घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रमंत्रिमंडळात नाशिकला स्थान नाही; भाजपात अंतर्गत नाराजी

मंत्रिमंडळात नाशिकला स्थान नाही; भाजपात अंतर्गत नाराजी

Subscribe

नाशिक : चार आमदार, महापालिकेत सत्ता असूनही राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तारात नाशिकच्या स्थानिक आमदारांना स्थान न मिळाल्याने भाजपांतर्गत नाराजीचा सूर दिसून येत आहे. अर्थात उघडपणे याबाबत कोणी बोलण्यास तयार नसले तरी, समर्थकांकडून ही नाराजी जाहीररित्या व्यक्त केली जात आहे. मात्र, दुसर्‍या टप्प्यात निश्चितपणे नाशिकला स्थान मिळेल असे सांगण्यात येत आहे.

गेल्या अडीच वर्षांपासून राज्यात सत्तांतर होण्याबाबत कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता होती ती पूर्ण झाली आहे. त्यानंतर मंगळवारी नव्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तारही झाला. या मंत्रीमंडळ विस्तारात नाशिक जिल्हयातून शिंदे गटाचे आमदार दादा भुसे यांना पहिल्या टप्प्यात संधी देण्यात आली. नाशिक शहरात देवयानी फरांदे, सीमा हिरे, अ‍ॅड. राहूल ढिकले या तीन आमदारांसह चांदवड-देवळामधून डॉ. राहुल आहेर तर बागलाणमधून दिलीप बोरसे असे पाच आमदार आहेत. २०१४ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळातही नाशिकमधील भाजपच्या सर्वच आमदारांनी मंत्रिमंडळात स्थान मिळावे, यासाठी बरेच प्रयत्न केले होते. मात्र, त्याला यश आले नाही. परंतु, महाविकास आघाडी सरकार पायउतार झाल्यानंतर नव्याने सत्तेवर आलेल्या शिंदे-फडणवीस सरकारच्या कार्यकाळात तरी नाशिकच्या स्थानिक आमदारांना मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची अपेक्षा होती. याकरीता आमदार देवयानी फरांदे, डॉ. राहूल आहेर यांची नावे चर्चेत होती. महिलांना प्राधान्य द्यायचे झाल्यास आमदार फरांदे यांची निवड जवळपास निश्चित मानली जात होती.

- Advertisement -

सोमवारी फरांदे यांच्या नावाबाबत शिक्कामोर्तब झाल्याची देखील चर्चा होती. परंतू पहिल्या टप्प्यातील १८ जणांच्या मंत्रिमंडळात एकाही महिलेला स्थान देण्यात आलेले नाही. त्यातच नाशिकमध्ये भाजपचे पाच आमदार असूनही एकाही भाजप आमदाराला मंत्रीमंडळात स्थान न मिळाल्याने स्थानिकांमध्ये नाराजी आहे. यापूर्वी पुष्पाताई हिरे, डॉ. दौलतराव आहेर यांनी राज्याचे आरोग्यमंत्री म्हणून काम केले होते. त्यानंतर शेवटच्या वर्षभरासाठी डॉ. शोभा बच्छाव या आरोग्य राज्यमंत्री होत्या. त्यानंतर महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात छगन भुजबळ हे अन्न पुरवठा तसेच नाशिकचे पालकमंत्री पद भूषवले. मात्र, भाजपच्या कार्यकाळात एकाही स्थानिक आमदाराला संधी न मिळाल्याने दुसर्‍या टप्प्यात तरी ती मिळेल, अशी अपेक्षा आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -