घरमहाराष्ट्रपुणेपुण्याचं सर्वसमावेशक नेतृत्वं, राजकारणाचा सुसंस्कृत चेहरा हरपला; अजित पवारांनी वाहिली श्रद्धांजली

पुण्याचं सर्वसमावेशक नेतृत्वं, राजकारणाचा सुसंस्कृत चेहरा हरपला; अजित पवारांनी वाहिली श्रद्धांजली

Subscribe

पुणे : “राज्याचे माजी मंत्री, विद्यमान खासदार सन्माननीय गिरीश बापट यांचे निधन हे पुणे जिल्ह्यातल्या आम्हा सर्वपक्षीय राजकीय, सामाजिक कार्यकर्त्यांसाठी मोठा धक्का आहे, असे वक्तव्य विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी गिरीष बापट यांच्या निधनावर तीव्र दु:ख व्यक्त करुन श्रद्धांजली वाहिली आहे.

महाराष्ट्राचे सर्वसमावेशक, सुसंस्कृत राजकारणाचा चेहरा म्हणून गिरीशभाऊंकडे पाहिले जायचे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीत तयार झालेल्या गिरीशभाऊंनी जात, धर्म, पंथ, प्रांत, भाषा, पक्षभेदांच्या भिंती ओलांडून समाजकार्य, विकासाचे राजकारण केले. टेल्को कंपनीतल्या कामगार नेत्यापासून सुरु झालेला त्यांचा प्रवास पुणे महापालिकेचे नगरसेवक, स्थायी समिती अध्यक्ष, आमदार, मंत्री, खासदार पदापर्यंत पोहचला. चार दशकांच्या प्रदीर्घ राजकीय वाटचालीत गिरीशभाऊंना पुणेकरांचे अलोट प्रेम मिळाले. 1995 पासून 2014 पर्यंत सलग पाच वेळा ते आमदार झाले आणि 2019 ला खासदार झाले. राज्याचे मंत्री, पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून पुणे शहर, जिल्ह्याच्या विकासातले त्यांचे योगदान कायम स्मरणात राहील, असे अजित पवार म्हणाले.

- Advertisement -

त्यांनी सांगितले की, गिरीष बापटांची काही महिन्यांपासून प्रकृती ठिक नव्हती. आजाराशी ते निर्धारने लढत होते. बरे होऊन सार्वजनिक जीवनात ते पुन्हा सक्रीय होतील, हा विश्वास आम्हा सगळ्यांना होता. तो विश्वास आज खोटा ठरला. गिरीशभाऊंच्या निधनाने पुणे जिल्ह्याचे सर्वसमावेशक नेतृत्व हरपले आहे. आम्ही ज्येष्ठ सहकारी, सुहृदय मित्र गमावला आहे. पुणे जिल्ह्याला, राज्याला गिरीशभाऊंची उणीव कायम जाणवेल, त्यांची आठवण कायम येत राहील. गिरीशभाऊंच्या कुटुंबियांच्या, कार्यकर्त्यांबद्दल सहसंवेदना व्यक्त करतो,” अशा शब्दात त्यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

सर्वपक्षीय जनसंपर्क जोपासणारा नेता गमावला
गिरीष बापट यांच्या निधनावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे. त्यांनी म्हटले की, पुणे लोकसभा मतदारसंघाचे खासदार गिरीश बापट यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद आहे. चार दशकांच्या प्रदीर्घ कारकीर्दीत गिरीश बापट यांनी नेहमीच सर्वसमावेशक भूमिका घेत राजकीय प्रवास केला. पुण्यातील लोकांच्या मनात पक्के स्थान निर्माण करत त्यांनी पुणेकरांच्या व कामगारांच्या प्रश्नांसाठी नेहमीच काम केले. त्यांच्या निधनाने महाराष्ट्रातील एक सर्वपक्षीय जनसंपर्क जोपासणारे राजकीय नेते आपण गमावले आहेत. अशा शब्दात शरद पवार यांनी गिरीश बापट यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.

- Advertisement -

मनमिळाऊ स्वभावाचे नेतृत्व काळाच्या पडद्याआड
गिरीष बापट यांच्या निधनावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे. त्यांनी म्हटले की, माझे लोकसभेतील सहकारी आणि पुणे लोकसभा मतदारसंघाचे खासदार गिरीश बापट यांचे निधन झाले. ही बातमी अतिशय दुःखद आहे. सलग पाच वेळा पुण्यातून ते आमदार म्हणून विधानसभेत निवडून गेले. त्यांना काही काळ राज्य मंत्रिमंडळातही काम करण्याची संधी लाभली होती. त्यांच्या निधनामुळे एक मनमिळाऊ स्वभावाचे नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले. भावपूर्ण श्रद्धांजली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -