घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रएअरलाईन्सचा फ्लॅट आहे सांगून तब्बल २४ लाखांची फसवणूक

एअरलाईन्सचा फ्लॅट आहे सांगून तब्बल २४ लाखांची फसवणूक

Subscribe

नाशिक : इंडियन एअरलाईन्समध्ये नोकरीला असल्याचे बनावट ओळखपत्र व फ्लॅट विक्रीसाठी एअरलाईन्सची बनावट कागदपत्रे दाखवून पाच आरोपींनी तीन जणांची २४ लाख रुपयांना फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे.आरोपी संजय गोसावी, भीमा धोंडिबा वाघमारे (रा. पवननगर, नवीन नाशिक), छाया आव्हाड, प्रशांत आव्हाड व आनंद भट्टड (रा. नाशिक) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी कैलास शांताराम महाजन (रा. मालेगाव कॅम्प, जि. नाशिक) यांना नवीन नाशिकमध्ये फ्लॅट खरेदी करायचा होता. दरम्यान आरोपी संजय गोसावी, भीमा धोंडिबा वाघमारे, छाया आव्हाड, प्रशांत आव्हाड व आनंद भट्टड यांनी महाजन यांच्याशी संपर्क साधला. त्यावेळी या पाचही आरोपींनी महाजन यांना नाशिक येथील राणे नगरमधील समर्थ हॉस्पिटलच्या मागे प्रजापिता ब्रह्माकुमारी सेंटरजवळ इंडियन एअरलाईन्स कंपनीचे जुने फ्लॅट दाखविले. यावेळी संजय गोसावी याने आपण स्वत: इंडियन एअरलाईन्स कंपनीमध्ये नोकरीला असल्याचे सांगत बनावट ओळखपत्र व कागदपत्रे दाखवली.

- Advertisement -

शिवाय, फिर्यादी महाजन यांना कंपनीने फ्लॅट विक्रीचा संपूर्ण अधिकार मला दिलेला असल्याचे सांगितले. त्यावर महाजन यांचा विश्वास बसला. त्यानुसार आरोपींनी महाजन यांच्यासोबत फ्लॅटचा व्यवहार करून इसार पावती व करारनामा करून दिला. बनावट कागदपत्रे दाखवून फिर्यादी महाजन यांच्याकडून वेळोवेळी दहा लाख रुपये घेऊन त्यांची फसवणूक केली आहे. त्याचप्रमाणे फिर्यादी महाजन यांचे मावसभाऊ किरण बिरारी यांच्याकडूनही फ्लॅटच्या विक्री व्यवहारापोटी ८ लाख ५० हजार रुपये आणि संदीप बोरसे यांच्याकडून ५ लाख ५० हजार रुपये उकळून एकूण २४ लाख रुपयांची फसवणूक केली आहे. हा प्रकार १ नोव्हेंबर २०२० ते १३ मार्च २०२० या कालावधीत घडला आहे.

या कालावधीत संजय गोसावी, भीमा वाघमारे, छाया आव्हाड, प्रशांत आव्हाड व आनंद भट्टड या आरोपींकडे याबाबत विचारणा केली असता त्यांनी फिर्यादी महाजन व इतर तिघांना उडवाउडवीची उत्तरे देऊन पैसे देण्यास नकार दिला. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात पाचही संशयित आरोपींविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शेवाळे करीत आहेत.

- Advertisement -
संशयित सराईत गुन्हेगार

संशयित आरोपी संजय गोसावी याने २०१७ व २०२० मध्ये अनेकांची बनावट कागदपत्रे दाखवून व एयर इंडिया चा कर्मचारी असल्याचे सांगत फसवणूक केली आहे. २०२१ मध्ये तत्कालीन प्रशासक घनश्याम ठाकूर यांनी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गोसावीविरोधात गुन्हा दाखल केला होता. त्यावेळी पोलिसांनी त्याला अटकही केली होती. असे प्रकार पुन्हा घडू नयेत म्हणून प्रशासक ठाकूर यांनी शहरातील सर्व उपनिबंधक कार्यालयांना पत्र देऊन हस्तांतरण करायची मालमत्ता सिडकोच्या असल्याची खात्री करून घेण्याच्या सूचना दिल्या होत्या तर त्यासाठी स्वतंत्र अधिकार्‍याची नियुक्ती केली असल्याचेही कळविले होते. संजय गोसावी हा सराईत गुन्हेगार असून, वारंवार एकाच प्रकारे गुन्हे करत असल्याचे उघडकीस येऊनही त्याविरोधात कठोर कारवाई होत नसल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -