घरताज्या घडामोडीज्यांनी आमदार केलं त्यांच्याशी गद्दारी नाहीच, सूरत सुटकेची कैलास पाटलांनी सांगितली आपबिती

ज्यांनी आमदार केलं त्यांच्याशी गद्दारी नाहीच, सूरत सुटकेची कैलास पाटलांनी सांगितली आपबिती

Subscribe

एकनाथ शिंदे यांच्या तावडीतून सुटलेले कैलास पाटील आणि नितीन देशमुख यांनी आज पत्रकार परिषद घेत त्यांच्यावर ओढावलेल्या परिस्थितीची माहिती दिली.

एकनाथ शिंदे यांच्यासोबत अपक्षांसह ४६ आमदार असल्याचा दाव केला जातोय. मात्र, यातील अनेक आमदारांना फसवून  घेऊन गेल्याचा दावा आमदार कैलास पाटील यांनी केला आहे. एकनाथ शिंदे यांच्या तावडीतून सुटलेले कैलास पाटील आणि नितीन देशमुख यांनी आज पत्रकार परिषद घेत त्यांच्यावर ओढावलेल्या परिस्थितीची माहिती दिली.  (Kailas Patil talked about his return journey from surat)

कैलास पाटील यांचा परतीचा थरारक प्रवास जशाचा तसा

- Advertisement -

विधान परिषद निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर सहकाऱ्यांनी साहेब भेटणार आहेत, असं सांगितलं. त्यामुळे माझ्यासह अनेक आमदारांना ठाण्याच्या महापौर बंगल्यावर नेलं. साहेब पुढे आहेत, आपल्याला पुढे जायचंय असं सांगून त्यांनी आमची गाडी बदलली. आमच्यासोबत त्यांचा एक कर्मचारीही होता. ठाण्याच्या महापौर बंगल्यावरून आमची गाडी पुढे गेली. ठाणे मागे पडलं. पुढे वसई-विरार गेलं. मला या रस्त्यांची माहिती नव्हती. पण शहरं संपत होती, एवढं कळलं. गाडी पुढे पुढे जात गेली तेव्हा मला समजलं काहीतरी वेगळं होतंय. गाडी नाकाबंदीला थांबली. नाकाबंदीदरम्यान त्यांना सुखरूप सुटायचं होतं. त्यामुळे माझ्या मनात शंकेची पाल चुकचुकली. आपल्याला कुठेतरी चुकीच्या दिशेने घेऊन जातायत असं वाटू लागलं. सरकारविरोधात नक्कीच काहीतरी कारस्थान शिजतंय याची जाणीव झाली. नाकाबंदीच्या वेळी एका माणसाने  थोडं अंतर चालत येण्याची विनंती केली. त्यामुळे मला हा क्षण माझ्या सुटण्यासाठी निर्माण झालेली संधी वाटली. या संधीचा फायदा घेऊन मी दरवाजा उघडला आणि डिव्हायडर क्रॉस करून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावरून चालत राहिलो. खूप अंतर चालल्यानंतर माझ्या लक्षात आलं की हे लोक याच दिशेने मला शोधायला येतील. म्हणून मी विरुद्ध रस्त्यावरून म्हणजेच, सूरतला ज्या दिशेने गाड्या जातात, जिथे भरपूर ट्राफिक होती, त्या रस्त्यावरून मी मुंबईच्या दिशेने चालत राहिलो. एक किलोमीटरपर्यंत ही ट्राफीक होती. या ट्राफीकमधून वाट काढत मी विरूद्ध दिशेने मुंबईच्या दिशेने चालत होतो. मी अनेकांना विनंती केली. पण मला कोणीच सहकार्य केलं नाही. अखेर एका बाईकवाल्याने एका हॉटेलजवळ सोडलं, जिथून मुंबईला जाण्यासाठी ट्रक मिळतात. पण एकही ट्रकवाला मला न्यायला तयार नव्हता. तुम्ही जिथपर्यंत जाल तिथपर्यंत मला न्या, अशी विनंती केल्यावरही कोणी न्यायला तयार झाले नाही. दरम्यान, माझ्या मोबालईची बॅटरी डाऊन होत होती. त्यामुळे मी उद्धव ठाकरेंना फोन करून लगेच आपल्यासोबत घडलेल्या घटनेची माहिती दिली. त्यांनीही सहकार्याची भूमिका घेतली. अखेर, एका युपीच्या चालकाने त्याच्या ट्रकमधून दहिसर चेकपोस्टपर्यंत पोहोचण्याची तयारी दर्शवली. तिथून पुढे मला उद्धव ठाकरेंनी गाडी पाठवली. ती गाडी येईपर्यंत चालक माझ्यासोबत थांबून राहिला. त्याने मला देवाप्रमाणे मदत केली. त्यामुळे मी त्याच्यासोबत सेल्फीही काढला.

शिवसेनेसोबत प्रतारणा करणं मला जमणार नाही. ज्यांनी नेतेपद दिलं, त्यांच्यासोबत गद्दारी नाहीच होणार, असं कैलास पाटील यांनी निक्षून सांगितलं. या दरम्यान, आमदार बालाजी कल्याणकर संपर्कात होते. तेही पुन्हा मुंबईत परतण्याची इच्छा व्यक्त करत होते. मात्र, आता त्यांचा फोन बंद आहे. अनेक आमदारांची परतण्याची इच्चा आहे. पण कोणीही दबावापोटी येत नाहीय, असंही कैलास पाटील यांनी म्हटलं आहे.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -