घरमहाराष्ट्रविचारांचे वारसदार! मेळाव्याआधीच एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना डिवचले

विचारांचे वारसदार! मेळाव्याआधीच एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना डिवचले

Subscribe

मुंबई – येत्या काही तासांतच बीकेसी आणि शिवाजी पार्कवर एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांची भाषणाची तोफ धडाडणार आहे. शिवसेनेत फूट पडल्यानंतर पहिल्यांदाच दोन ठिकाणी दसरा मेळावा होणार आहे. बाळासाहेब ठाकरे यांचा वारसदार या नात्याने उद्धव ठाकरे गेल्या काही वर्षांपासून शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेत आहेत. परंतु, एकनाथ शिंदे यांनी या मुद्द्यावरून ठाकरेंना डिवचलं आहे. मुलगा असल्याने कोणी वारसदार ठरत नाही, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

“मेरे बेटे, बेटे होने से मेरे उत्तराधिकारी नहीं होंगे, जो मेरे उत्तराधिकारी होंगे, वो मेरे बेटे होंगे”, अशी हरिवंशराय बच्चन यांची एक पंक्ती एकनाथ शिंदे यांनी ट्विट केलं आहे. एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंचं नाव न घेता त्यांच्यावर टोला लगावला आहे. मुलगा असल्याने कोणीही उत्तराधिकारी बनत नाही. जो उत्तराधिकारी असतो तो मुलगा ठरेल, असं सूचक वक्तव्य एकनाथ शिंदे यांनी केलंय.

- Advertisement -


शिवसेना संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांनी दसरा मेळावा घेण्याची प्रथा सुरू केली. गेल्या ५६ वर्षांपासून दसरा मेळाव्यातून विचारांचं सोनं लुटलं जातंय. बाळासाहेब ठाकरेंनंतर उद्धव ठाकरे यांनी ही प्रथा सुरू ठेवली आहे. मात्र, शिवसेनेत फूट पडल्यानंतर पहिल्यांदाच दसरा मेळाव्यावरून वाद सुरू झाले. ठाकरे गटाकडून दसरा मेळावा शिवाजी पार्कवर घेण्याकरता परवानगी मागण्यात आली होती. त्यानंतर, शिंदे गटाकडून समाधान सरवणकर यांनीही शिवाजी पार्कवर दावा केला. हे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयात गेलं. उच्च न्यायालायने उद्धव ठाकरेंच्या बाजूने  कौल लागला. त्यामुळे शिंदे गटाकडून अधिक राग व्यक्त करण्यात येतोय. दोन्ही गटाकडून दसरा मेळावा यशस्वी होण्याकरता प्रयत्न सुरू आहेत. दसरा मेळाव्याचा इव्हेंट करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचंही राजकीय तज्ज्ञांकडून सांगण्यात येतंय. त्यातच, उद्धव ठाकरे हे वारसदार असल्याने ते  दसरा मेळावा घेत आहेत, परंतु, शिवसेनेचे खरे वारसदार आम्ही आहोत, असा दावा शिंदे गटाकडून करण्यात येतोय.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -