्रसूतिगृहात गेल्या ४ दिवसांत ४ लहान बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. पालिका प्रशासन आणि संबंधित डॉक्टर, कर्मचारी यांच्या हलगर्जीपणामुळेच ४ बालकांचा नाहक बळी गेला आहे. महापौर, सत्ताधारी हे राणी बागेतील ‘पेंग्विन’वर कोट्यावधी रुपये खर्चून त्यांची जीवापाड काळजी घेतात. मात्र रुग्णालये, प्रसूतिगृह येथील लहान बालकांच्या जीवाची, त्यांच्या आरोग्याची काळजी घेत नाहीत. यापूर्वी, नायर रुग्णालयातही एका लहान मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली होती. भाजपच्या आरोग्य समितीवरील सदस्यांनी त्यावेळी पालिका प्रशासन आणि सत्ताधारी यांचा निषेध व्यक्त करत राजीनामे दिले होते. आता पुन्हा भांडुप येथे दुर्दैवी घटना घडली आहे, अशी माहिती देताना भाजप गटनेते प्रभाकर शिंदे यांनी तीव्र संताप व्यक्त केला.

- Advertisement -

तसेच, सत्ताधारी राणी बागेतील ‘पेंग्विन’ बारशाच्या तयारीत मश्गुल असून दुसरीकडे पालिका रुग्णालयात, प्रसूतिगृहात नवजात बालकांचे जीव जात आहेत. सत्ताधाऱ्यांना बालमृत्यूने शोकाकुल असणाऱ्या मुंबईकरांचे सोयरसुतक नसून पालिकेची आरोग्य यंत्रणाच व्हेंटिलेटरवर आहे, अशी टीकाही भाजप गटनेते प्रभाकर शिंदे यांनी यावेळी केली.


हेही वाचा – बालकांच्या मृत्यूकरीता जबाबदार असलेल्या आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना निलंबित करा – देवेंद्र फडणवीस


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -