घरमहाराष्ट्रदेशाचे कृषीमंत्री म्हाडाच्या बैठकीत कशासाठी? भाजपाचा पवारांना सवाल

देशाचे कृषीमंत्री म्हाडाच्या बैठकीत कशासाठी? भाजपाचा पवारांना सवाल

Subscribe

मुंबई – पत्राचाळ घोटाळाप्रकरणी शरद पवार यांनी राज्य सरकारला आव्हान दिले आहे. चौकशीला कधीच नाही म्हटलेले नाही. पत्राचाळ घोटाळा प्रकरणी चौकशी करायची असेल तर लवकरात लवकर करा. पण, जर आरोप खोटे ठरले तर काय करणार हे ही सरकारने स्पष्ट करावे असेही पवार म्हणाले. यावेळी भाजप सरकरच्या काळात देशातील नागरिकांसमोरील प्रश्न बाजूला ठेवून अन्य पक्षाच्या नेत्यांच्या मागे चौकशीचा ससेमिरा लावण्याचा कार्यक्रम सुरू असल्याची टीका शरद पवारांनी केली. यावरून भाजपानेही शरद पवारांवर टीका केली आहे. देशाचे कृषीमंत्री म्हाडाच्या बैठकीत कशासाठी? असा सवाल भाजपा महाराष्ट्रच्या ट्विटर अकाऊंटवर विचारण्यात आला आहे.

हेही वाचा – चौकशी करा, पण आरोप खोटे ठरले तर काय करणार हेही स्पष्ट करा : शरद पवार

- Advertisement -

माननीय शरद पवारसाहेब, तुम्हीच सांगा पत्राचाळीतील 700 च्या वर बेघर झालेल्या मराठी कुटुंबियांना की, केंद्रीय कृषिमंत्री पदी असताना, एका चाळीच्या पुनर्वसनसाठी ‘म्हाडा’ च्या अधिकाऱ्यांसोबत बैठकीच काय प्रयोजन होतं? देशाचे कृषीमंत्री म्हाडाच्या बैठकीत कशासाठी? असा प्रश्न विचारत भाजपाने पवारांवर टीका केली.

तसंच, माननीय पवारसाहेब, तुमच्या मार्गदर्शनाखाली प्रकल्प होत होता तर एवढी ससेहोलपट मराठी माणसाची का झाली? बेघर झालेले मराठी कुटुंबियांची वेदना जाणून का घेतल्या नाहीत? जितेंद्र आव्हाड अशा निष्फळ बैठका घेऊन काय फायदा? 700 च्या वर मराठी कटुंब बेघर झालेत त्याचं काय? असा प्रश्नही भाजपाने विचारला आहे. 

- Advertisement -


हेही वाचा मुंबईतील कामासाठी चेन्नईत मुलाखती, सरकारवर आगपाखड करत आदित्य ठाकरेंनी पुरावाच सादर केला

काय आहे प्रकरण?

सक्तवसुली संचालनालय (ईडी) या पत्राचाळ मनीलॉण्ड्रिंग प्रकरणाचा तपास करीत असून याप्रकरणी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना अटक करण्यात आली आहे. ईडीने याप्रकरणी आरोपपत्र दाखल केले आहे. 2006 ते 2007 या वर्षभराच्या काळात पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्पासंदर्भात काही बैठका झाल्या. या बैठकांना म्हाडा अधिकाऱ्यांसह तत्कालीन केंद्रीय कृषीमंत्री आणि तत्कालीन मुख्यमंत्री उपस्थित असल्याचा उल्लेख आरोपपत्रात करण्यात आला आहे. या कालावधीत केंद्रामध्ये शरद पवार हे कृषीमंत्री तर, राज्याचे मुख्यमंत्री विलासराव देशमुख होते. त्यामुळे आरोपपत्रात संजय राऊत हेच पत्राचाळ घोटाळ्यातील मास्टरमाइंड असल्याचा दावा करण्यात आला असला तरी, शरद पवार हे सुद्धा संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. गोरेगाव पत्राचाळ पुनर्विकास प्रकरणी किमान चार महत्त्वाच्या बैठका झाल्या. त्या चारही बैठकींना संजय राऊत उपस्थित होते. तर, दोन बैठकींना शरद पवार आणि एका बैठकीला उपस्थित होते, असा दावा आरोपपत्रात करण्यात आल्याचे सांगण्यात येते.

आव्हाडांचं स्पष्टीकरण

14 जानेवारी 2006 रोजी बैठक घेतली. या बैठकीत सर्व अधिकारी आणि संबंधित लोकं उपस्थित होते असे जितेंद्र आव्हाडांनी आज पत्रकार परिषद घेऊन सांगितले. पत्राचाळ प्रकरणात शरद पवारांनी बैठक घेतली यात नवल काय असा सवाल करत राज्यातील विविध प्रश्नी अनेक बैठका शरद पवार यांनी घेतल्या होत्या. चर्चा करुन संवाद साधणे आणि मध्य मार्ग काढणे हाच हेतू त्या बैठकीत होता, असे आव्हाड म्हणाले. राज्याचे माजी मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय तत्कालीन गृहनिर्माण विभागाचे सचिव होते. त्यांनी या बैठकीचे इतिवृत्त असल्याचे आव्हाड यांनी सांगितले. या बैठकीत कोणताही निर्णय झाला नसल्याचे त्यांनी सांगितले. या बैठकीत सरकार निर्णय घेईल असे मत शरद पवार यांनी व्यक्त केले होते.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -