घरमहाराष्ट्रसिंचन घोटाळ्याची पुन्हा चौकशी?

सिंचन घोटाळ्याची पुन्हा चौकशी?

Subscribe

भाजप नेते मोहित कंबोज यांच्या ट्विटने खळबळ, विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याकडे अंगुलीनिर्देश

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाची अचूक वेळ साधत भाजप नेते मोहित कंबोज यांनी बुधवारी ट्विट करून राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून दिली. राष्ट्रवादीचे अनिल देशमुख, नवाब मलिक तसेच सेना नेते संजय राऊत यांच्यासोबत राष्ट्रवादीचा बडा नेता लवकरच तुरुंगात दिसेल, असा दावा कंबोज यांनी मंगळवारी केला. कंबोज यांचा रोख विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याकडे असल्याचे मानले जाते. दुसरीकडे अधिवेशन काळात असे आरोप करून विरोधी पक्षांचा आवाज दाबण्याचे कारस्थान आहे, असा पलटवार राष्ट्रवादीने केला आहे. मोहित कंबोज यांनी आघाडी सरकारच्या काळातील हजारो कोटींच्या सिंचन घोटाळ्याची चौकशी करण्याची मागणी केल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. या प्रकरणात विरोधी पक्षनेते अजित पवार हे अडचणीत येणार असल्याची चर्चा सुरू आहे.

आघाडी सरकारमध्ये अजित पवार जलसंपदा मंत्री होते. यावेळी सिंचन प्रकल्पांची कामे देताना हजारो कोटींचा आर्थिक गैरव्यवहार केल्याचे आरोप अजित पवार यांच्यावर झाले होते, मात्र नोव्हेंबर २०१९मध्ये अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचे औट घटकेचे सरकार स्थापन झाले होते. तेव्हा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अजित पवार यांना क्लीन चिट देऊन सिंचन घोटाळ्याचे प्रकरण बंद केले होते.

- Advertisement -

कंबोज यांचा स्ट्राईक रेट १०० टक्के
कंबोज यांच्या ट्विटवर मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी सूचक प्रतिक्रिया दिली. मी अजितदादांच्या त्या केसविषयी आणि कारवाईच्या संकेताविषयी बोलणार नाही. सिंचन घोटाळ्याच्या फाईलवर सरकार माहिती देईल, पण मोहित कंबोज यांचा स्ट्राईक रेट १०० टक्के आहे, असा दावा करीत शेलार यांनी कंबोज यांची पाठराखण केली, तर गेल्या सरकारच्या काळातही सी समरी झालेल्या केसेस पुन्हा ओपन करून तपास करण्यात आला. त्यामुळे सिंचन घोटाळ्याच्या चौकशीही मागणी होऊ शकते, असे भाजप नेते प्रवीण दरेकर म्हणाले.

एकूणच मोहित कंबोज यांच्या ट्विटचा अर्थ आणि भाजप नेत्यांनी कंबोज यांची केलेली पाठराखण यावरून अजित पवार यांची कथित सिंचन घोटाळ्याची ती फाईल पुन्हा खुली होऊ शकते, असे संकेत मिळत आहेत.

- Advertisement -

प्लॅन बीची तयारी : दमानिया यांचा दावा
मंत्रिमंडळ विस्तारातील नाराजीमुळे शिंदे गट सरकारमधून कधीही बाहेर पडेल अशी भीती भाजपला आहे. त्यामुळेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांवर दबाव टाकून त्यांना आपल्याकडे खेचण्याचा प्लॅन बी भाजपतर्फे आखला जात असावा, अशी शंका सिंचन घोटाळ्याच्या चौकशीचा पाठपुरावा करणार्‍या सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी उपस्थित केली आहे.

अजित पवारांची क्लीन चिट न्यायालयात प्रलंबित
सिंचन घोटाळाप्रकरणी २०१९मध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) राष्ट्रवादीचे नेते आणि सध्याचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांना क्लीन चिट दिली होती. त्यानंतर नागपूर खंडपीठात प्रतिज्ञापत्र दाखल करत एसीबीने अजित पवार यांची व्हीआयडीसी प्रकरणात भूमिका नाही, असे म्हटले होते, मात्र ही क्लीन चिट नागपूर खंडपीठाने स्वीकारली नसल्याने ती न्यायालयात प्रलंबित आहे. त्यामुळे अजित पवार यांच्यावर अजूनही कारवाईची टांगती तलवार असल्याचे म्हटले जात आहे. परिणामी मोहित कंबोज यांनी केलेल्या ट्विटशी पवारांच्या या प्रकरणाचा काही संबंध आहे का, याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -