घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रप्रशासनाच्या हालचालींना वेग, आठ दिवसांमध्ये होणार अंबड पोलीस ठाण्याचे विभाजन

प्रशासनाच्या हालचालींना वेग, आठ दिवसांमध्ये होणार अंबड पोलीस ठाण्याचे विभाजन

Subscribe

दिलीप कोठावदे। नवीन नाशिक

वाढलेली लोकसंख्या व त्यानुशंगाने वाढलेले कार्यक्षेत्र,तोकडे मनुष्यबळ,गुन्हेगारीचा वाढता आलेख या सर्व पार्श्वभूमीवर अंबड पोलीस ठाण्याचे विभाजन करून अंबड-मोरवाडी पोलीस स्टेशन व एम.आय.डी.सी पोलीस स्टेशन अशा दोन स्वतंत्र पोलीस स्टेशनची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून केली जात होती. लवकरच अंबड पोलीस ठाण्याचे विभाजन करून दोन स्वतंत्र पोलीस ठाणे निर्माण केले जाणार असल्याची माहिती आमदार सीमा हिरे यांनी ‘आपलं महानगर’ला दिली. यासंदर्भात आमदार हिरे यांनी पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांची मंगळवारी (दि.२८) भेट घेऊन नवीन पोलीस ठाणे सुरू करण्याबाबत चर्चा केली.

- Advertisement -

यावेळी झालेल्या चर्चेत, या आठवड्यात किंवा पुढील आठवड्याच्या सुरुवातीलाच अंबड पोलीस ठाण्याचे विभाजन व नवीन एमआयडीसी पोलीस ठाण्याचा शुभारंभ करणार असल्याचे आश्वासन दिल्याची माहिती आमदार हिरे यांनी दिली. सुरुवातीला ३० पोलीस अधिकारी व कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात येणार असून अंबड गाव,अंबड औद्योगिक वसाहत, घरकुल व परिसरात दिवसा व रात्रीचे पेट्रोलिंग केले जाणार आहे.

आमदार सीमा हिरे यांनी नाशिक पोलीस आयुक्त व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे स्वतंत्र पोलीस ठाण्याच्या मागणीचा प्रस्ताव सादर केला होता. या संदर्भात सर्व संबंधित विभागांशी सातत्याने पाठपुरावा करून विधानसभेच्या नुकत्याच झालेल्या हिवाळी अधिवेशनातही त्यांनी हा मुद्दा प्रभावीपणे मांडला होता. सद्यस्थितीत स्वतंत्र पोलीस ठाण्याच्या मंजुरीचा मार्ग मोकळा झाला असून, अंतिम टप्प्यात केवळ वाढीव कर्मचार्‍यांची भरती, कार्यालयीन नियोजनाला अंतिम स्वरूप प्राप्त होताच अंबड पोलीस ठाण्याचे विभाजन व नवीन पोलीस ठाण्याच्या निर्मितीची अधिकृत घोषणा होऊन पुढील कार्यवाही तातडीने सुरू केली जाणार आहे. यामुळे कामगारांच्या सुरक्षिततेला लागलेले ग्रहण दूर होणार आहे.

आयमाच्या माध्यमातून अंबड औद्योगिक वसाहतीसाठी स्वतंत्र पोलीस ठाण्याची मागणी २००५ पासून करण्यात आली होती. तत्कालीन गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी तत्वतः मान्यताही देण्यात आली होती. मधल्या काळात हा प्रश्न प्रलंबित राहिला असला तरी परिसराची व्याप्ती व कायदा-सुव्यवस्थेच्या रक्षणासाठी विद्यमान शासनाने घेतलेला निर्णय स्वागतार्ह आहे. मात्र, पुरेसे मनुष्यबळ मिळावे ही अपेक्षा आहे. : धनंजय बेळे, अध्यक्ष, निमा

नवीन पोलीस ठाण्यासाठी एम.आय.डी.सी.कडून मध्यवर्ती ठिकाणी जागाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. औद्योगिक वसाहतीचे प्रश्न व समस्या वेगळया असतात. त्या समजून घेऊन त्यावर उपाययोजना होण्याची गरज आहे त्यासाठी स्वतंत्र पोलीस ठाण्याची आवश्यकता आहे. ती गरज पूर्ण झाल्याने हा सर्वार्थाने सकारात्मक निर्णय असून त्याचे आम्ही स्वागत करतो. : निखिल पांचाळ,अध्यक्ष, आयमा

सोशल मीडियावर अंबड गाव व औद्योगिक वसाहतीमध्ये गेल्या काही वर्षात गुन्हेगारी प्रवृत्तीची मोठी वाढ झाली होती. गाव व औद्योगिक वसाहत अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत असले तरी पोलीस ठाणे दूर असल्याने गुन्हा घडल्यानंतर पोलिसांना पोहोचण्यास विलंब होत आहे. त्यामुळे गुन्हेगारांना गुन्हा करून पलायन करणे सोपे होते. त्यासाठी स्वतंत्र पोलीस ठाण्याची गरज आहे. आमदार सीमा हिरे यांच्या प्रयत्नपूर्वक पाठपुराव्याला व आमच्या मागणीला यश मिळाले आहे. त्यामुळे गावकरी,कामगार,उद्योजक आणि उद्योगही सुरक्षित होण्यास मदत होणार आहे. : साहेबराव दातीर, सामाजिक कार्यकर्ते, अंबड

राज्य शासनाने उद्योजक आणि उद्योजकांच्या समस्यांकडे सकारात्मक दृष्टीने बघण्याचा केलेला प्रयत्न स्वागतार्ह आहे. या निर्णयामुळे पुढील काळात उद्योग व उद्योजकांना येणार्‍या अडचणी सोडविणे सुलभ होईल. : विवेक कुलकर्णी, अध्यक्ष, लघु उद्योग भारती, नाशिक

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -