घरताज्या घडामोडीडेस्टीनेशन वेडिंग...सुखाचं डेस्टीनेशन हरवलेली माणसं

डेस्टीनेशन वेडिंग…सुखाचं डेस्टीनेशन हरवलेली माणसं

Subscribe

ठाण्यातली ‘अस्तित्व’ ही नाटकाची निर्मिती संस्था असते, या संस्थेचे ‘डेस्टीनेशन वेडिंग, हे केवळ एक सूडनाट्यच असते असे नाही, पडदा सरकल्यावर हे सस्पेन्स, थ्रीलरनाट्य असू शकते, रोमँटीक, इमोशनल,संवादनाट्य, एखाद्या प्रसंगात नृत्यनाट्यही असू शकते, ‘डेस्टीनेशन वेडिंग’मधून ज्याला जे हवे ते त्या नाट्यरसिकाला मिळून जाते. दिग्दर्शक (उर्मी) शिल्पा सावंत यांनी कागदावर आकारताना आणि मंचावर साकारताना नाटकातल्या या सर्वच कथा घटकांना पुरेसा न्याय दिलेला असतो, नाटकातले कलाकार प्रचलित अर्थाने ‘नवखे’ नसतात, नाट्यकलेची त्यांना पुरेशी जाण असते, जिवंत अभिनयाच्या विविध पैलूंवर तालमीत झालेला पुरेसा रियाज मंचावरील कलाविष्कारातून पुरेपूर उतरतो.

नाटकाचे नाव ‘डेस्टीनेशन वेडिंग’ असते, मात्र तीन तासांच्या नाट्य अनुभवात हे डेस्टीनेशन केवळ कल्पनेतल्या ‘रोमँटीसीझमने भारलेल्या आजपर्यंच्या चित्रपट साहित्य किंवा नाटकातल्या सरधोपट ‘वेडिंग’ पुरतंच मर्यादित राहत नाही, या ‘वेडिंग’चा अर्थ माणसांच्या मनात पूर्वंपार चालत आलेल्या जाणिवा, अनियंत्रित संवेदनांचे ‘वेड’ आणि त्यातली विवेकबुद्धी तारतम्य हरवलेली ‘झिंग’ असे करता येईल. मानवी जाणिवांची ही झिंग आणि हा कैफ हळूहळू प्रेक्षकांच्या मेंदूचा ताबा मिळवत जातो.

ज्येष्ठ नाट्य लेखक विजय तेंडूलकर म्हणतात तसे माणूस कधीही ‘ब्लॅक अँड व्हाईट’ अशा थेट फरकांच्या जाणिवांचा नसतो. माणूसपण कायमच जगण्याच्या ‘ग्रे शेड’मध्ये रंगलेले असते. या ग्रे शेडमध्ये जगण्याचे वेगवेगळे रंग गरजेनुसार मिसळले, बाहेर काढले जातात. या गरजांना नैतिक जगात ‘संधीसाधू’ पणा म्हटले जाते, तर प्रोफेशन जगात माणसांचे हे रंग ‘स्मार्टनेस’ म्हणून ओळखले जातात. दिग्दर्शिका उर्मीच्या नाटकात अशाच रंगांच्या व्यक्तीरेखा मंचावर असतात. मानवी नातेसंबंधातील व्यक्तींच्या अंगभूत गरजा, प्रेम, ओढ, आत्मियता, आसक्ती, अधिकारशाही, आक्रमकता, हव्यास, लोभ, कुठल्याही किमतीवर आपल्याला हवे ते मिळवण्याची तीव्र इच्छा इथल्या माणसांना असतात, या गोष्टी प्रेक्षकांच्या खुर्चीवर बसलेल्या किंवा नाट्यगृहातल्या माणसांमध्येही कमी अधिक प्रमाणात असतातच, त्याशिवाय माणूस नसतो, त्यामुळे नाटकातल्या कथाजाणिवांशी प्रेक्षकातला माणूस थेट ‘कनेक्ट’ होतो. या गरजांना स्वतःच्या नाईलाजी संवेदनशीलतेचे नाव दिल्यावर या गोष्टी तातडीने सकारात्मक वाटू लागतात आणि नायक किंवा खलनायकातल्या परंपरागत कथानकांमधील फरक नाहीसा होतो, डेस्टीनेशन…’ ने मंचावर हे साध्य केलेले असते.

- Advertisement -

डेस्टीनेशन…मध्ये राही इनामदार आणि अक्षित इनामदार हे प्रेमातल्या सहज जाणिवांमध्ये आकंठ बुडालेले एक प्रेमी युगूल आहे. प्रेमासोबतच व्यक्तीवरील अधिकारशाही येते, ती टाळता येत नाही, परंतु मानवी मनाच्या जमिनीवर इतर इच्छाही गवतासारख्या खोलवर दबलेल्या असतात. परिस्थिती आणि पोषक वातावरणात त्या बाहेर पडू लागतात. माणूस चांगल्या वाईटाचा समुच्चय असतो, शेक्सपियरच्या शोकांतिकांमध्ये अशी माणसे हटकून येतात. दिग्दर्शिका उर्मीने या नाटकातून आजच्या काळाचे संदर्भ देत हीच माणसे पुन्हा नव्याने मंचावर आणलेली असतात. हत्या आणि त्याच्या तपासपटाची ढोबळ कथानके अनेकदा मंचावर आलेली असतात, परंतु गुन्ह्यामागील कारणांचे मानवी कंगोरे टिपलेल्या मोजक्या नाटकांच्या रांगेत ‘डेस्टीनेशन वेडिंग’ असते. मंचावरील सगळ्याच व्यक्तीरेखा चांगल्या वाईटाने भरलेल्या असतात, ही माणसे सरसकट चांगली किंवा वाईट नसल्यामुळे ‘सगळेच संशयित ’असतात. काळवेळेनुसार ही माणसे चांगली किंवा वाईट असू शकतात, या चांगल्या किंवा वाईटातल्या जगण्याच्या धूसर सीमारेषेवर ‘डेस्टीनेशन वेडिंग’चे नाट्य घडत जाते.
अनेकदा माणसांचा चांगला वाईट भूतकाळ वर्तमानातल्या क्षणात दाखल होतो, माणसांना भूतकाळातली खंत आणि भविष्याची भीती असते. ही भीती आणि खंत वर्तमान बनून समोर येऊ शकते.

सुरक्षित भविष्याकडे निघालेल्या जगण्याच्या खेळात रमलेल्या माणसांना माणसेच सापासारखे गिळत जातात, तर कधी माणसांचे माणसांचा शिडीसारखा वापर करून इतरांपेक्षा पुढे जाण्याच्या जीवघेण्या स्पर्धेत आहे त्या ताकदीनिशी उतरतात. ‘डेस्टीनेशन वेडिंग’मध्ये नायक – नायिकेमध्ये रंगलेला सापशिडीचा खेळ समोर आल्यावर ‘नटसम्राट’ नाटकातल्या आप्पासाहेब बेलवलकरांचा संवाद आठवतो. ‘अंतराळात विहरणारे आत्मे आपल्यापोटी जन्म घेतात आणि आपल्याला वाटते आपण आई झालो, बाबा झालो, आपण असतो ते फक्त शिड्या’ ‘डेस्टीनेशन वेडिंग’मध्ये रंगलेला सापशिडीचा खेळ माणसांना वर नेणार्‍या आणि खाली आणणार्‍या माणसांनाच शिडी बनवणार्‍यांचा असतो. इथली पहिली व्यक्तीरेखा दुसर्‍यासाठी शिडीचे काम करते, तर हीच शिडी अचानक भक्ष्याच्या शोधात असलेल्या सर्पांत बदलून वर जाणार्‍यांना गिळून रसातळाला आणते.

- Advertisement -

भवतालातल्या भौतिक सुखाच्या वेगात जगणे असा सापशिडीचा खेळ झाल्यावर तो नाईलाजाने खेळण्याशिवाय दुसरे कुठलेही गत्यंतर उरलेले नसते. बाहेरच्या जगात कुठल्याही किमतीवर यश मिळवण्याची जी घुसमट करणारी जीवघेणी स्पर्धा सुरू झालेली आहे, ती ‘डेस्टीनेशन’च्या प्रयोगातून समोर येत जाते. नाटकाचा हा प्रयोग जरी मंचावर होत असला तरी माणसाच्या जगण्यातला हा खेळ प्रेक्षकांच्या मनातही सुरूच असतो. आपापल्या जगण्याचे ‘निश्चित डेस्टीनेशन’ ठरवलेली माणसे आपापल्या ‘मंझिल’च्या शोधात निघालेली आपला भवताल घेरून असतात, परंतु जगणे कधीही निश्चित ठरवता येत नाही. माणसांच्या हातात राहतात त्या केवळ शक्यता. या काल्पनिक शक्यतांच्या गर्दीत माणसाच्या जगण्याचे मार्ग हरवून जातात. अशी स्वतःपासून बेपत्ता झालेली माणसे सुखाच्या मार्गांच्या शोधात विवेकबुद्धी हरवून बसतात, त्यांना मानसिक संतुलन ढासळलेली माणसे असा टॅग लावून समाज आणि कुटुंबसंस्था मोकळी झालेली असते. असा टॅग लावणारी ही ‘शहाणी’ माणसेही वरकरणी संतुलन राखलेली दिसत असली तरी ती तशी असतील असे नाही. माणसांच्या अंतर्मनात हा ‘समोर न येणारा धोका, घुसमट, इच्छांची गर्दी, असे बरेच काही दडून बसलेले असते. संतुलन ढासळलेल्यांपेक्षा अशी माणसे जास्त धोकादायक असू शकतात. त्याचा भवतालमधील घडणार्‍या घटनांचा प्रत्यय आपल्यासाठी नवा नसतो.‘डेस्टीनेशन वेडिंग’ नाटकातून माणसांच्या व्यक्तीरेखांमध्ये लपलेला हा धोका टप्प्याटप्प्याने उजागर होत जातो, दिग्दर्शिका उर्मीच्या मनात नाटकातल्या ‘सस्पेन्स’ची हीच व्याख्या असावी.

माणसे माणसांचाच शिडीसारखा वापर करून पुढे जाण्याचा प्रयत्न करतात. या हव्यासाच्या रंगलेल्या खेळात ते त्यांना हव्या त्या डेस्टीनेशनपर्यंत पोहचतात किंवा नाही…याचे उत्तर मिळवण्यासाठी नाट्यगृहात ‘डेस्टीनेश वेडिंग’ हा नाट्यानुभव घ्यायला हवा. मानवी नातेसंबंध, संवेदना आणि जाणिवांचे कंगोरे संवाद आणि प्रसंगातून टिपण्यासाठी प्रकाशयोजना, पार्श्वसंगीताचा चपखल उपयोग नाटकात केलेला असतो, तर संवादातली विराम आणि ब्लॅक आऊट हे नाटकात परस्परांना सोबत तर कधी पर्याय म्हणून समोर येतात. नेपथ्य कथानकाला न्याय देणारे असते. ‘डेस्टीनेशन वेडिंग’चा प्रयोग माणसांच्या सौंदर्यरंग आणि रसांनी भारलेला असतो. हे रंग प्रयोगात भाग घेतलेल्या माणसांच्या चेहर्‍यावरून हळूहळू उतरत जातात. त्यानंतर माणूसपणाचा जो नितळ-निखळ किंवा भीषण-भयंकर चेहरा समोर येतो, तो चेहरा नाटक पहाणार्‍या प्रेक्षकातल्या माणसांचाही असू शकतो.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -