घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रगणेश विसर्जन मिरवणुकीत 'डीजे'ला परवानगी ?

गणेश विसर्जन मिरवणुकीत ‘डीजे’ला परवानगी ?

Subscribe

नाशिक : शहरातील गणेश महामंडळाने यंदाचा उत्सव धूमधडाक्यात साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी सर्व गणेश मंडळ पदाधिकार्‍यांनी एकत्र येत पोलीस आयुक्तांना त्यांच्या मागण्यांबाबत निवेदन दिले. यात विसर्जन मिरवणुकीवेळी वेळेची मर्यादा नको, या प्रमुख मागणीसह एक खिडकी योजना शेवटच्या दिवसापर्यंत राबवण्याची मागणी प्रामुख्याने करण्यात आली आहे.

कोरोना काळानंतर यंदा खर्‍याअर्थाने निर्बंधमुक्त गणेशोत्सवाचे वेध सर्वांनाच लागले आहेत. यासाठी सर्वच गणेशमंडळांनी कंबर कसली आहे. मात्र, कायद्याच्या अडथळ्यांमुळे सर्व गणेशमंडळांच्या वतीने नाशिक शहर गणेशोत्सव महामंडळाने बुधवारी (दि. १०) पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे यांची भेट घेतली. यावेळी गणेशोत्सव मंडळांच्या प्रमुख मागण्या मांडण्यात आल्या. यात विसर्जन मिरवणुकीत शेवटचा गणपती विसर्जित होईपर्यंत परवानगी द्यावी, अशी प्रमुख मागणी करण्यात आली आहे. याशिवाय गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सर्व परवानगीविषयक कामांसाठी एक खिडकी योजना प्रभावीपणे राबवावी, डीजेला परवानगी द्यावी, सर्व गणेश मंडळांना दरवर्षाप्रमाणे परवानग्या द्याव्यात, ज्या गणेश मंडळांच्या उत्सवाचे आगमन सोहळे असतील, तेथील वाहतूक मार्गात बदल करून गैरसोय टाळावी, पोलीस बंदोबस्त द्यावा, शेवटच्या दिवसांपर्यंत मंडप टाकण्याची परवानगी द्यावी, परवानग्यांविषयक सर्व अधिकार स्थानिक पोलीस चौक्यांना देण्यात यावेत, गणेश मंडळांची कुठलीही अडवणूक केली जाऊ नये, एक खिडकी योजना त्वरित सुरू करून त्याठिकाणी पोलिसांसह महानगरपालिका, वाहतूक पोलीस, अग्निशमन दल यांचे सक्षम अधिकारी नियुक्त केले जावेत, पोलीस आयुक्तालयामार्फत असा अधिकारी गणेशोत्सवासाठी नियुक्त करावा समन्वयक म्हणून काम करेल इ. मागण्या यावेळी निवेदनाद्वारे
करण्यात आल्या. या मागण्यांना पोलीस आयुक्तांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून, लवकरच या सर्व मागण्यांचा विचार करून बैठक बोलावणार आहेत. बैठकीला अध्यक्ष समीर शेटे, गजानन शेलार, विनायक पांडे, राजेंद्र बागूल, हेमंत जगताप, पोपटराव नागपुरे, महेश महंकाळे, शैलेश सूर्यवंशी, सत्यम खंडाळे, गणेश बर्वे, बबलू परदेशी, कुणाल मगर, गोविंद कांकरिया आदी उपस्थित होते.

आमच्या सर्व प्रमुख मागण्यांविषयी पोलीस आयुक्त यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून या मागण्यांचा सविस्तर विचार करून पुढील दोन दिवसांत पोलीस यंत्रणा आणि गणेश महामंडळात बैठक होणार आहे. यात अंतिम निर्णय होईल. : समीर शेटे, अध्यक्ष, गणेशोत्सव महामंडळ, नाशिक

काय आहेत प्रमुख मागण्या

  • डीजेला परवानगी द्या
  • विसर्जनवेळी शेवटच्या गणेश विसर्जित होईपर्यंत वाद्य वाजवू द्या आणि वेळेचे बंधन हटवा
  • सर्व गणेश मंडळांना परवानग्यांसाठी ‘एक खिडकी’ योजना आतापासूनच राबवा
  • तेथे पोलिसांसह पालिका, अग्निशमन, वाहतूक पोलीस अधिकारी नियुक्त करा
  • सर्व गणेश मंडळांना पूर्वीप्रमाणेच परवानग्या द्या
  • शेवटच्या दिवसापर्यंत मंडळांना मंडप आणि स्टेज लावण्याची परवानगी द्या
  • मोठ्या मंडळांजवळ पोलीस बंदोबस्त द्या, गरजेनुसार वाहतूक मार्गात बदल करा
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -