घरदेश-विदेश'डरो मत'; राहुल गांधींना शिक्षा झाल्यानंतर काँग्रेसने बदलले सोशल मीडियावरील प्रोफाईल फोटो

‘डरो मत’; राहुल गांधींना शिक्षा झाल्यानंतर काँग्रेसने बदलले सोशल मीडियावरील प्रोफाईल फोटो

Subscribe

नवी दिल्ली : काँग्रेस खासदार राहुल गांधी यांना सुरत जिल्हा न्यायालयाने आज मानहानीच्या प्रकरणात दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. राहुल गांधी यांना शिक्षा झाल्यानंतर देशभरात राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले. काँग्रेस कार्यकर्ते रस्त्यावर उतरून आंदोलन करताना दिसले. हे सर्व सुरू असताना काँग्रेसने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवरील प्रोफाइल फोटो बदलले आहेत. ‘हा’ फोटो काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनीही आपल्या प्रोफाईलवर टाकला आहे. काँग्रेसने ट्विटर, फेसबुक आणि इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आपल्या अधिकृत अकाउंटवर एक नवीन प्रोफाइल फोटो टाकला आहे. हा फोटो राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेदरम्यान काढला होता. या फोटोवर ‘डरो मत’ असे लिहिले आहे.

- Advertisement -

राहुल गांधींना कोणत्या प्रकरणात शिक्षा
2019 मध्ये कर्नाटकच्या निवडणूक सभेत राहुल गांधींनी वादग्रस्त विधान केले होते. कर्नाटकातील कोलारमध्ये राहुल गांधी यांनी मोदी आडनावावर भाष्य केले होते. राहुल यांच्या वक्तव्याविरोधात गुजरातचे भाजप नेते आणि आमदार पूर्णेश मोदी यांनी गुन्हा दाखल केला होता. सुरत जिल्हा न्यायालयात चार वर्षांपासून राहुल गांधी यांच्याविरुद्ध मानहानीचा खटला सुरू होता. या खटल्यात न्यायालयाने राहुल गांधींना दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. मात्र, न्यायालयाने राहुल गांधींचा 30 दिवसांचा जामीनही मंजूर केला आहे. त्यामुळे राहुल गांधी या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात दाद मागणार आहेत.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबद्दल वादग्रस्त वक्तव्य
2014 मध्ये राहुल गांधी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबद्दल केलेल्या वक्तव्यातही ते चांगलेच अडकले होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्थानिक कार्यकर्ते राजेश कुंटे यांनी 2014 मध्ये मुंबईतील भिवंडी शहरात राहुल गांधींच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. राहुल गांधींनी महात्मा गांधींच्या हत्येमागे आरएसएसचा हात असल्याचा आरोप केला होता. या वक्तव्यामुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची प्रतिष्ठा डागाळल्याचा दावा कुंटे यांनी केला आहे. या प्रकरणी 2018 मध्ये भिवंडी न्यायालयात आरोप निश्चित करण्यात आले होते. फेब्रुवारी 2023 मध्ये या प्रकरणी न्यायालयात सुनावणी झाली असता राहुल गांधींनी न्यायालयात वैयक्तिक हजेरीतून सूट मागितली होती.

- Advertisement -

झारखंड उच्च न्यायालयातही खटला सुरू
2018 च्या काँग्रेस अधिवेशनात राहुल गांधी यांनी काँग्रेसमध्ये कोणताही हत्यारा राष्ट्रीय अध्यक्ष होऊ शकत नाही, हे फक्त भाजपमध्येच शक्य आहे, असे विधान केले होते. त्यांच्या या वक्तव्याकडे केंद्रिय गृहमंत्री अमित शहा यांची बदनामी म्हणून पाहिले जात होते. राहुल गांधींच्या या वक्तव्याविरोधात रांची दिवाणी न्यायालयात तक्रार दाखल करण्यात आली होती. या तक्राराची न्यायालयाने दखल घेत आठवडाभरापूर्वी या प्रकरणी सुनावणी पार पडली. या सुनावणीत न्यायालयाने राहुल गांधींना दिलेला दिलासा कायम ठेवला होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -