घरमुंबईमेट्रो-३च्या कारशेडसाठी आणखी वृक्षतोड नाही

मेट्रो-३च्या कारशेडसाठी आणखी वृक्षतोड नाही

Subscribe

अश्विनी भिडे यांची ग्वाही

कुलाबा ते सिप्झ या मेट्रो-३च्या आरेतील कारशेडसाठी अतिरिक्त झाडे तोडण्याची आवश्यकता लागणार नाही, अशी ग्वाही मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालिका अश्विनी भिडे यांनी दिली. सोबतच मेट्रो-३च्या कामाची किंमत वेगवेगळ्या कारणांमुळे वाढली असून त्यासाठी राज्य सरकारने निधी मंजूर केल्याचेही त्यांनी सांगितले. कारडेपोच्या पहिल्या टप्प्याचे काम एप्रिल २०२३पर्यंत पूर्ण होईल. त्यानंतर ट्रेनच्या चाचण्या होतील आणि रेल्वे सुरक्षा आयुक्तालयाकडून प्रमाणपत्र मिळवण्यासाठी आवश्यक बाबींची पूर्तता करण्यात येईल, अशी माहितीही भिडे यांनी दिली. पदभार स्वीकारल्यानंतर अश्विनी भिडे यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेऊन प्रकल्पाची सद्यस्थिती, वाढीव खर्च, कारडेपो आदी मुद्द्यांवर माहिती दिली.

आरेतील कारशेडसाठी राज्य सरकारने एमएमआरसीला २०१६मध्ये एकूण ३० हेक्टर जागा दिली. त्यापैकी २५ हेक्टर जागेमध्येच काम करण्यात येणार आहे. उर्वरित ५ हेक्टर जागेमधील झाडे न तोडण्याचा निर्णय आम्ही घेतला. त्यामुळे आता अतिरिक्त झाडे तोडली जाणार नाहीत, असे अश्विनी भिडे यांनी सांगितले.

- Advertisement -

मेट्रो-३च्या कारशेडचे काम हे भूमीअंतर्गत होणार आहे. या कामात असलेल्या अडथळ्यांमुळे आणि विलंबामुळे या कामाच्या निधीत १० हजार २७० कोटींनी वाढ झाली आहे. कारशेडच्या प्रकल्पाचे काम ७५ टक्के पूर्ण झाले आहे. तसेच या कामाला २३ हजार १३६ पैकी २१ हजार ८९० कोटी निधी मिळाला. त्यामधील २१ हजार ५२० कोटी निधी खर्च केला. उर्वरित कामासाठी निधीची आवश्यकता होती. ती मंत्रिमंडळ बैठकीत करण्यात आली, असेही भिडे यांनी सांगितले.

एमएमआरडीएला हवी कांजूरमार्गची जागा
मेट्रो-३ मार्गिकेसाठी नाकारण्यात आलेल्या कांजूरमार्ग येथील जागेची मागणी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) केली आहे. एमएमआरडीएने त्याबाबतचे पत्र राज्य सरकारला लिहिले आहे. त्यामुळे कांजूरमार्ग येथील वादग्रस्त जागा पुन्हा चर्चेत आली आहे. स्वामी समर्थनगर ते विक्रोळी या मेट्रो-६ मार्गिकेच्या कारशेडच्या उभारणीसाठी जागेची मागणी करण्यात आली आहे. केंद्र सरकारकडून ही जागा मेट्रो-६ मार्गिकेसाठी उपलब्ध न झाल्यास हा प्रकल्प रखडण्याची चिन्हे आहेत. या जागेवर दावा सांगणार्‍या विकासकाने आधीच आपला दावाही मागे घेतला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -