घरमहाराष्ट्रभुजबळ यांना मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

भुजबळ यांना मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

Subscribe

येवला, निफाड तालुक्यातील दुष्काळ फेरपाहणीसाठी सरकारी पथक पाठवणार असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे.

येवला आणि निफाड तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीची फेरपाहणी करण्यासाठी राज्य सरकारच्या वतीने पथक पाठवण्यात येईल,असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छगन भुजबळ यांना दिले आहे. नाशिक जिल्ह्यातील येवला व निफाडसह इतर तालुक्यांमध्ये तीव्र दुष्काळ असूनही या तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर न केल्यामुळे छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्र्यांना येथील ग्राउंड रिऍलिटीबाबत पत्र पाठवून दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली होती. कालच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने येवला येथे दुष्काळाबाबत मोर्चासुद्धा काढला होता. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी पथक पाठवण्याचे भुजबळांना आश्वासन दिले आहे.

प्रचंड दुष्काळाच्या छायेत

छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रात म्हटले होते की, नाशिक जिल्ह्यातील बागलाण, चांदवड,देवळा, इगतपुरी, मालेगाव,नांदगाव, नाशिक व सिन्नर या आठ तालुक्यांमध्ये पीक कापणी प्रयोग हाती घेण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत. सदर पीक कापणी प्रयोगामध्ये माझ्या मतदारसंघातील येवला व निफाड तालुक्यांचा समावेश करण्यात आलेला नाही. येवला तालुक्यात प्रचंड दुष्काळ असतांनाही पावसाच्या आकडेवारीसाठी तालुक्याची सरासरी काढल्यामुळे येवला तालुक्याचा दुष्काळसदृश्य तालुक्यांच्या यादीमध्ये समावेश झालेला नाही. येवला तालुक्यातील सहा पैकी चार मंडळे प्रचंड दुष्काळाच्या छायेत आहेत. तालुक्याची सरासरी न धरता मंडळनिहाय पाऊस व इतर इंडिकेटर्सचा विचार करणे आवश्यक आहे. राज्य शासनाच्या महसूल यंत्रणेने पाठवलेल्या अहवालांचासुद्धा पीक कापणी प्रयोगासाठी विचार झाला नाही.

- Advertisement -

तीव्र दुष्काळ

नॅशनल सेंटर फॉर क्रॉप फोरकास्टिंग या संस्थेकडून मिळालेल्या पीक पाण्याच्या स्थितीनुसार दुष्काळ सदृश्य तालुके जाहीर करण्यात येणार आहे. कोल्हापूर मधील राधानगरी व गगनबावडा इ. तालुक्यांमध्ये अतिवृष्टी होवूनही या तालुक्यांचा दुष्काळसदृश्य यादीत समावेश होतो. आणि माझ्या येवला तालुक्यात तीव्र दुष्काळ असल्यामुळे ऐन पावसाळ्यात ४८ गावांना पिण्यासाठी टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असूनही या तालुक्याचा दुष्काळसदृश्य यादीत समावेश नाही हे अत्यंत संतापजनक असल्याचे भुजबळ यांनी म्हटले होते. येवला व निफाड तालुक्यांसह नाशिक जिल्ह्यातील इतर तालुक्यांमध्ये प्रचंड दुष्काळ आहे. त्यामुळे येथील सद्य परिस्थितीची पाहणी करण्यासाठी राज्य शासनाने पथक पाठवून या तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करावा अशी भुजबळ यांची मागणी आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -