घरपालघरकुठे राडा,कुठे ताकद,कुठे सर्वांच्या मर्जीवर, सभापती -उपसभापती बसले खुर्चीवर

कुठे राडा,कुठे ताकद,कुठे सर्वांच्या मर्जीवर, सभापती -उपसभापती बसले खुर्चीवर

Subscribe

सर्वच ठिकाणी आपला उमेदवार जिंकून येण्यासाठी सर्वपक्षीयांनी ताकद पणाला लावली होती.

पालघर : पालघर जिल्ह्यातील आठ तालुक्यांतील पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापती पदाच्या निवडणुका शुक्रवारी(11 नोव्हेंबर) पार पडल्या. सर्वच ठिकाणी आपला उमेदवार जिंकून येण्यासाठी सर्वपक्षीयांनी ताकद पणाला लावली होती.काही ठिकाणी भांडणे अगदी पोलीस स्थानकापर्यंत गेली,काही ठिकाणी पक्षीय ताकदीवर तर काही ठिकाणी सर्वांची मर्जी राखत बिनविरोध सभापती आणि उपसभापतींची निवड झाली आहे.

वसईत अशोक पाटील सभापती, सुनील अंकारे उपसभापती

- Advertisement -

वसई पंचायत समितीच्या सभापतीपदी बहुजन विकास आघाडीचे अशोक पाटील सभापती व उपसभापतीपदी बहुजन विकास आघाडीचे सुनिल अंकारे यांची बिनविरोध निवड झाली.

वाड्यात सभापतीपदी अस्मिता लहांगे तर उपसभापतीपदी जगदीश पाटील

- Advertisement -

वाडा पंचायत समितीच्या सभापती व उपसभापती पदाची निवडणूक आज घेण्यात आली.या निवडणुकीत सभापती पदी शिवसेनेच्या( उध्दव ठाकरे गट) अस्मिता लहांगे यांची तर उपसभापती पदी राष्ट्रवादी काँग्रेसचे जगदीश पाटील यांची निवड करण्यात आली. शिवसेनेकडून सभापती पदासाठी अस्मिता लहांगे यांनी तर उपसभापती पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे जगदीश पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता.त्यांच्या विरोधात उमेदवारी अर्ज दाखल न केल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. वाडा पंचायत समितीत शिवसेना ५,राष्ट्रवादी काँग्रेस 4,भाजप 2 व अपक्ष 1 असे एकूण बारा संख्याबळ असून महाविकास आघाडीची सत्ता आहे.सत्ता स्थापन होताना ठरलेल्या वाटाघाटीनुसार तत्कालीन सभापती व उपसभापती यांचा कार्यकाळ संपल्याने त्यांनी राजीनामा दिला होता. त्यानुसार आज झालेल्या निवडणुकीत सभापतीपदी अस्मिता लहांगे यांची तर उपसभापती पदी जगदीश पाटील यांची निवड करण्यात आली.विशेष सभेचे अध्यक्ष तथा पीठासीन अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी भवानजी आगे पाटील यांनी काम पाहिले. नवनिर्वाचित सभापती व उपसभापती यांचे शिवसेनेच्या नेत्या ज्योती ठाकरे, माजी आमदार रूपेश म्हात्रे,राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष रोहिदास पाटील,सुरेश पवार, शिवसेनेचे संपर्कप्रमुख निलेश गंधे,तालुका अध्यक्ष उमेश पटारे,अरूण पाटील,गोविंद पाटील, शिक्षक सेनेचे जिल्हाध्यक्ष मनेश पाटील आदींनी अभिनंदन केले आहे.

पालघरमध्ये सभापती शैला कोळेकर ,उपसभापती मिलिंद वडे

पालघर पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापती पदासाठी आज झालेल्या निवडणुकीत पुन्हा एकदा महाविकास आघाडीने बाजी मारली आहे. सभापतीपदी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शैला कोळेकर तर उपसभापती राष्ट्रवादी कोंग्रेसचे मिलिंद वडे यांची बिनविरोध निवड झाली. उपसभापती पदासाठी भारतीय जनता पक्षाकडून दोन अर्ज दाखल करण्यात आले होते. मात्र त्यांनी शेवटच्या क्षणी माघार घेतल्याने राष्ट्रवादीच्या मिलिंद वडे यांचा उपसभापती पदाचा मार्ग सुकर होऊन महाविकास आघाडीचे सभापती व उपसभापती बिनविरोध निवडून आले आहेत. पालघर पंचायत समितीमध्ये एकूण ३४ जागांपैकी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे २२ सदस्य असून भाजप ४, राष्ट्रवादी काँग्रेस ३, बहुजन विकास आघाडी ४ व मनसे १ असे पक्षीय बलाबल आहे. आजच्या निवडणुकीत निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी धनाजी तोरस्कर यांनी काम पाहिले. यावेळी संपर्क प्रमुख आमदार सुनील शिंदे,जिल्हाप्रमुख वसंत चव्हाण, पंकज देशमुख,उप जिल्हाप्रमुख अनिल तरे, राजेश कुटे, तालुका प्रमुख विकास मोरे ,पंचायत समितीच्या माजी सभापती रंजना म्हसकर,राष्ट्रवादीचे सरचिटणीस अनिल गावड, अमर बाजपेयी, हंसराज घरत,सचिन पाटील,अमित वैती तसेच शिवसेनेच्या महिला आघाडीच्या नमिता राऊत,नीलम म्हात्रे,शिवसेनेचे भूषण संखे,सुनील महेंद्रकर, कल्पेश पिंपळे,यांच्यासह शिवसेनेचे इतरही पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते

विक्रमगडमध्ये सभापतीपदी यशवंत कनोजा,
उपसभापतीपदी विनोद भोईर

विक्रमगड पंचायत समितीच्या सभापदी व उपसभापदी पदाची निवडणूक आज पार पडली. या निवडणुकीत साखरे गणातून राष्ट्रवादी पक्षाकडून निवडून आलेले यशवंत शंकर कनोजा यांची बिनविरोध सभापतीपदी तर आलोंडे गणातून अपक्ष (जिजाऊ संघटना) निवडून आलेले विनोद केशव भोईर यांची निवड झाली. उपसभापती पदासाठी भाजप पक्षाचे सुभाष शंकर भोये यांनी तर अपक्ष (जिजाऊ संघटनेचे) विनोद केशव भोईर यांचे दोन अर्ज दाखल झाल्याने झालेल्या उपसभापती निवडणुकीत विनोद केशव भोईर यांना 7 मते मिळाल्याने ते निवडून आले. तर भाजपच्या सुभाष भोये यांना 2 मते मिळाल्याने भाजप पक्षाच्या उमेदवाराला हार पत्करावी लागली. तर एक सदस्य तटस्थ राहिला. पंचायत समिती गणामध्ये शिवसेना(उद्धव ठाकरे गट) 1, राष्ट्रवादी-4, माकपा-1,भाजपा-2, अपक्ष (निलेश सांबरे गट)- 2 सदस्य आहेत. सभापती व उपसभापती या निवडणुकीत पीठासन अधिकारी म्हणुन संदीप पवार (उपजिल्हाधिकारी,पुनर्वसन पालघर) यांनी काम पहिले. या वेळी विक्रमगड विधानसभेचे आमदार सुनिल भुसारा, जिजाऊ संघटनेचे अध्यक्ष निलेश सांबरे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष ज्ञानेश्वर(शिवा) सांबरे, उपनगरध्यक्ष महेंद्र पाटील,नगरसेवक निकेत पडवळे, माजी उपसभापती नम्रता नरेश गोवारी यांनी नवनिर्वाचित सभापती व उपसभापतीचे अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. या निवडणुकीत विक्रमगड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रदीप गिते यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

मोखाड्यात सभापतीपदी भास्कर थेतले , उपसभापतीपदी प्रदीप वाघ

मोखाडा पंचायत समितीच्या सभापतीपदी भास्कर थेतले आणि उपसभापतीपदी प्रदीप वाघ यांची बिनविरोध निवड करण्यात आली.शिंदे गट बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे पाच सदस्य व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या एका सदस्याने बिनशर्त पाठिंबा दिला आहे. त्यामुळे बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे सभापती व उपसभापती झाले आहेत.

जव्हारमध्ये सभापतीपदी विजया लहारे , उपसभापतीपदी दिलीप पाडवी

जव्हार तालुक्यातील पंचायत समिती सभापती व उपसभापती पदाची निवडणूक बिनविरोध पार पडली. यात शिक्षित उमेदवार म्हणून विजया लहारे यांची सभापतीपदी तर दिलीप पाडवी यांची उपसभापतीपदी बिनविरोध निवड करण्यात आली. पंचायत समिती जव्हारच्या सर्वच सदस्यांनी बिनविरोध निवड करून भारतीय जनता पक्षाचे दोन्ही उमेदवार निवडून आणल्याने भाजपच्या गोटात आनंदाचे वातावरण आहे. यावेळी भाजपचे जिल्हा अध्यक्ष नंदकुमार पाटील ,ज्येष्ठ नेते बाबजी काठोले, जिल्हा परिषद पालघरच्या माजी अध्यक्षा तथा विद्यमान गटनेत्या सुरेखा थेतले, हेमंत गोविंद, माजी सभापती सुरेश कोरडा, तुळशीराम मोरघा, विठ्ठल थेतले, अंकुश सहाणे आणि भाजपचे असंंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

नाट्यमय घडामोडींनंतर सभापतीपदी प्रवीण गवळी ,उपसभापती पिंटू गहला

डहाणू पंचायत समिती सभापती आणि उपसभापती पदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर डहाणूत नाट्यमय घडामोडी पाहायला मिळाल्या होत्या. भाजप पक्षाकडून राष्ट्रवादीचे सदस्यांचे अपहरण केल्याचे आरोप देखील करण्यात आले. भाजप पदाधिकार्‍यांवर गुन्हा दखल करण्याची मागणी देखील केली होती. अनेक घडामोडींनंतर सभापती,उपसभापती निवडणुकीवेळी देखील दोन्ही पक्षांच्या उमेदवारांना समसमान मते मिळाल्यामुळे चिठ्ठी उडवून पदे वाटप करण्यात आली आहेत. त्यात महाविकास आघाडीच्या दोन्ही उमेदवारांची वर्णी लागल्याचे पाहायला मिळाले आहे. गेली अडीच वर्षे डहाणू पंचायत समितीवर महविकास आघाडीची सत्ता होती. त्याचीच पुनरावृत्ती झाली असून राष्ट्रवादी आणि शिवसेनेची (उद्धव ठाकरे गट) वर्णी लागली आहे. एकूण 26 सदस्य संख्या असलेल्या डहाणू पंचायत समितीवर एकमेकांचे सदस्य फोडून राजकारण सुरू होते. बहुमतासाठी 14 सदस्य लागणार होते. परंतु अखेर दोनही पक्षांना समसमान मते मिळाल्यामुळे चिठ्ठ्या उडवून पदे वाटप करण्यात आली. भाजप आणि शिंदे गटाकडून सभापती पदासाठी वसंत गोरवाला व उपसभापती पदासाठी भूनेश गोलिम तर महाविकास आघाडीकडून प्रवीण गवळी व पिंटू गहला यांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले होते.

तलासरीत सभापतीपदी सुनीता शिंगडा ,उपसभापतीपदी नंदकुमार हाडळ

पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापती पदाची निवडणूक शुक्रवारी दुपारी तलासरी पंचायत समितीच्या सभागृहात पार पडली. ही निवडणूक बिनविरोध होऊन सभापतीपदी माकपच्या सुनीता जयेश शिंगडा तर उपसभापती पदी माकपचेच माजी सभापती असलेले नंदकुमार हाडळ यांची उपसभापती निवड झाली आहे.तलासरी पंचायत समितीमध्ये एकूण दहा सदस्य असून यात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे आठ तर भाजपचे दोन सदस्य आहेत. सभापती पदासाठी सुनीता शिंगडा यांचा एकच फॉर्म दाखल झाला. तर उपसभापती पदासाठी नंदकुमार हाडळ तसेच राजेश खरपडे या दोघांनी फॉर्म भरले होते. पण राजेश खरपडे यांनी आपला उमेदवारी अर्ज माघार घेतल्याने उपसभापतीपदी नंदकुमार हाडळ यांची तर सभापती पदी सुनीता शिंगडा यांचा एकच उमेदवारी अर्ज आल्याने त्यांचीही बिनविरोध निवड झाली. पंचायत समितीच्या दहा सदस्यांपैकी भाजपचे दोन सदस्य गैरहजर राहिले. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून पालघर उप जिल्हाधिकारी सुरेंद्र नवले यांनी काम पहिले.

 

 

 

 

 

 

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -