घरताज्या घडामोडी...चोख उत्तर देण्यासाठी मुंबई, ठाण्यातून २०० मनसैनिक शेगावकडे रवाना

…चोख उत्तर देण्यासाठी मुंबई, ठाण्यातून २०० मनसैनिक शेगावकडे रवाना

Subscribe

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेदरम्यान स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यानंतर नवा वाद निर्माण झाला आहे. त्यांच्या वक्तव्यामुळे शिंदे गट, भाजप आणि मनसे मोठ्या प्रमाणात आक्रमक झाली आहे. शेगावमध्ये जाऊन राहुल गांधी यांची सभा उधळून लावणार असल्याचा इशारा मनसेकडून देण्यात आला आहे. तसेच चोख उत्तर देण्यासाठी मुंबई, ठाण्यातून २०० मनसैनिक शेगावकडे रवाना झाले आहेत.

राहुल गांधी यांची सभा उधळण्यासाठी मनसे गनिमी काव्याने शेगावमधील सभेत घुसणार असल्याचं मनसे नेते संदीप देशपांडे आणि अविनाश जाधव यांच्याकडून सांगण्यात आलं आहे. मुंबई, ठाणे, भिवंडी आणि नाशिक या मार्गावरून मनसैनिक शेगाव येथे पोहोचणार आहेत.

- Advertisement -

संदीप देशपांडे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, अविनाश जाधव यांनी अनेक भाई लोकांची भाईगिरी उतरवली आहे. आता पप्पूची पप्पूगिरी उतरवण्यासाठी आम्ही एकत्र चाललो आहे. नक्कीच त्याची पप्पूगिरी पण उतरवली जाईल, असा इशारा संदीप देशपांडे यांनी दिला.

स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करणाऱ्या लोकांना महाराष्ट्रातील लोक जाऊन मिठ्या मारतात, अशा सगळ्यांना उद्या चोख उत्तर मनसेकडून मिळणार असल्याचं मनसेकडून सांगण्यात आलं आहे.

- Advertisement -

दरम्यान, शेगावच्या सभेत मनसेने गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला तर त्यांना आम्ही जशास तसं उत्तर देऊ, असा इशारा कुणाल राऊत यांनी मनसेला दिला आहे. आमचे जवळपास ३० हजार युवक काँग्रेस सभेच्या ठिकाणी असणार आहेत. या सभेला जास्तीत जास्त लोकंही उपस्थित राहणार आहेत, असं युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत म्हणाले.

ज्या प्रकारे मनसेने आमच्या सभेत येण्याचं आव्हान दिलंय. त्याप्रमाणे आमचेही कार्यकर्ते ताकदीने उपस्थित राहणार आहेत. शेगाव येथे राहुल गांधींची खूप मोठी सभा होईल. जे अंदमान-निकोबारमध्ये युद्ध घडलं तिथे मराठा सैनिक मोठ्या प्रमाणात वीर झाले. त्यांच्याऐवजी माफीवीरांची आठवण त्यांना येते, त्याचा आम्ही निषेध करतो, असं कुणाल राऊत म्हणाले.

भारत जोडो यात्रा तुम्ही रोखून दाखवाचं, असं आव्हान राहुल गांधींनी सरकारला केलं आहे. तसेच भाजप मुंबईसह अनेक ठिकाणी उद्या आंदोलनं करणार आहे. त्यामुळे मनसे आणि भाजपची काय भूमिका असणार आहे, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.


हेही वाचा : शिंदे गट आक्रमक; ‘जोडे-मारो आंदोलन’ करत नोंदवला राहुल गांधींच्या वक्तव्याचा


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -