घरमहाराष्ट्रमुंबईत जोरदार पाऊस; इमारतीच्या कमानीचा भाग कोसळून २ जण जखमी

मुंबईत जोरदार पाऊस; इमारतीच्या कमानीचा भाग कोसळून २ जण जखमी

Subscribe

मुंबईत जोरदार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे मानखुर्द, लल्लूभाई कंपाउंड येथील एका इमारतीच्या कमानीचा भाग अचानकपणे कोसळून दोघेजण जखमी झाले.

मुंबई – सोमवारी सायंकाळपासून मंबईत वाऱ्यासह जोरदार पाऊस सुरू आहे. मागील ३६ तासात मुंबई शहरात ५७.०० मिमी, पूर्व उपनगरात – ८३.७२ मिमी तर पश्चिम उपनगरात सर्वाधिक १०८.४० मिमी इतक्या पावसाची नोंद झाली आहे. भर पावसात २९ ठिकाणी झाडे, फांद्या कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. तर सोमवारी सायंकाळच्या सुमारास मानखुर्द, लल्लूभाई कंपाउंड येथील एका इमारतीच्या कमानीचा भाग अचानकपणे कोसळून दोघेजण जखमी झाल्याची घटना घडली आहे.

या घटनेत जखमी झालेल्या व्यक्तींची नावे देवराज कुपन (४८) व अमोल गजधणे (४३) अशी आहेत. त्यांच्यावर नजीकच्या मानखुर्द येथील जुन्या शताब्दी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

- Advertisement -

मुंबईत मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता –

दरम्यान, आगामी २४ तासांत मुंबई शहर व उपनगरात मध्यम, जोरदार ते अति जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. सुदैवाने मंगळवारी पावसाचा जोर जरा कमी झाला. त्यामुळे मुंबईत सखल भागात पावसाचे पाणी साचून जलमय स्थिती निर्माण झाली नाही. दिवसभरात सकाळी ८ ते सायंकाळी ६ या कालावधीत शहर भागात – ५.६५ मिमी, पश्चिम उपनगरात – ,११.२९ मिमी तर पूर्व उपनगरात – ७.५४ मिमी इतक्या पावसाची नोंद झाली आहे.

- Advertisement -

२९ ठिकाणी झाडे, फांद्यांची पडझड –

मुंबईत सोमवारी सायंकाळपासून पावसाची वाऱ्यासह पावसाची बरसात सुरू आहे. याच पावसात शहर भागात ४ ठिकाणी, पश्चिम उपनगरात – १२ ठिकाणी तर पूर्व उपनगरात – १३ ठिकाणी अशा एकूण २९ ठिकाणी झाडे, फांद्या यांची पडझड झाल्याच्या घटना घडल्या आहेत. मात्र सुदैवाने या दुर्घटनांत कोणीही जखमी झाल्याचे वृत्त नाही. तसेच, शहर भागात – १ व पूर्व उपनगरात – १ अशा दोन ठिकाणी घराचा काही भाग पडण्याच्या घटना घडल्या आहेत. सुदैवाने या घटनांत कोणीही जखमी झाले नाही. त्याचप्रमाणे शहर भागात २ ठिकाणी तर पूर्व उपनगरात – १ अशा तीन ठिकाणी शॉर्ट सर्किटच्या घटना घडल्या असून सुदैवाने त्यात कोणीही जखमी झाले नाही.

विहार व तुळशी तलावांत चांगला पाऊस –

मुंबईत सोमवारपासून चांगला पाऊस पडत आहे. विशेषतः मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या विहार व तुळशी तलावांत चांगला पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. त्यामुळे तलावातील पाणी साठ्यात काहीशी वाढ झाली आहे. विहार तलावांत गेल्या २४ तासात ८५.०० मिमी इतक्या पावसाची तर तुळशी तलावांत ९१.०० मिमी इतक्या पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे विहार तलावांत ९ ऑगस्ट रोजी सकाळी ६ वाजेपर्यंत एकूण २,२००.०० मिमी पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे विहार तलावांत आजमितीस २४,८४० दशलक्ष लिटर ( ८९.६८ टक्के) इतका पाणीसाठा जमा झाला आहे. तसेच, तुळशी तलावांत ९ ऑगस्ट रोजी सकाळी ६ वाजेपर्यंत एकूण ३,०६६ .०० मिमी पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे तुळशी तलावांत आजमितीस ८,०४६ दशलक्ष लिटर (१००.०० टक्के) इतका पाणीसाठा जमा झाला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -