घरमहाराष्ट्रपुण्यातील मालोजीराजेंचे गढी संवर्धन

पुण्यातील मालोजीराजेंचे गढी संवर्धन

Subscribe

जुनी कचेरी पर्यटनस्थळ म्हणून घोषित करणार, पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढांचे आश्वासन

छत्रपती शिवाजी महाराज यांचे आजोबा मालोजीराजे भोसले यांच्या पराक्रमी इतिहासाला उजाळा देण्यासाठी पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील जुनी कचेरी म्हणजेच मालोजीराजे यांच्या गढी संवर्धनासाठी पर्यटन विभागातर्फे २ कोटी रुपयांची तरतूद करण्यात येईल. या ऐतिहासिक स्थळाला पर्यटनस्थळ घोषित करण्यात येईल, असे पर्यटनमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी बुधवारी विधानसभेत सांगितले.

सदस्य दत्तात्रय भरणे यांनी महाराष्ट्र विधानसभा नियम १०५ अन्वये छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजीराजे भोसले यांचे स्मारक तसेच मालोजीराजेंच्या पादुकांसाठी दगडी मूळ स्वरूपाचा चबुतरा उभारण्यात यावा याबाबतची लक्षवेधी सूचना मांडली होती. त्यावेळी पर्यटनमंत्री लोढा बोलत होते.

- Advertisement -

ते म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजीराजे भोसले यांनी वास्तव्य केलेल्या पुणे जिल्ह्यातील इंदापूर शहरातील भुईकोट किल्ला महसूल विभागाकडे आहे. महसूल विभागाच्या नोंदीत मालोजीराजेंच्या इतिहासाच्या बाबींचा उल्लेख आहे. इतिहासाची साक्ष असणार्‍या या ऐतिहासिक जुनी तहसील कचेरी म्हणजेच मालोजीराजे यांच्या गढीचे संवर्धन करून जुने बुरुज, गाव, वेस यांचे पुनरुज्जीवन करून या कचेरीच्या जागेतच मालोजीराजे भोसले यांचे स्मारक उभारण्यात येईल. मालोजीराजेंच्या पादुकांसाठीही दगडी मूळ स्वरूपाचा चबुतरा उभारून त्यांचे जीवन चरित्र महाराष्ट्रासमोर आणण्यासाठी पर्यटन विभाग प्रयत्न करेल.

मालोजीराजे भोसले यांच्या गढी संवर्धनासाठी पर्यटन विभागामार्फत २ कोटी रुपयांची तरतूद करण्यात येईल तसेच येत्या २ महिन्यांच्या आत ते पर्यटनस्थळ म्हणून घोषित करण्यात येईल. या ठिकाणाची आणि वास्तूची देखभाल ज्या विभागाकडे असेल त्यांच्या समन्वयाने तेथील अतिक्रमणे काढण्यात येतील. यासाठी लवकरच पर्यटन, सांस्कृतिक कार्य, महसूल आणि गृह विभागाची संयुक्त बैठक घेण्यात येईल, असेही मंत्री लोढा यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -