घरमहाराष्ट्रमी राज्यसभा निवडणुकीला सामोरं जाणार नाही, संभाजीराजेंची माघार

मी राज्यसभा निवडणुकीला सामोरं जाणार नाही, संभाजीराजेंची माघार

Subscribe

मुंबईः मी राज्यसभा निवडणुकीला सामोरं जाणार नसल्याचं सांगत संभाजीराजेंनी राज्यसभा निवडणुकीतून माघार घेतली आहे, असं संभाजीराजे छत्रपती जाहीर केलंय. पण ही माझी माघार नसून, स्वाभिमान असल्याचे संभाजीराजे अधोरेखित केलंय. संभाजीराजे छत्रपतींनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेतलीय, त्यावेळी ते बोलत होते.

माझी उमेदवारी सगळ्या पक्षातील लोकांनी मदत करावी, यासाठी होती. माझं व्यक्तिमत्त्व निष्कलंक आहे. ते लक्षात घेऊन तुम्ही मला मदत करा. पण ते होताना काही दिसत नाहीये आणि घोडेबाजार होऊ नये. म्हणून मी या निवडणुकीच्या समोर जाणार नाही. पण ही माघार नाहीये, हा माझा स्वाभिमान आहे, असंही संभाजीराजेंनी अधोरेखित केलंय.

- Advertisement -

2009 च्या लोकसभेची निवडणूक हरल्यानंतर मी पूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला. लोकांनी प्रेम दिलं. लोकांची इच्छा होती, कष्टकरी, ग्रामीण भागातील युवक, शहरी भागातील युवक या सगळ्यांना तुम्ही संघटित करा. माझ्याकडेही ही आज आलेली संधी आहे, मला कोणावरही द्वेष नाही. माझी स्पर्धा ही माझ्याबरोबर आहे. म्हणून विस्थापित मावळ्यांना संघटित करण्यासाठी स्वराज्यची स्थापना करून या गोरगरीब लोकांना न्याय देण्यासाठी, न्यायासाठी जे लढतायत त्यांच्या पाठीशी राहण्यासाठी मी ठामपणे स्वराज्याच्या मागे उभे राहणार आहे, असंही संभाजीराजे छत्रपतींनी सांगितलंय.

माझ्या फॉर्मवर ज्या आमदारांनी सह्या केल्या, त्यांच्या मी पाठीशी राहणार आहे, त्यांचे मी आभार मानतो. मला ऑफर दिली होती, पक्षात या आणि खासदार व्हा, पण ठरवलं होतं मी त्यांच्याकडे जाणार नाही. कालपासून अनेक आमदारांचे फोन आलेत, राजे ही कुठल्याही परिस्थितीत निवडणूक लढवायची, पण मला निश्चित माहितीय यात घोडेबाजार होणार, मला घोडेबाजारसाठी निवडणूक लढवायची नाही आहे. तसेच शिवसेना मला अस्पृश्य नसल्याचंही संभाजीराजेंनी म्हटलं आहे.

- Advertisement -

मी महाराष्ट्रातील सर्व जनतेचे मी आभार व्यक्त करतो. इतकं प्रेम माझ्यावर त्यांनी दिलेलं आहे. मी कदापि ते विसरू शकत नाही. माझा राज्यसभेचा कार्यकाळ संपल्यानंतर पुढची राजकीय दिशा कशी असणार म्हणून मी 12 मे रोजी पुण्यात माझे दोन राजकीय निर्णय जाहीर केले होते. त्यातही मी सांगितलं येणाऱ्या राज्यसभेच्या इलेक्शनमध्ये मी अपक्ष म्हणून उमेदवार म्हणून मी पुढे येणार आहे. पुण्यात पत्रकारानं विचारलं की राजे हा तुमचा भाबडेपणा नाही आहे का मी हो म्हटलं, मला सगळी गणितं माहीत होती, पुढचा प्रवास किती खडतर आहे. पण मलासुद्धा स्वतः पाहायचं होतं, स्वतः अनुभवायचं होतं, की जे प्रामाणिकपणानं 15 ते 20 वर्षे घर सोडून नवीन राजवाडा सोडून मी काम करतोय. समाजासाठी, समाजासाठी पूर्ण महाराष्ट्र पिंजून काढलेला आहे. खासदारकी असतानाही कोणी मला पाठवलं ते न पाहता समाजाची प्रांजळपणाने भूमिका मांडत होतो आणि ही सगळी पार्श्वभूमी पाहून मी आवाहन केलं, सगळ्या पक्षातील लोकांनी मला राज्यसभेत पाठवून द्यावं आणि राज्यसभेच्या तारखा जाहीर झाल्या. मी मुंबईला आलो. मी जे बोलणार आहे, ते बोलायची माझी मुळीच इच्छा नाही. माझा तो स्वभाव नाही. माझ्या रक्तात ते नाही, माझ्या तत्त्वात ते नाही. पण मला आज बोलायचं. मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना सांगू इच्छितो आपण कुठल्या छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक असेल, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा असेल, आपण दोघांनी तिथे जायचं, दोघांनी शिवाजी महाराजांना स्मरण करायचं. जर संभाजी छत्रपती खोटं बोलत असेल तर तुम्ही पहिलं सांगाल, असंही संभाजीराजेंनी सांगितलंय.

इथे आल्यानंतर दोन खासदार मुख्यमंत्र्यांनी माझ्याकडे पाठवले, आमची ओबेरॉयमध्ये मीटिंग झाली. त्या दोघांनी मला सांगितलं की, त्यांची इच्छा आहे, आपण शिवसेनेत प्रवेश करावा. उद्याच्या उद्या तुमची उमेदवारी आम्ही जाहीर करतो. पण मी स्पष्टपणाने सांगितलं मी निवडणूक अपक्ष म्हणून लढवणार आहे. मी शिवसेनेत प्रवेश करू शकत नाही. दोन दिवसांनी खुद्द मुख्यमंत्र्यांनी मला फोन केला. मुख्यमंत्र्यांनी मला निमंत्रित केलं, आपण वर्षावर आल्यास आपण चर्चा करू शकतो. लोकशाहीतलं मुख्यमंत्रिपद केंद्रस्थान असते आणि म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना मी भेटायला गेलो. तिथे तीन मुद्दे नुसते डिस्कस झाले. पहिला मुद्दा त्यांनी सांगितला की, छत्रपतींना आम्हाला बाजूला ठेवायचं नाही, ते आमच्या बरोबर पाहिजेत. म्हणून त्यांचा पहिला प्रस्ताव होता आपण शिवसेनेत प्रवेश करा. तर मी स्पष्टपणे सांगितलं अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार आहे. सगळ्या पक्षातील लोकांनी मला मदत करावी. त्या मिनिटालाच मी तो प्रस्ताव फेटाळला, असंही त्यांनी म्हटलं.

दरम्यान, मीच त्यांना म्हटलं माझ्याकडेही एक प्रस्ताव आहे. तो प्रस्ताव म्हणजे शिवसेनेची ही सीट आहे असं ते म्हणतात, तसा त्यांच्याकडे पूर्ण कोटा नाहीये, तरी त्यांच्यातील महाविकास आघाडीतील अंडरस्टँडिंग आहे. शिवसेनेच्या माध्यमातून महाविकास आघाडी पुरस्कृत अपक्ष उमेदवार मला करा. उद्धव ठाकरेंनी विचार केला आणि म्हटलं ते राजे शक्य होणार नाही. पण महाविकास आघाडीच्या वतीनं शिवसेना पुरस्कृत उमेदवार करायला आमची तयारी आहे. ही त्यांची वाक्ये आहेत. मी त्यांना म्हटलं तुम्ही दोन दिवस विचार करा, मीसुद्धा दोन दिवस विचार करतोय आणि आपण परत भेटू. दोन दिवसांनंतर त्यांच्या मंत्रिमहोदयांचा मला फोन आला की, मुख्यमंत्र्यांनी राजे आपल्याशी चर्चा करायला सांगितलेली आहे. कुठला तरी मध्यम मार्ग काढू, पण आम्हाला तुम्हाला शिवसेना पुरस्कृत उमेदवारी द्यायची आहे. म्हणून मंत्र्यांच्या घरी बैठक सुरू झाली. तिथून मी ओबेरॉयला गेलो. ड्राफ्ट तयार झाला. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सूचना आणि मी दिलेल्या सूचना या दोन्हीचा मार्ग काढून ड्राफ्ट तयार झाला. तो ड्राफ्ट माझ्या मोबाईलमध्ये आहे. सगळा ड्राफ्ट माझ्या मोबाईलमध्ये आहे. मंत्र्यांच्या अक्षरात हस्तलिखित आहे. त्यांच्याकडून आलेले मेसेजही माझ्याकडे आहेत. मुख्यमंत्र्यांनी मी दिलेला शब्द मोडला. स्वराज्य बांधण्यासाठी मी आता सज्ज झालोय. विस्थापित मावळा यांना स्वराज्यात संघटित करण्यासाठी मी आज मोकळा झालोय, असंही त्यांनी सांगितलंय.

Vaibhav Desai
Vaibhav Desaihttps://www.mymahanagar.com/author/vaibhavr/
गेल्या 14 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत; प्रिंट मीडिया चार वर्षे अनुभव, डिजिटल माध्यमाचा साडेनऊ वर्षांचा अनुभव आहे. तसेच अर्थकारण विषयावर लिखाणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -