घरसंपादकीयओपेडपाकिस्तान जिंदाबाद म्हणणारे त्या देशात जाणार का?

पाकिस्तान जिंदाबाद म्हणणारे त्या देशात जाणार का?

Subscribe

समाजसेवेचा बुरखा पांघरून देशद्रोही कारवाया करणार्‍या पॉप्युलर फ्रन्ट ऑफ इंडिया या संघटनेवर भारत सरकारने ५ वर्षांसाठी बंदी घातली आहे. या संघटनेच्या देशभरातील विविध कार्यालयांवर छापे टाकून त्यांच्या अनेक हस्तकांना ताब्यात घेतल्यानंतर अनेक देशविरोधी गोष्टींत त्यांचा हात असल्याचे पुढे आले, पण एका संघटनेवर बंदी घातल्यावर ती दुसर्‍या रुपात पुढे येते हे आजवर दिसून आलेले आहे. या संघटनांचे लोक भारताचे इस्लामीकरण करण्याचे स्वप्न पाहत असून पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देत आहेत, पण अशा घोषणा देणारे कितीजण आज पाकिस्तानात जायला तयार आहेत किंवा आज जी पाकिस्तानची भयावह परिस्थिती आहे, तीच त्यांना इथे निर्माण करायची आहे का, या प्रश्नांची उत्तरे त्यांच्याकडे नाहीत.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत एका बाजूला मुस्लीम समाजाशी सलोखा निर्माण व्हावा यासाठी मुस्लीम नेत्यांशी भेटीगाठी घेऊन चर्चा करत आहेत, तर दुसर्‍या बाजूला नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी (एनआयए) देशभरातील पॉप्युलर फ्रन्ट ऑफ इंडियाच्या (पीएफआय) कार्यालयांवर छापे टाकून त्या संघनटनेच्या पदाधिकार्‍यांना ताब्यात घेत आहे. कागदपत्रे हस्तगत करत आहे, त्यांच्या कार्यालयांना सील ठोकत आहेत. केरळमध्ये एनआयएच्या छापेमारीच्या विरोधात केरळ बंदचे आवाहन करण्यात आहे. यावेळी काही हिंसक घटना घडल्या. एनआयएने ताब्यात घेण्यात आलेल्या पीएफआयच्या पदाधिकार्‍यांकडून जी माहिती मिळाली आहे, ती धक्कादायक वाटत असली तरी त्यात फारसा काही धोका आहे असे वाटत नाही. त्यात एक गोष्ट होती ती पीपल्स फ्रन्ट या संघटनेच्या हस्तकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येचा कट रचला होता.

बिहारमध्ये जुलै महिन्यात पंतप्रधान मोदींची सभा झाली, त्यावेळी घातपात घडवायचा होता, पण तो कट फसला. याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, हे खरे आहे, पण त्याचबरोबर एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल, कुठल्याही मुस्लीम गटाला जर प्रसिद्धीच्या झोतात यायचे असेल तर आपण भारतातील हिंदुत्ववादी नेत्याच्या हत्येचा कट रचला, अशी हवा निर्माण केली की त्यांना प्रसारमाध्यमांतून मोठी प्रसिद्धी मिळते. त्यामुळे काही मुस्लीम गटांची ही स्टाईल होऊन बसलेली आहे. त्याच्याशी या देशातील सर्वसामान्य आणि आपल्या नोकरी व्यवसायात व्यस्त असलेल्या मुस्लिमांचा काहीही संबंध नसतो. कारण कट्टरतावाद ही काही एका विशिष्ट धर्माची मक्तेदारी नसते. काही वर्षांपूर्वी हिंदुत्वाच्या रक्षणासाठी एकत्र आलेले भाजप आणि शिवसेना या दोन हिंदुत्ववादी पक्षांमध्ये सध्या जे काही वैर निर्माण झालेले आहे, त्यावरून हे सिद्ध होते आणि दुसरे म्हणजे पीएफआय या संघटनेला २०४७ सालापर्यंत भारताला मुस्लीम राष्ट्र बनवायचे आहे.

- Advertisement -

मुळात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अनेक कट्टरतावादी संघटनांच्या रडारवर आहेत, अशा धमक्या आणि बातम्या अधूनमधून उठत असतात. त्यात पाकपुरस्कृत मुस्लीम संघटनांचा जास्त भरणा असतो. मोदी हे पंतप्रधान होऊ नयेत, कारण ते पंतप्रधान झाले तर पाकिस्तानचे काही खरे नाही, ते पाकिस्तानला भारत आणि अफगाणिस्तान यांच्यामध्ये चिरडून टाकतील, अशी भीती पाकिस्तानातील कट्टरतावादी संघटनांच्या नेत्यांनी तिथल्या वृत्तवाहिन्यांवर त्यावेळी व्यक्त केलेली होती, तसेच ते जाहीर सभांमधून सांगत होते. मोदी हे भारताचे पंतप्रधान असल्यामुळे त्यांची सुरक्षा व्यवस्था अतिशय अद्ययावत आणि दक्ष असते. मोदींना टार्गेट करणे वाटते तितके सोपे नाही, त्याचबरोबर मोदी हे बिनधास्त वावरत असतात, त्यामुळे जी व्यक्ती बिनधास्त वावरते, त्याच्यावर हल्ला करणार्‍यालाच धास्ती वाटत असते.

१५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीला लाल किल्ल्यावरून पंतप्रधानांचे भाषण होते. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची हत्या झाल्यानंतर सगळेच पंतप्रधान लाल किल्ल्यावरून भाषण करताना संरक्षक बुलेटप्रूफ काचेचे कवच आपल्या सभोवताली ठेवत असत, पण मोदी पंतप्रधान झाल्यावर त्यांनी काचेचे संरक्षक कवच आपल्यासमोर न ठेवता खुलेपणाने भाषण देण्यास सुुरुवात केली. दुसरी गोष्ट म्हणजे भारताला २०४७ सालापर्यंत मुस्लीम राष्ट्र बनवणे, ही गोष्ट भावनिकदृष्ठ्या विचार केला तर बिगरमुस्मिलांना खरी वाटते, कारण सध्या बिगरमुस्लिमांच्या तुलनेत मुस्लीम जास्त मुले जन्माला घालतात. त्यामुळे पुढे यांची अशीच लोकसंख्या वाढत जाऊन मुस्लीमबहुल लोकसंख्येच्या आधारावर भारत हे मुस्लीम राष्ट्र बनेल, असे वाटते. पण ते वाटते तितके सोपे नाही, याला इतिहास साक्ष आहे.

- Advertisement -

कारण भारतावर सहाशे वर्षे क्रूर मुस्लीम राजवटीचा वरवंटा फिरला, पण तरीही आज भारतात ८० टक्के हिंदू आणि बिगरमुस्लीम लोक आहेत. १९४७ आणि १९७१ पर्यंत पाकिस्तान आणि बांगलादेश हे भारताचा भाग होते, पण त्यावेळचे मवाळवादी काँग्रेसचे नेतृत्व पाकिस्तानवाद्यांच्या आक्रमक पवित्र्यासमोर मोडून पडले. त्यामुळे पाकिस्तानची निर्मिती झाली. पुढे पाकिस्तानने सध्या बांगलादेश असलेल्या भागावर आक्रमण करून तेथील जनतेवर अमानुष अन्याय, अत्याचार सुरू केले. त्यावेळी त्यांनी हेही लक्षात घेतले नाही की, ती आपल्याच धर्माची माणसे आहेत. त्या भागातील लोक भारत सरकारला शरण आले, त्यांचे जीव वाचवण्यसाठी भारताने हस्तक्षेप केला. भारतीय सैन्याने लढून पाकिस्तानचा पराभव केला. त्यांचे ९१ हजार सैन्य युद्धकैदी बनवले. पाकिस्तानला नामोहरम केले.

शेवटी शरण आलेल्याला मरण नको, या जुन्या तत्त्वानुसार भारताने पाकिस्तानचे सैनिक सोडून दिले. खरे तर भारत सगळ्याच बाबतीत पाकिस्तानपेक्षा मोठा आहे. क्षेत्रफळ, लोकसंख्या, सैन्य, शस्त्रसामुग्री, आंतरराष्ट्रीय प्रभाव अशा अनेक गोष्टींच्या बाबतीत पाकिस्तानची भारतासोबत तुलना होऊ शकत नाही. जेव्हा जेव्हा पाकिस्तानने भारताविरोधात युद्ध पुकारले तेव्हा त्यांना पराभूत होऊन पळ काढावा लागला. बलाढ्य भारताविरोधात आपल्याला थेट युद्ध करता येणार नाही हे लक्षात आल्यावर पाकिस्तानातील शासक आणि तिथल्या धार्मिक कट्टरवाद्यांनी भारताविरोधात छुप्या युद्धाचा मार्ग अवलंबला. त्यातूनच मग भारतात आपले स्लिपर सेल्स तयार करण्याच्या कारवाया सुरू करण्यात आल्या. भारतातील गरीब आणि बैठ्या वस्त्यांमध्ये राहणार्‍या मुस्लिमांना धर्माच्या नावाखाली अशा छुप्या युद्धात गोवले जाते. त्यातूनच भारतात विविध ठिकाणी बॉम्बस्फोट घडवून येथे मोठी मनुष्यहानी आणि मालमत्तेची हानी करून दहशत पसरविण्याचे प्रकार घडले.

मुंबईत १९९३ साली दाऊद इब्राहिमच्या मुंबईतील हस्तकांच्या मदतीने साखळी बॉम्बस्फोट घडवून भारताची आर्थिक राजधानी मुंबईला आणि पयार्याने भारताला मोठा हादरा देण्यात आला. त्यानंतरही पाकिस्तानात बसलेल्या सूत्रधारांनी इथल्या हस्तकांच्या माध्यमातून भारतात विविध ठिकाणी बॉम्बस्फोट घडवले, हल्ले केले. २००८ साली कसाबच्या टोळीने मुंबईवर भयंकर हल्ला केला होता. ही अतिरेक्यांची टोळी पाकिस्तानातूून आलेली होती हे सिद्ध झाल्यावरही पाकिस्तानने तो मी नव्हेच असा पवित्रा घेतला होता. मुंबई पोलीस आणि नॅशनल सिक्युरिटी गार्डसनी ठार केलेल्या या टोळीतील अतिरेक्यांचे मृतदेहही स्वीकारण्यास नकार दिला. शेवटी भारतालाच त्यांचे दफन करावे लागले.

पाकिस्तानची निर्मिती ही मुळात भारत आणि हिंदूद्वेषातून झालेली आहे. १९४७ साली भारताची फाळणी झाल्यानंतर ज्या मुस्लिमांना पाकिस्तानात जायचे होते, ते पाकिस्तानात निघून गेले, ज्यांना भारतात रहायचे होते ते भारतात राहिले, त्यामुळे जे मुसलमान भारतात राहिले त्यांनी इथे गुण्यागोविंदाने राहणे अपेक्षित आहे. इथे राहणार्‍या मुस्लिमांनी बाहेरील शक्तींच्या प्रेरणेने भारताच्या विरोधात घातपाताची कृत्ये करणे आणि तशी कृत्ये करणार्‍या लोकांना पैसा आणि साधने पुरवणे योग्य नाही. या देशात राहणारे सगळेच मुस्लीम अशा प्रवृत्तीचे नाहीत, पण काही जे कट्टरवादी आहेत, ते समाजसेवेच्या नावाने काही संघटनांची स्थापना करतात आणि आतून विघातक कृत्यांना चालना देण्याचे काम सुरू असते. त्यामुळे सीमी ही अशीच सुरुवातीला विद्यार्थी संघटना समजली जात होती, पण पुढे त्यांचे वेगळेच कारनामे पुढे आले.

अशा संघटनांवर जेव्हा बंदी घातली जाते तेव्हा त्यातील लोक वेगळ्या नावाची संघटना स्थापन करून आपले समाजविघातक काम सुरू ठेवतात. त्याचा फटका या देशातील शांतताप्रिय मुस्लिमांना बसतो. एखाद्या समाजातील काही लोक जेव्हा समाजविघातक काम करतात, तेव्हा सगळ्या समाजाकडे त्या नजरेने पाहिले जाते. काही धार्मिक मुस्लीम संघटनांना असे वाटते की लोकसंख्या वाढवून मुस्लीम लोक भारताचे इस्लामीकरण करू शकतील, पण केवळ लोकसंख्या वाढवली, पण मुलांचे चांगल्या प्रकारे पालनपोषण केले नाही, त्यांना जीवनोपयोगी आणि आधुनिक शिक्षण दिले नाही, तर त्यांची परिणती काय होते ते दिसून येते. सगळे अतिरेकी हे मुस्लीम नसतात, पण जे अतिरेकी सापडतात त्यातील बहुतांश मुस्लीम असतात असे दिसून येते. असे का होते याचा विचार मुस्लिमांनी करण्याची गरज आहे, पण तसा विचार न करता याच देशात राहून इथे घातपात घडविणे आणि त्याचसोबत धर्माच्या नावावरून शांतपणे जगणार्‍या मुस्लिमांच्या मनात भ्रम निर्माण करणे योग्य नाही.

पाकिस्तानची निर्मिती झाली तेव्हा त्याच्या संस्थापकांनी त्या देशाला मुस्लीम राष्ट्र म्हणून घोषित केले. मुसलमानांसाठी पकिस्तान, या अट्टाहासापोटी त्या देशाची निर्मिती करण्यात आली, पण ७५ वर्षांनंतर त्या देशाची परिस्थिती काय आहे आणि भारताची परिस्थिती काय आहे याचा तुलनात्मक विचार केला तर वेगळे पाकिस्तान हा महमदअली जीनांचा फसलेला प्रयोग आहे हे लक्षात आल्यावाचून राहत नाही. पाकिस्तानी राज्यकर्त्यांनी भारताशी जुळवून घेतले असते तर त्या देशाची प्रगती झाली असती. गेल्या ७५ वर्षात पाकिस्तानी राज्यकर्त्यांनी भारतावर चार युद्धे लादली, त्यात त्यांचा पराभव झाला. त्यांनी आता चीनशी दोस्ती करून भारताच्या विरोधात आघाडी उघडलेली आहे. चीनला खूश करण्यासाठी त्यांनी पाकव्याप्त काश्मीरचा काही भाग चीनला दिला. आज चीन पाकिस्तामध्ये हवी तशी घुसखोरी करत आहे. त्यांना हवे असलेले प्रकल्प राबवत आहे, त्यामुळे तेथे राहणार्‍या पाकिस्तानी नागरिकांची कोंडी होत आहे.

आपल्याच देशात राहून त्यांना पोरके होण्याची वेळ आलेली आहे. पाकिस्तानात राजकीय अनागोंदी आहे. त्या देशात कधीच लोकशाही नांदू शकली नाही. कारण नेहमीच तिथल्या लष्कर प्रमुखाने लोकशाही उखडून फेकून देऊन त्या देशावर लष्करी हुकूमशाही लागू केली. जगातले मोठे अतिरेकी हे पाकिस्तानात सापडले. त्यातील ओसामा बिन लादेन हा खास उदाहरण होते. भारतामध्ये घातापाताच्या कारवाया घडवून आणणारे अनेक सूत्रधार हे पाकिस्तानात खुलेआम वावरत आहेत. ज्या दाऊद इब्राहिमने आपल्या हस्तकांच्या मदतीने मुंबईत हाहा:कार उडवून दिला, त्याने पाकिस्तानी क्रिकेटपटू जावेद मियादादच्या मुलाला आपली मुलगी दिली. पाकिस्तान आज अतिरेक्यांचा अड्डा बनलेला आहे. त्यामुळे इस्लामीकरण झालेल्या पाकिस्तानची काय अवस्था आहे हे सगळे जग पाहत आहे. पीएफआयला भारताचे इस्लामीकरण करून भारताचीही अशीच अवस्था करायची आहे का, त्यातून ते काय साध्य करणार आहेत, हे त्यांना कळत नसेल तर भारत सरकारने सीमी आणि पीएफआयसारख्या संघटनांवर केवळ काही वर्षांची बंदी घालून चालणार नाही, तर ही प्रवृत्ती मुळासकट नष्ट करायला हवी.

Jaywant Rane
Jaywant Ranehttps://www.mymahanagar.com/author/rjaywant/
25 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत. राजकीय, सामाजिक, वैचारिक विषयांवर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -