घरमहाराष्ट्रफूट फक्त शिवसेनेतच नव्हे, ज्यांच्या नावाने बंड झाले त्या ठाकरे-दिघे कुटुंबांतही दुफळी!

फूट फक्त शिवसेनेतच नव्हे, ज्यांच्या नावाने बंड झाले त्या ठाकरे-दिघे कुटुंबांतही दुफळी!

Subscribe

मुंबई : राज्यात अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे. आमचीच खरी शिवसेना असल्याचे सांगत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वाद शिगेला पोहोचला आहे. पण ही फूट फक्त संघटनेपुरतीच मर्यादित नसून ठाकरे आणि दिघे कुटुंबातही पाहायला मिळत आहे.

शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांचे हिंदुत्व आणि विचार उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत मागे पडले होते, असा दावा करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह 40 आमदारांनी बंडाचा झेंडा फडकावला होता. त्यातून जूनमध्ये ठाकरे सरकार पायउतार झाले. भाजपाच्या साथीने एकनाथ शिंदे गटाने सरकार स्थापन केले. पण त्याचबरोबर हा सत्तासंघर्ष सर्वोच्च न्यायालय आणि केंद्रीय निवडणूक आयोगाच्या दरवाजापर्यंत पोहोचला. आता निवडणूक आयोगाने धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह गोठवले असून ‘शिवसेना’ हे नाव वापरण्यास तात्पुरती बंदी घातली आहे.

- Advertisement -

विशेष म्हणजे, बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या नावाने शिवसेनेत फूट पडली असली तरी, या दोन कुटुंबात मात्र फूट पडली आहे. आनंद दिघे यांचा पुतण्या केदार दिघे यांनी उद्धव ठाकरे यांना पाठिंबा दिला आहे. त्यांना ठाणे जिल्हाप्रमुखपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. तर, आनंद दिघेंच्या भगिनी अरुणा गडकरी या शिंदे गटात आहेत. नुकतेच शिवसेनेचे दोन दसरे मेळावे झाले. बीकेसी येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या झालेल्या दसऱ्या मेळाव्यात अरुणा गडकरी यांनी व्यासपीठावर हजेरी लावली होती.

एकनाथ शिंदे यांच्या व्यासपीठावर ठाकरे कुटुंबातील उद्धव ठाकरे यांचे बंधू जयदेव ठाकरे, वहिनी स्मिता ठाकरे आणि पुतण्या निहार ठाकरे हे देखील उपस्थित होते. त्यापैकी स्मिता ठाकरे आणि निहार ठाकरे यांनी आधीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याने त्यांचा त्यांना पाठिंबा असल्याचे स्पष्ट झाले होते. तर, मालमत्तेवरून जयदेव ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या कोर्टकचेरीही झाली आहे. या पार्श्वभूमीवर जयदेव ठाकरे यांचे पुत्र जयदीप ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांना पाठिंबा दिला आहे. त्यामुळे पालघर आणि ठाण्यासह महाराष्ट्रात ज्यांनी संघटना वाढवली, त्यांच्याच कुटुंबांमध्ये दुफळी निर्माण झाल्याचे चित्र आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -