घरसंपादकीयवाणी संतांचीवाणी ज्ञानेश्वरांची

वाणी ज्ञानेश्वरांची

Subscribe

जो सर्वदा नित्यतृप्तु । अंत:करण भरितु । परी विषयामाजीं पतितु । जेणें संगें कीजे ॥
जो सर्वदा तृप्त असून ज्याचे अंत:करण आत्मज्ञानाने भरलेले आहे, पण ज्याच्या संगतीने पुरुष विषयासक्त होतो,
तो कामु सर्वथा जाये । जयाचे आत्मतोषीं मन राहे । तोचि स्थितप्रज्ञु होये । पुरुष जाणैं ॥
त्या कामाची ज्याच्या मनातून पूर्ण निवृत्ती होऊन ज्याचे मन स्वानंदात रममाण असते, तोच पुरुष स्थितप्रज्ञ-स्थिरबुद्धि असे जाणावे.
नाना दु:खीं प्राप्ती । जयासी उद्वेगु नाहीं चित्तीं । आणि सुखाचिया आर्ती । अडपैजेना ॥
नानाप्रकारची दुःखे प्राप्त होऊनही ज्याच्या मनात त्रास उत्पन्न होत नाही आणि जो सुखाच्या इच्छेमध्ये अडकून राहत नाही;
अर्जुना तयाच्या ठायीं । क्रामक्रोधु सहजें नाहीं । आणि भयातें नेणें कहीं । परिपूर्णु तो ॥
अर्जुना, त्या सत्पुरुषाच्या अंत:करणातून कामक्रोध सहजपणे नाहीसे झालेले असतात व त्या पूर्णावस्थेस पोहोचलेल्या पुरुषास भयाचे नावदेखील माहीत नसते.
ऐसा जो निरवधि । तो जाण पां स्थिरबुद्धि । जो निरसूनि उपाधि । भेदरहितु ॥
अशाप्रकारे संसार सोडून देऊन जो केवळ भेदरहित झालेला असतो, तोच पुरुष स्थिरबुद्धि आहे असे समजावे.
जो सर्वत्र सदा सरिसा । परिपूर्णु चंद्रु कां जैसा । अधमोत्तम प्रकाशा । माजीं न म्हणे ॥
पौर्णिमेचा चंद्र जसा चांगल्या किंवा वाईट लोकास सारखा प्रकाश देतो, तसा जो सर्वांशी सदैव सारखे वर्तन ठेवितो;
ऐसी अनवच्छिन्न समता । भूतमात्रीं सदयता । आणि पालटु नाहीं चित्ता । कवणे वेळे ॥
त्याप्रमाणे अखंड ममता आणि प्राणिमात्रांविषयी सदयता असून ज्याच्या मनाची स्थिती कधीही पालटत नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -